वर्ष २००७ मध्ये मी पूर्णवेळ साधक झाल्यावर साधना करण्यासाठी वाराणसी सेवाकेंद्रात होते. तेथे मला नीलेशदादांचा सहवास लाभला. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. नीलेशदादांप्रती आदर वाटणे
‘नीलेशदादांची खोली नीटनेटकी असते. त्यांच्या खोलीत जाताच मनाला शांत वाटते. त्यांचा शांत स्वभाव आणि व्यवस्थितपणा या गुणांमुळे मला त्यांच्याप्रती आदर वाटायचा.
२. ते सर्वांशी नम्रतेने बोलतात.
३. मूळतः स्वभाव मितभाषी असूनही प्रयत्नपूर्वक साधकांशी संवाद साधणे
एकदा मथुरा येथे एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मला आणि अन्य साधकांना नीलेशदादांच्या समवेत जायचे होते. नीलेशदादांनी आम्हाला प्रवासात सहजतेने सांगितले, ‘‘मला साधकांशी काय बोलायचे ?’, ते लक्षात येत नाही.’’ ते मितभाषी असल्याने काही साधकांनी काही मासांपूर्वी सांगितले होते, ‘‘आम्हाला नीलेशदादांशी बोलतांना भीती वाटते.’’ तेव्हा उत्तरदायी साधकांनी नीलेशदादांना ‘अनौपचारिकरित्या कसे बोलायचे ?’, याविषयी एक दोन उदाहरणे देऊन सांगितले होते. तेव्हापासून नीलेशदादा साधना म्हणून साधकांशी बोलू लागले. प्रत्यक्षात मला ‘त्यांचा स्वभाव अगदी वेगळा आहे’, असे वाटले. मी त्यांच्याशी सहजतेने बोलू शकत होते.
४. प्रेमभाव
अ. वर्ष २००९ मध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत काही कारणांमुळे वाराणसी सेवाकेंद्रातील छताला लावलेले सर्व पंखे काढले होते. मी पंखा नसलेल्या खोलीत झोपायला जात होते. तेव्हा नीलेशदादा कुठून तरी पटलावर ठेवायचा पंखा (टेबल फॅन) घेऊन आले आणि मला म्हणाले, ‘‘फारच उकाडा आहे. हा पंखा लावा.’’
आ. माझी स्वयंपाकघरात सेवा होती. सेवाकेंद्रात साधकसंख्या वाढल्यास नीलेशदादा त्वरित स्वयंपाकघरात येऊन मला साहाय्य करण्याविषयी विचारायचे.
इ. माझी प्रकृती बरी नसतांना मी सेवा करत असल्यास ते मला विचारायचे, ‘‘ताई, मी तुम्हाला काय साहाय्य करू ?’’ त्यांचा मला पुष्कळ आधार वाटायचा.
ई. एके दिवशी मी साधकांसाठी डोसे बनवत होते. मी सर्वांना गरम डोसे वाढत होते. नीलेशदादांचे भोजन झाल्यानंतर ते स्वयंपाकघरात आले आणि त्यांनी मला सहजतेने विचारले, ‘‘ताई, आता मी तुमच्यासाठी डोसे बनवून देऊ का ?, म्हणजे तुम्हालाही गरम डोसे खाता येतील.’’
उ. सेवाकेंद्रात लहान मुले आल्यास नीलेशदादा त्यांच्याशी बोलतात आणि हसतात.
५. आवड-नावड नसणे
अ. ते रात्री भोजनात दुपारचे शेष राहिलेले पदार्थ प्रथम घेतात. त्यांना जेवणात आवड-नावड नाही.
आ. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकच स्वेटर वापरत आहेत.
६. वातावरणाशी जुळवून घेणे
नीलेशदादा गोवा येथे रहाणारे असल्याने त्यांना कडक उन्हाळा किंवा अतिशय थंड हवामान याची सवय नाही. उत्तर भारतात उन्हाळ्यात ४६ – ४७ डिग्री तापमान आणि थंडीत २ – ३ डिग्री तपमान असते. नीलेशदादांनी या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. ते सतत गुरुचरणांकडे लक्ष ठेवून शांत असतात.
७. वेळेचे पालन करणे
नीलेशदादा रात्री उशिरापर्यंत सेवा करतात, तरीही ते अल्पाहार बनवण्यासाठी वेळेत उपस्थित रहायचे.
८. साधकांना प्रोत्साहन देणे
अ. साधकांनी काही चांगले केल्यास नीलेशदादा साधकांचे कौतुक करतात. मी एखादा नवीन पदार्थ बनवल्यास ते मला सांगायचे, ‘‘ताई, पदार्थ चांगला झाला आहे.’’ स्वयंपाकघराची स्वच्छता केल्यावर किंवा त्यात काही पालट केल्यास ते सांगायचे, ‘‘पुष्कळ चांगले वाटते.’’
आ. एकदा मी आणि माझे यजमान काही कामानिमित्त घरी गेलो होतो. त्या कालावधीत वाराणसी सेवाकेंद्रात संत आले होते. तेव्हा नीलेशदादांनी आम्हाला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘तुम्ही दोघांनी संतांसाठी लागणारे साहित्य चांगल्या प्रकारे ठेवले आहे. त्यामुळे आम्हाला सिद्धता करायला सोपे झाले.’’
९. नेतृत्वगुण
नीलेशदादा शांत स्वभावाचे असूनही ते साधकांच्या चुका सांगणे, साधकांकडून कार्यपद्धतीचे पालन करवून घेणे, सहजतेने करत होते.
१०. अल्प अहं
एकदा सेवाकेंद्रात साधकसंख्या वाढल्यानंतर मी नीलेशदादांना स्वयंपाकघरात एखाद्या साधकाला साहाय्यासाठी पाठवायला सांगितले होते. ते अन्य सेवेत व्यस्त असल्याने ही गोष्ट विसरले. त्यानंतर प्रतिदिन होणार्या सत्संगात त्यांनी कान पकडून क्षमा मागितली होती.
११. परिपूर्ण सेवा
अ. ते प्रत्येक सेवा मन लावून करतात. एका साधकाने मला सांगितले, ‘‘त्यांनी तपासलेली स्मरणिकेची प्रत त्यानंतर कुणीही तपासायची आवश्यकता भासत नाही.’’
आ. ते भांडी घासण्याची सेवा केल्यानंतर मोरी चांगल्या प्रकारे स्वच्छ करायचे. ते पाहूनच साधकांच्या लक्षात यायचे, ‘नीलेशदादांनी ही सेवा केली आहे.’
इ. ‘आश्रमात अर्पणात येणार्या खाद्यपदार्थांचा योग्य उपयोग व्हावा. तो वाया जाऊ नये’, याची ते काळजी घेतात. एकदा सेवाकेंद्रात एक पोते तांदुळाचे पीठ अर्पण आले होते. तेव्हा ‘त्याचा वापर होण्याचे नियोजन करायला हवे’, असे त्यांनी मला तत्परतेने सांगितले.
१२. प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रती भाव
अ. एकदा प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रकटदिनाच्या दिवशी आम्ही ध्यानमंदिरात उपस्थित होतो. साधक प्रार्थना करत असतांना नीलेशदादांना भावाश्रू येत होते. ते पाहून माझीही भावजागृती झाली. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘नीलेशदादांची ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होईल.’
आ. प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘देवा, तुझी कशी सेवा करू …’ हे भजन ऐकल्यावर मला वाटते, ‘नीलेशदादा हे भजन म्हणत आहेत.’ त्यांच्या मनात असलेला भाव त्यांच्या मुखावर दिसून येतो.
१३. कृतज्ञताभाव
एकदा रामनाथी आश्रमात अधिवेशन असतांना काही साधक घरी आणि काही साधक अधिवेशनाला गेले होते. माझेही घरी जाण्याचे नियोजन होते. नीलेशदादांनाही अधिवेशनासाठी जायचे होते. त्या वेळी वाराणसी सेवाकेंद्रात एकच साधक रहाणार होता. त्यामुळे मी माझे तिकीट रहित केले. नीलेशदादा गोव्याला जाण्यासाठी निघत असतांना त्यांनी हात जोडून मला ‘धन्यवाद’ म्हटले. ते म्हणाले, ‘‘तुमच्या सहकार्यामुळेच मी जाऊ शकत आहे.’’
१४. ‘नीलेशदादांतील एक गुण जरी आमच्यात बाणवू शकलो, तरी ‘त्यांच्या समवेत रहाण्याचा खर्या अर्थाने आम्हाला लाभ झाला किंवा साधनेसाठी आमचे प्रयत्न होत आहेत’, असे वाटते.
१५. अनुभूती
१५ अ. सूत्रांचे संकलन करतांना भावजागृती होऊन हलकेपणा जाणवणे : २६.६.२०१२ या दिवशी ही सूत्रे माझ्या लक्षात आली होती आणि मी ती माझ्या दैनंदिनीत (डायरीत) लिहून ठेवली होती. ही दैनंदिनी माझ्या माहेरी राहिली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये मी ती दैनंदिनी (डायरी) घेऊन आले आणि ईश्वराच्या कृपेने ही सेवा होऊ शकली. याविषयी मी श्री गुरुचरणी कृतज्ञ आहे. या सूत्रांचे संकलन करतांना माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला हलकेपणा जाणवत होता.
– सौ. वैदेही पेठकर, ग्वालियर
१५ आ. सूत्रांचे टंकलेखन सहजतेने होऊन उत्साह वाटणे : ‘सौ. वैदेहीने मला सूत्रांचे टंकलेखन करायला सांगितल्यावर मला वाटले, ‘मी कसे टंकलेखन करणार ?’; परंतु टंकलेखन चालू केल्यावर सहजतेने टंकलेखन झाले आणि मला उत्साह वाटला.’
– श्री. विवेक पेठकर, ग्वालियर (२४.५.२०२०)
(‘ही सूत्रे श्री. नीलेश सिंगबाळ संतपदी विराजमान होण्यापूर्वीची असल्याने त्यांच्या नावापूर्वी ‘पू.’ असे लिहिले नाही.’ – संकलक)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |