खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स पाठवण्यात आला आहे. ४ वर्षांपूर्वी ‘पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र बँके’मध्ये ३५० कोटी रुपयांचा अपहार झाला होता. यामध्ये काही रक्कम सौ. वर्षा राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्या खात्यात जमा झाल्याविषयी चौकशी करण्यासाठी त्यांना समन्स पाठवण्यात आला आहे. त्यासाठी सौ. वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात बोलावले आहे.

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना संजय राऊत म्हणाले, ‘‘अशा प्रकारचा समन्स आल्याचे मला ठाऊक नाही. याविषयी माहिती घेऊन पत्रकार परिषदेद्वारे सविस्तर माहिती देईन.’’

भाजपकडून अन्वेषण यंत्रणांचे अवमूल्यन ! – खासदार अरविंद सावंत, शिवसेना

सत्तेसाठी भाजपचा हा घाणेरडा प्रकार चालू आहे. कुटुंबालाही त्रास देण्याचा अवलंब भाजप करत आहे. ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांचेही अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण चालू होते; मात्र त्याचे काय झाले ? या राष्ट्रीय संस्थांचे अवमूल्यन चालू आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रकारे दुसर्‍यासाठी खणलेल्या खड्डयात भाजप स्वत: पडला आहे.

दोन्ही बाजूंनी ढोल बडवता येणार नाही ! – आमदार राम कदम, भाजप

मुंबई पोलिसांनी एका पत्रकाराला एका रात्रीत अटक केली. मुंबई महानगरपालिकेने घर पाडले, हे सूडाचे राजकारण नाही; मात्र केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी कारवाई केली, तर ते मात्र सूडाचे राजकारण. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी ढोल बडवता येणार नाही. केंद्रीय अन्वेषण यंत्रणांकडून चालू असलेल्या अन्वेषणाला सहकार्य करायला हवे.