बंगालचे राजकारण

बंगालमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. बंगालचे राजकीय वातावरण मात्र आतापासूनच तापले आहे. एरव्ही कोणत्या राजकीय पक्षाने कोणते छक्के-पंजे खेळले, तरी सामान्यांच्या जीवनावर विशेष परिणाम होत नसतो. बंगालची मात्र गोष्टच वेगळी आहे. बंगालमध्ये डाव्या विचारसरणीच्या, धर्मांधप्रेमी ममता(बानो) यांची सत्ता आहे. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने त्यांनी प्रसंगी केंद्र सरकारविरोधी भूमिकाही घेतली आहे. आता बंगाल चर्चेचे केंद्र होण्यामागे भाजपने बंगालमध्ये उघडलेली धडक प्रचारमोहीम कारणीभूत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः बंगालमध्ये वारंवार दौरे करत आहेत. अर्थात् ममता त्यांना विरोधच करत आहेत. गेल्या आठवड्यात भाजपचे पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वाहनांच्या ताफ्यावर मोठे आक्रमण झाले होते. त्यानंतर ममता यांनी वापरलेली भाषा त्यांचीच शोभा करणारी होती. ‘चड्डा, नड्डा, फड्डा,भड्डा सर्व इथेच आहेत’, असे त्या म्हणाल्या होत्या. इतरांवर अशा प्रकारे दुगाण्या डागता डागता आता त्यांच्याच पक्षाला भगदाड पडू लागले आहे. त्यांचे निकटवर्तीय सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

जीतेंद्र तिवारी, शिलभद्र दत्ता, कबिरूल इस्लाम आदी पदाधिकार्‍यांनीही पक्षाचे त्यागपत्र दिले आहे. ‘तुम्ही सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही’, अशा प्रकारची एक म्हण आहे. काही काळ तृणमूल काँग्रेसच्या लांगूलचालनाला लोक बळी पडलेही असतील; मात्र आता जागृती होत आहे, त्याचे हे द्योतक आहे. बंगालला बॉम्ब बनवण्याचा कारखाना बनवणार्‍या, गुन्हेगारी पराकोटीची वाढलेल्या, बांगलादेशी घुसखोरांना राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळवून देऊन देशाची फार मोठी हानी करणार्‍या बंगालच्या शुद्धीकरणाची वेळ आता जवळ आली आहे, असे मानायला हरकत नाही. त्याप्रमाणे आता दिसू लागले आहे.

ममता यांची कुकर्मे

बंगाल ही वास्तविक श्री दुर्गादेवीची भूमी आहे. त्या ठिकाणी अनेक प्राचीन तीर्थक्षेत्रे आहेत. रामकृष्ण परमहंस यांनी ज्या ठिकाणी कालीमातेची आराधना केली, अशी ती भूमी आहे. स्वामी विवेकानंद यांचे कार्यही तिने पाहिले आहे. अशा भूमीत ममता यांनी कोणती पापे करून ठेवली, ते देशाने पाहिले. तेथे घरोघरी बॉम्ब बनवण्याचे कारखाने निर्माण झाले आहेत. गेल्या वर्षी तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकार्‍याच्या घरात बॉम्ब बनवतांना स्फोट झाल्याच्या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी पोलीस गेले असता त्यांना बाहेरच रोखून धरून आतमध्ये पुरावे नष्ट करण्याचे काम त्या घरातील महिलांनी केले होते. भाजपच्या द्वेषापोटी केंद्राच्या ३०० हून अधिक योजना ममता यांनी बंगालमध्ये लागू केलेल्या नाहीत. शारदा घोटाळ्याचे अन्वेषण करायला आलेल्या सीबीआयच्या अधिकार्‍यांनाच अटक करण्याचे प्रताप ममता यांच्या नावावर आहेत. मागील वर्षी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे विमानच ममता यांनी बंगालमध्ये उतरू दिले नव्हते. एकदा त्यांच्या दौर्‍याच्या वेळी काही युवकांनी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या होत्या, तर ममता त्यांच्या अंगावर धावून गेल्या. महाराष्ट्रात गणेशोत्सव जितक्या सामूहिकपणे आणि आनंदाने साजरा होतो, तितक्याच आनंदाने बंगालमध्ये श्री दुर्गापूजा केली जाते. नवरात्रोत्सवात अशा दुर्गापूजा मंडळांवर पोलिसांनी केलेल्या अन्याय्य कारवाईच्या घटना लपून राहिलेल्या नाहीत. यावरून ममता यांची पराकोटीची द्वेषपूर्ण मानसिकता दिसून येते. वास्तविक बंगालमध्ये ७० टक्के हिंदू आहेत आणि २७ टक्के मुसलमान लोकसंख्या आहे. असे असूनही ममता यांनी गेली १० वर्षे ज्या प्रकारे प्रशासकीय निर्णय घेतले आहेत की, जणू त्या मुसलमानबहुल राष्ट्रात वावरत आहेत.

कालमहात्म्य

सध्या ममता यांनी पदाधिकार्‍यांच्या पक्ष सोडण्याविषयी प्रतिक्रिया देतांना ‘१-२ जणांच्या जाण्याने काही फरक पडत नाही’, असे म्हटले आहे. असे असले, तरी सुवेंदू अधिकारी यांचे तेथील विधानसभेच्या ५० मतदारसंघांवर वर्चस्व आहे. बंगालमध्ये २९४ विधानसभेच्या जागा आहेत. त्यातील ५० हून अधिक जागांवर वर्चस्व असलेले नेते बाहेर पडलेले आहेत, ही निश्‍चितच मोठी हानी आहे. वरवर ममता काहीही बोलल्या, तरी त्याचे परिणाम त्यांना निश्‍चितच दिसून येतील. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्राबल्य तर केव्हाच अल्प झाले आहे. भाजपने त्यांचे राष्ट्रीय प्रचारक भाग्यनगरच्या महानगरपालिका निवडणुकीत उतरवून तेथील राजकीय पटलावर स्वतःची बाजू भक्कम केली आहे. बंगालमध्ये तेच प्रयत्न चालू आहेत. भाजपचा जनाधार बंगालमध्ये वाढत आहे, यात तसे इतरांनी आनंद साजरा करण्यासारखे काही नाही; मात्र बंगालमधील धर्मांधांच्या तुष्टीकरणाच्या आणि हिंदूंच्या दमनाच्या राजकारणाला सध्या भाजप पर्याय होऊ पहात आहे. तेथील जनतेने आशेने पहावे, असे काही प्रमाणात तरी भाजपने केलेले आहे. त्यामुळे भाजपने तेथील निवडणुकीची सिद्धता फार आधीपासून चालू केली आहे.

जनता असुरक्षित, आतंकवादी, धर्मांध वातावरणात अधिक काळ राहू शकत नाही. सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण ही व्यक्तीची प्राथमिकता आहे. काळ जसजसा पुढे सरकत आहे, तसे धर्मविरोधक, डाव्या विचारसरणीचे, धर्मनिरपेक्षतावाले आदी सर्वांमध्ये फूट पडत असल्याचे दिसत आहे. त्यांची शक्ती क्षीण होणे, लोकांनी त्यांच्यावर अविश्‍वास दाखवणे, हे सर्व हिंदुत्वाच्या विचारधारेचे पुनरुत्थान करण्यासाठी पोषक वातावरण आहे. मुळातच बंगालच्या भूमीत धार्मिकता आहे. तेथे जाणीवपूर्वक थोपवली गेलेली डाव्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या विचारांची जळमटे बाजूला झाली की, तेथील मूळ संस्कृतीची ओळख आपोआप होईल. तृणमूल काँग्रेसला लागलेली घरघर ही हिंदूंसाठी एक चांगली बातमी आहे. तेथील हिंदूंच्या दमनाचे दिवस आता संपतील, अशी आशा करण्यास हरकत नाही. भाजपने तेथे मतपेटीच्या पलीकडे जाऊन बंगालच्या हिंदूंना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कार्य करावे, इतकीच अपेक्षा !