सातारा येथील राजवाडा बसस्थानकात साकारण्यात आलेले ‘शिव-समर्थ शिल्प’ कोणत्याही परिस्थितीत हटवण्यात येऊ नये !

२५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष आणि संप्रदाय यांचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अन् सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन

सातारा, १० डिसेंबर (वार्ता.) – येथील राजवाडा बसस्थानकात स्थानिक नगरसेवक विजयकुमार काटवटे यांच्या प्रयत्नातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून ‘शिव-समर्थ शिल्प’ साकारले जात आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु राष्ट्रसंत श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. असे असतांना काही समाजविघातक शक्तींकडून हे शिल्प हटवण्यासाठी संबंधित शासकीय अधिकार्‍यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या शिल्पास आमचे समर्थन आहे. त्यामुळे अशा कोणत्याही दबावाला प्रशासनाने बळी पडू नये आणि सातारा येथील राजवाडा बसस्थानकामध्ये साकारण्यात आलेल्या ‘शिव-समथ शिल्पा’ला कोणत्याही परिस्थितीत हटवण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन १० डिसेंबर या दिवशी २५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, संप्रदाय आणि समर्थभक्त यांच्या वतीने येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुनील थोरवे यांच्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहाय्यक अभियंता आर्.टी. अहिरे यांना देण्यात आले.

सहभागी हिंदुत्वनिष्ठ : समर्थभक्त पू. शहाजीबुवा रामदासी, नाथ संप्रदायाचे पू. दादा महाराज कुंभार, भाजपचे नगरसेवक श्री. विजय काटवटे आणि नगरसेवक श्री. कोळेकर, माजी नगरसेवक श्री. मिलिंद गोसावी, श्री. काकडे, श्री. रामभाऊ संकपाळ, अधिवक्ता दत्ता सणस, अधिवक्ता सौरभ देशपांडे, अधिवक्ता खानविलकर, सर्वश्री मंगेश निकम, महेंद्र निकम, प्रदीप पाटील, माजी नगरसेवक अधिवक्ता खामदार, अधिवक्त्या (सौ.) शुभांगी काटवटे, श्री. योगेश तारळेकर

सहभागी संघटना : श्री योग वेदांत सेवा समिती, हिंदु महासभा, हिंदु जनजागृती समिती, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सम्राट गणेशोत्सव मंडळ, सम्राट नवरात्र उत्सव मंडळ, श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड, ब्राह्मण महासंघ, नारीशक्ती फाऊंडेशन सातारा, श्री समर्थ संप्रदाय, विजय चॅरिटेबल ट्रस्ट, अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, अजिंक्य गणेशोत्सव मंडळ, शिवसेना, भाजप यांसह शाळा, धर्मादाय संस्था आदी १०० हून अधिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

(सौजन्य : loksamrajya news)

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. या ऐतिहासिक भूमीत शासनाच्या वतीने राजवाडा बसस्थानकामध्ये ‘शिव-समर्थां’चे सुंदर शिल्प साकारले गेले आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे वर्णन एकाच ओळीत करायचे झाले, तर ‘गुरु-शिष्य’ परंपरा’ असे करता येईल. आज संपूर्ण विश्‍वात राष्ट्रसंत श्री समर्थ रामदासस्वामी आणि त्यांचे शिष्य श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आदराने गुरु-शिष्य परंपरेत घेतले जाते. तसे ऐतिहासिक दस्तऐवज भारतीय पुरातत्व खात्याकडे, तसेच धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर या ठिकाणी उपलब्ध आहेत; परंतु दुर्दैवाने या सर्व पुराव्यांकडे दुर्लक्ष करून शहरातील पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनांनी विनाकारण या शिल्पावर आक्षेप घेतला आहे.

२. काही वर्षांपूर्वी सज्जनगड येथील श्री रामदासस्वामी संस्थानच्या वतीने ‘श्रीशिवछत्रपती-समर्थ योग’ या नावाचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांच्यामध्ये झालेले विविध पत्रव्यवहार प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. त्यामुळे हे सत्य नाकारून चालणार नाही.

(सौजन्य : MK 24 MARATHI NEWS CHANNEL)

३. आम्ही सातारा शहरातील समस्त ‘शिव-समर्थ भक्त’ या विनंतीपत्राद्वारे शासनाचे विशेष अभिनंदन करतो. तसेच या ऐतिहासिक ‘शिव-समर्थ’ शिल्पाचे समर्थन करतो.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी रामदास स्वामी यांचा जवळचा संबंध होता ! – पू. शहाजीबुवा रामदासी, समर्थभक्त

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी रामदासस्वामी यांचा जवळचा संबंध होता, हा इतिहास आहे. सज्जनगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासस्वामी यांना दिलेला आहे. समर्थांचे समाधी मंदिरही छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेले आहे. समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी यांचा अनुग्रह सोयराबाई यांनी घेतला होता. याविषयीचे ऐतिहासिक सर्व पुरावे उपलब्ध असतांना या स्मारकाला विरोध करणे योग्य नाही. त्यामुळे याला विरोध करणार्‍यांचा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना निषेध करत आहेत, असे मत या वेळी ज्येष्ठ समर्थभक्त पू. शहाजीबुवा रामदासी यांनी व्यक्त केले.