नम्रता, अल्प अहं असलेले आणि तन-मन-धन समर्पित करून गुरुसेवा करणारे चेन्नई येथील साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

पू. पट्टाभिराम प्रभाकरन्

चेन्नई – नम्रता, अल्प अहं असलेले अन् वृद्धापकाळातही तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करणारे सनातनचे साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् (वय ७६ वर्षे) हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी १०.१२.२०२० या दिवशी एका ‘ऑनलाईन’ सत्संगाद्वारे घोषित केली. ‘सध्या कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्काळातही गुरुदेवांनी पू. मामांच्या रूपात साधकांना आशीर्वाद दिला’, असे साधकांना जाणवून कृतज्ञता व्यक्त झाली. या ‘ऑनलाईन’ सत्संगाला सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.

पू. प्रभाकरन् (उजवीकडे) यांना पुष्पहार घालतांना श्री. रविचंद्रन्

आज्ञापालन आणि तन-मन अन् धन यांचा त्याग करून अवघ्या १४ वर्षांत सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झालेले चेन्नई येथील पू. पट्टाभिरामन् प्रभाकरन् (वय ७६ वर्षे) !

चेन्नई येथील श्री. प्रभाकरन् मामा गेल्या १४ वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते ‘चेन्नई पोर्ट ट्रस्ट’ मधून ‘मुख्य अभियंता’ म्हणून सेवानिवृत्त झाले. पूर्वीचे त्यांचे रहाणीमान पूर्णतः वेगळे होते; मात्र साधना समजल्यावर त्यांनी स्वतःत आमूलाग्र पालट केला. अध्यात्मात ‘तात्त्विक भागाला केवळ २ टक्के, तर कृती करण्याला ९८ टक्के महत्त्व आहे’, हे लक्षात घेऊन त्यांनी कृतीच्या स्तरावर तन-मन आणि धन यांचा त्याग केला. या वयातही ते तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करतात. यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे.

नम्रता, अल्प अहं आणि प्रेमभाव असलेल्या श्री. प्रभाकरन् मामा यांनी चेन्नईतील सर्व साधकांची मने जिंकली आहेत. ते तमिळनाडूतील सर्व साधकांचा आधारस्तंभ बनले आहेत. आज्ञापालन करणे आणि सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे या गुणांमुळे श्री. प्रभाकरन् मामा यांनी वर्ष २०१२ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. या गुरुपौर्णिमेला त्यांची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के होती.

आजच्या शुभदिनी श्री. प्रभाकरन् मामा यांनी ७१ टक्के आध्यात्मिक गाठली असून ते सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाले आहेत.

‘पू. पट्टाभिरामन् प्रभाकरन् यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

डावीकडून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, पू. पट्टाभिरामन् प्रभाकरन् आणि पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

अशी झाली ‘ऑनलाईन’ घोषणा !

‘आपत्काळात साधना कशी करावी’, या विषयावर सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मार्गदर्शन असणार आहे’, असेही सांगण्यात आले होते. सर्व साधक श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मार्गदर्शनासाठी ‘ऑनलाईन’ सत्संगात आनंदाने सहभागी झाले होते. या वेळी सूत्रसंचालक श्री. विनायक शानभाग यांनी सांगितले की, आजच्या सत्संगाचा आरंभ सूक्ष्मातील प्रयोगाने करूया.

‘एका पाकिटाकडे पाहून काय वाटते’, असे सर्व साधकांना विचारण्यात आले. सर्व साधकांना पाकिटाकडे पाहून आनंद आणि चैतन्य यांची अनुभूती आली. काही साधकांना पाकिटाकडे पाहून भगवान श्रीकृष्णाचे, तर काही साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. साधकांनी त्यांच्या अनुभूती सांगितल्यानंतर पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी ते पाकीट उघडून त्यातील श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् यांचे छायाचित्र संगणकीय प्रणालीद्वारे सर्वांना दाखवले. या वेळी सर्वांचा भाव जागृत झाला.

यानंतर पू. उमा रविचंद्रन् यांनी श्री. प्रभाकरन् मामांना सांगितले की, ‘‘मामा, तुमच्या छायाचित्राकडे पाहून सर्व साधकांना छान अनुभूती आल्या. तुम्ही साधनेचे कोणते प्रयत्न करता, ते आम्हाला सांगा.’’ श्री. प्रभाकरन् मामा यांनी त्यांचे साधनेतील काही प्रयत्न सांगितले. यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री. प्रभाकरन् मामा संतपदी विराजमान झाल्याविषयी लिहिलेला संदेश पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी वाचून दाखवला.

या ‘ऑनलाईन’ सत्संगानंतर सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि त्यांचे पती श्री. रविचंद्रन् यांनी पू. प्रभाकरन् यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. श्री. रविचंद्रन् यांनी पू. मामांना पुष्पहार घातला, तर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी पू. प्रभाकरन् मामा यांची सून सौ. वीणा याही उपस्थित होत्या. ‘पू. मामा घरी कसे साधे जीवन जगतात, त्यांच्यात अहं किती अल्प आहे, पत्नीच्या शारीरिक व्याधींकडे कसे ते साक्षीभावाने पहातात आणि पत्नीची सेवा करतात’, याविषयी सौ. वीणा यांनी सांगितले.

क्षणचित्रे

१. गेले काही दिवस चेन्नई शहरात पुष्कळ पाऊस पडत असल्याने अधून-मधून वीज जात असे; पण या संतभेटीच्या वेळी एकदाही वीज गेली नाही.

२. साधक सत्संगात जेव्हा पू. मामांची गुणवैशिष्ट्ये सांगत होते, तेव्हा पू. मामा ते जिज्ञासू वृत्तीने एकत होते.

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक