महाराष्ट्रात हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यातून वाचवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा !

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची मागणी

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ३ डिसेंबर (वार्ता.) – भारतातील विविध राज्यांत ‘लव्ह जिहाद’च्या प्रकारांत वाढ झाली आहे. यातून भीषण हत्याकांडेही झाली आहेत. त्यामुळे हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यातून वाचवण्यासाठी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, या मागणीसाठी २ डिसेंबर या दिवशी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोर्चा काढून प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले.

मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर घडवणे चालू आहे. यामुळे हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. अशा वेळी अन्वेषण कार्यात दिरंगाई आणि बघ्याची भूमिका अपेक्षित नाही. कागदपत्रातून पळवाटा आणि त्यातून आरोपी कसा सुटेल, याकडे लक्ष देणे हे चीड आणणारी आहे. सध्या देश आणि राज्य येथील कायदे हे ‘लव्ह जिहाद’ पुढे कमकुवत ठरत आहेत. तरी अल्पवयीन मुलींना आमीष दाखवून विवाह करणे, बळजोरीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘लव्ह जिहाद’विरुद्धचा कायदा करण्यात पुढाकार घ्यावा.

या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हामंत्री श्री. शिवप्रसाद व्यास, शहराध्यक्ष श्री. बाळासाहेब ओझा, बजरंग दल जिल्हा संयोजक श्री. संतोष हत्तीकर, सर्वश्री विजय पाटील, गजानन जाधव, गणेश कांदेकर, रणजित पवार, किशोर मोदी, प्रवीण सामंत, तसेच अन्य उपस्थित होते.