Pahalgam Attack Muslim Protest: काश्मीरमधील मशिदींतून पहलगाम आक्रमणाचा निषेध !

  • अनेक ठिकाणी पाळण्यात आला बंद

  • मेणबत्ती मोर्चा काढून विरोध

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा काश्मिरी नागरिकांनी निषेध केला आहे. पहलगाम येथील लोकांनी मेणबत्ती मोर्चा काढत या आक्रमणाचा निषेध केला, तर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला. अनेक मशिदींमधून या आक्रमणाचा निषेध करण्यात आला. ‘हे आक्रमण इस्लाम आणि मानवता यांच्या विरोधात आहे. आतंकवादाला कोणताही धर्म नसतो आणि हे आक्रमण काश्मीरची शांतता अन् एकता नष्ट करण्याचा कट आहे’, असे मशिदींतून सांगण्यात आले.

१. ‘काश्मीर आमचे घर आहे आणि आम्ही ते आतंकवाद्यांच्या हाती जाऊ देणार नाही’, अशी घोषणा मशिदींमध्ये करण्यात आली. ‘अशी भ्याड आक्रमणे करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणीही करण्यात आली.

२. किश्तवाडमधील मशिदीतून सांगण्यात आले की, ‘पहलगाममधील आक्रमणाचा संपूर्ण इस्लामी समुदाय तीव्र निषेध करतो आणि सरकारकडून चौकशीची मागणी करतो. जो कुणी गुन्हेगार आहे, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.’ या आक्रमणाच्या निषेधार्थ २३ एप्रिलला किश्तवाडमध्ये बंद पाळण्यात आला.

३. बारामुल्ला आणि श्रीनगर येथे स्थानिक लोकांनी मेणबत्ती मोर्चा काढून आक्रमणाचा निषेध केला. श्रीनगरमधील नेहमी गजबजलेला लाल चौक आक्रमणाच्या घटनेनंतर पूर्ण रिकामा होता. जम्मूतील कटरा येथेही बंदी पाळण्यात आला. यामुळे श्री वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्रास सहन करावा लागला.

पंजाबमध्येही मुसलमानांकडून निषेध !

पंजाबमधील लुधियाना येथे पहलगाम येथील आक्रमणाचा मुसलमानांकडून निषेध करण्यात आला. त्यांनी येथील जामा मशिदीबाहेर आतंकवाद्यांचे पुतळे जाळले. याविषयी
मुसलमान नेते महंमद मुस्तकीम म्हणाले की, काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी नि:शस्त्र लोकांवर केलेले आक्रमण निंदनीय आहे. संपूर्ण मुसलमान समाज यास विरोध करतो.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांनी केवळ निषेध करून थांबू नये, तर या आतंकवाद्यांना ज्या स्थानिक मुसलमानांकडून साहाय्य केले जाते, त्यांना विरोध करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना साहाय्य करावे !
  • यासह स्थानिक मुसलमानांनी काश्मीरमधून विस्थापित झालेल्या हिंदूंचे पुनर्वसन होण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यांच्या संपत्तीवर झालेले अतिक्रमण दूर करण्यासाठी साहाय्य करावे !