‘संत-ताई, पू. अश्‍विनीताई यांच्या रूपात प्रत्यक्ष भगवंतच कसा वेळोवेळी साहाय्य करत आहे’, हे सांगणारे एका भावाचे हृद्गत !

सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचा कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी (११.१२.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. पू. अश्‍विनीताईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे भाऊ श्री. सचिन साळुंखे यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि कृतज्ञता पुढे दिली आहे.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

१. वडिलांच्या निधनाच्या वेळी पू. (सौ.) अश्‍विनीताईंनी दिलेला आधार

१ अ. वडिलांच्या अत्यवस्थ स्थितीत धीर देऊन मनावरील ताण दूर करणे : ‘आमच्या वडिलांना ११.९.२०१७ या दिवशी सकाळी रुग्णालयात भरती करण्यात आले. वडिलांवर उपचार चालू करण्यापूर्वीच आधुनिक वैद्यांनी ‘सर्व नातेवाइकांना कळवा’, असे सांगितले. तेव्हा माझ्या मनात ‘काही विपरित घडेल का ?’, अशी भीती होती. पू. अश्‍विनीताई रुग्णालयात आल्यावर तिने मला धीर देऊन माझ्या मनावरील सर्व ताण दूर केला.

श्री. सचिन साळुंखे

१ आ. पू. ताईने स्थिरपणे वडिलांचे पार्थिव गावी नेण्याची सर्व सिद्धता करणे : आधुनिक वैद्यांनी वडिलांचे निधन झाल्याचे सांगितले. तेव्हा मी आणि आई धीर सोडून रडू लागलो; पण पू. ताईने मला अन् आईला मोठा आधार देऊन सावरले. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव गावी न्यायचे ठरले. अशा दुःखाच्या प्रसंगातही पू. ताईने सर्व सिद्धता स्थिरपणे केली.

१ इ. गावी दुखवटा काळामध्ये सर्व पाहुण्यांना थांबता यावे, यासाठी तेरा दिवस होणारे विधी पाच ते सात दिवसांत करण्याची पद्धत चालू झाली आहे; परंतु ताईने पुढाकार घेऊन १३ दिवसांपर्यंतचे प्रत्येक दिवसाचे विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने करवून घेतले.

१ ई. पू. ताईंनी घरातील महिलांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप करण्यास सांगितल्यावर काही वेळातच वडिलांच्या पिंडाला कावळा शिवणे : स्मशानभूमीत वडिलांच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता. त्यामुळे शेवटी लोकांनी गायीला पिंड द्यायची सिद्धता केली. तेव्हा भावजींनी (श्री. अतुल पवार यांनी) पू. ताईला भ्रमणभाष करून तेथील स्थिती सांगितली. त्या वेळी ताईने घरातील सर्व महिलांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप मोठ्याने करण्यास सांगितला आणि अवघ्या काही मिनिटांतच वडिलांच्या पिंडाला कावळा शिवला.

१ उ. सर्व व्यावहारिक अडचणींमध्ये साहाय्य करणे : पू. ताई स्वतःच्या सेवा सांभाळून आमचाही सांभाळ करत होती. नोकरी आणि वडिलांचा व्यवसाय सांभाळतांना मला काही घरगुती, तसेच व्यावहारिक गोष्टींसाठी वेळ मिळत नसे. त्या वेळी पू. ताई तिच्या सेवेतून वेळ काढून माझ्या सर्व अडचणींमध्ये मला साहाय्य करत असे. वडिलोपार्जित संपत्तीच्या (जमीन, घर, दुकान, गावाकडील मालमत्ता आदींच्या) वारसा हक्कासाठी लागणार्‍या सर्व गोष्टींमध्ये ताईने पुष्कळ साहाय्य केले. वडील गेल्यानंतर प्रत्येक १५ दिवसांनी पू. ताई घरी येत होती. ती देत असलेल्या आधारामुळे वडिलांची उणीव जाणवली नाही.

२. भविष्यासाठी बचत व्हावी, यासाठी काही नियम घालून देणे

माझा स्वभाव खर्चिक असल्यामुळे दुकान आणि नोकरी यांतून येणार्‍या मिळकतीच्या व्ययावर पू. ताई लक्ष देते. वायफळ व्यय टाळून माझ्या भविष्यासाठी बचत व्हावी, यासाठी ताईने मला व्यय आणि बचत यांचे काही नियम घालून दिले. आजही ती माझ्या व्ययाचा आणि बचतीचा लेखाजोखा वडिलांप्रमाणे पहाते.

३. विवाहाच्या वेळी पू. ताईंनी घेतलेला पुढाकार

३ अ. नातेवाइकांनी विवाहाच्या वेळी दिलेला मानसिक त्रास पू. ताईंनी प्रेमापोटी सहन करणे : माझ्या विवाहासाठी स्थळे पहात असतांना माझ्या अपेक्षांमुळे अनेक नातेवाइकांनी सुचवलेली स्थळे मी नाकारत होतो. तेव्हा ते नातेवाईक पू. ताईला आणि आईला टोचून बोलायचे. नातेवाइकांनी दिलेला हा मानसिक त्रास पू. ताईने माझ्यावरील प्रेमापोटी सहन केला.

३ आ. पू. ताईंनी वडिलकीच्या नात्याने भावाचा विवाह पार पाडणे : माझा विवाह ठरल्यानंतर सर्वांत अधिक आनंद पू. ताईला झाला. एखादे वडील स्वतःच्या मुलाच्या लग्नात जसे चांगले करण्यासाठी धडपड करतात, तसे सर्वकाही पू. ताईने माझ्यासाठी केले. विवाहसोहळा पुष्कळ सुंदर रीतीने पार पाडला. पू. ताईने अविस्मरणीय असा सोहळा आयोजित केला होता.

४. पू. ताईंमुळे संतांचे आशीर्वाद मिळून नोकरी आणि विवाह यांमधील अडचणी सुटल्याचे अनुभवणे

पू. ताई आणि भावजी यांच्यामुळे मला परात्पर गुरु डॉक्टर अन् योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या दर्शनाची संधी मिळाली. मला प.पू. गुरुदेवांचे दर्शन झाले आणि त्यामुळे माझे सारे प्रारब्ध जळले, असे वाटले. ‘त्यांनी जणू काही चमत्कारच केला’, असे मला जाणवले. मी मागील ४ वर्षांपासून नवीन नोकरीच्या शोधात होतो; मात्र मला कुठेच नोकरी मिळत नव्हती. प.पू. गुरुदेवांच्या दर्शनानंतर काही दिवसांत मला नवीन आणि मोठ्या आस्थापनात नोकरी मिळाली. मागील २ वर्षांपासून माझ्या विवाहात अडचणी येत होत्या. प.पू. गुरुदेवांच्या दर्शनानंतर लगेच एक स्थळ आले. ते सर्वांना अपेक्षित असे असल्याने माझा लगेच विवाह जुळून आला. हा कृपाशीर्वाद मला पू. ताईमुळेच मिळाला.

५. शाारीरिक व्याधींच्या वेळी काळजी घेणे

शारिरीक व्याधींमुळे माझ्यावर २ वेळा शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर ‘मी लवकर बरा व्हावा’; म्हणून पू. ताई पुष्कळ आपुलकीने काळजी घेत असे. त्यासाठी तिने मला नामजप आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांचे मंत्रोपाय दिले.

६. कृतज्ञता

हे भगवंता, माझी काहीच साधना नसतांना माझ्या वाईट काळात पू. ताईच्या रूपातून माझ्यासाठी तूच धावून आलास. माझे वाया जाणारे आयुष्य स्थिर केलेस, मला सांभाळले आणि सावरलेस. यासाठी मी तुझ्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. प.पू. गुरुदेव, मी तुमचा कोटीशः कृतज्ञ आहे. तुम्ही मला ताईसारखी संत-बहीण देऊन भाग्यवान बनवले.

७. क्षमायाचना

प.पू. गुरुदेव, माझ्या स्वभावदोषांमुळे मी पू. ताईला कळत-नकळत त्रास दिला आणि देत आहे. मी अनंत अपराधी आहे. मला क्षमा करा गुरुदेव ! असे असूनही पू. ताई मला आईची माया आणि वडिलांप्रमाणे आधार देत राहिली अन् देत आहे.

८. प्रार्थना

प.पू. गुरुदेव, तुम्ही माझ्यासारख्या क्षुद्र जिवाला ‘आई-वडील’ या दोन्ही रूपांचे प्रेम देणारी जगातील सर्वांत प्रेमळ अशी ‘संत-ताई’ दिलीत. हे गुरुदेवा, पू. ताईप्रमाणे तुम्हांला अपेक्षित अशी साधना तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या. ‘मला पू. ताईचा भाऊ म्हणवून घेण्यास पात्र बनवा’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. सचिन साळुंखे (पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचे लहान भाऊ), पनवेल (७.१२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक