छत्तीसगड येथील जामडीचे श्री पाटेश्‍वर धामाला (जिल्हा बालोद) संपूर्णपणे संरक्षण मिळावे ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राज्यपालांना निवेदन

जामडीचे श्री पाटेश्‍वर धाम हिंदूंचे श्रद्धास्थान

रायपूर (छत्तीसगड) – येथील जामडीचे श्री पाटेश्‍वर धाम हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. हे स्थान भगवान श्रीरामचंद्र यांची माता कौशल्या यांची जन्मभूमी आहे, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लक्षावधी भक्तांची श्रद्धा आणि समरसता यांचे केंद्र असलेल्या श्री पाटेश्‍वर धाममध्ये आता भारतातील कानाकोपर्‍यातून श्रद्धाळू भक्त येतात. त्याचसह  हरिद्वार, प्रयागराज, नाशिक, उज्जैन येथील कुंभमेळ्यामध्ये छत्तीसगडच्या नावाने या प्रदेशाची एकमात्र सेवा छावणी (कँप) लावून सर्वसामान्य लोक आणि भारतातून येणार्‍या यात्रेकरूंची सेवा सुद्धा पाटेश्‍वर सेवा संस्थानाकडून केली जाते.

येथे गोवंशियांची सेवा चालू आहे. श्री पाटेश्‍वर धामाद्वारे बांधकामाचे कार्य चालू असतांना बालोद येथील वन विभागाकडून धामाला नोटीस बजावण्यात आली आहे. ही गोष्ट धार्मिक श्रद्धेच्या दृष्टीने पूर्णत: अयोग्य आहे. सरकारकडून केल्या जाणार्‍या या कारवाईमुळे संपूर्ण श्रद्धाळू हिंदु समाजाच्या मनात रोष निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी २ डिसेंबर या दिवशी राज्यपाल अनुसूइया उइके यांना निवेदन देऊन छत्तीसगड येथील जामडीच्या श्री पाटेश्‍वर धामाला संपूर्ण संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

राज्यपाल अनुसूइया उइके यांच्याशी चर्चा करतांना डावीकडून श्री. ओमेश बीसेन, पू. उदय शदानी महाराज आणि श्री. हेमंत कानसकर

या वेळी राज्यपाल उइके यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या शिष्टमंडळाला या धामाचे संरक्षण करण्याचे आश्‍वासन दिले, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

(सौजन्य : idp24news)

राज्यपाल उइके यांना निवेदन देतांना रायपूरचे शदानी दरबारचे पू. उदय शदानी महाराज, भिलाईचे श्री पाटेश्‍वर धाम संस्थानचे श्री. दाताराम साहू, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुभाष आगलावे, गोरक्षक श्री. उमेश बीसेन, शदानी दरबारचे श्री. चंद्रहास गावरा, श्री. दिलीप तलरेजा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत कानसकर, श्री. मंगेश खंगन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या वेळी शिष्टमंडळाने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना भेटण्यासाठी दोनवेळा वेळ मागितली, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. बघेल यांच्या नावेही निवेदन देण्यात आले आहे.

जामडीचे श्री पाटेश्‍वर धामात होणारे विविध कार्यक्रम आणि तेथे होत असलेला विकास

छत्तीसगड येथील जामडीचे श्री पाटेश्‍वर धामामध्ये वर्ष १९७५ मध्ये प.पू. सद्गुरुदेव संत श्री रामजानकीदास महात्यागी यांचे आगमन झाले होते. तेथे स्थानीक वनवासींकडून प.पू. महात्यागी यांना विनंती करून या धामामध्ये निवास करण्यासाठी आग्रह करण्यात आला. त्यामुळे या स्थानात हळूहळू क्षेत्रीय वनवासींकडून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि निर्माण कार्य चालू करण्यात आले. प्रतिवर्षी माघी पौर्णिमा, हनुमान जयंती, गुरुपौर्णिमा आदी उत्सवांच्या वेळी जवळजवळ २५ ते ३० सहस्र श्रद्धाळू भक्तगण येथे एकाच दिवशी जमतात. श्री पाटेश्‍वर धाम  परिसरात येणार्‍या सर्व भाविकांसाठी विनामूल्य महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. हे स्थान माता कौशल्या यांची जन्मभूमी असल्यामुळे या धामाचा २४ कोटी रुपये व्यय करून विकास करण्यात येत आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये धामाच्या बांधकामासाठी ८ कोटी रुपये व्यय झाले आहेत. यामध्ये सर्व जातीपंथांचे महापुरुष आणि देवतांच्या ४५ मूर्ती स्थापित झाल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला येथे ये-जा करणे सुलभ व्हावे, यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून ५ कि.मी. रस्ता बनवण्यात आला आहे. त्याच समवेत विद्युत् पेयजल मंगल भवन, सामुदायिक भवन, सीसी रोड, कार्य कला मंच बांधण्यात आले आहे.

(सौजन्य : idp24news)

सरकारने या धामाला नोटीस देऊन कारवाई करण्यापूर्वी या सर्व गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. सरकारच्या वन विभागाकडून केल्या जाणार्‍या कारवाईचे हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामाजिक आणि धार्मिक संघटना यांच्या समवेत अखिल भारतीय आखाडा परिषद, वैष्णव आखाडे, वैष्णव संप्रदाय, महामंडलेश्‍वर आणि संत यांनी विरोध केला आहे.

(समितीचे प्रसिद्धीपत्रक वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

धार्मिक श्रद्धेवर प्रशासनाद्वारे कोणताही आघात केला जातोे, तेव्हा त्याला हिंदु समाजाकडून कडाडून विरोध होऊ शकतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे, श्री. घनवट यांनी या प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.