‘नेटफ्लिक्स’वर प्रकाशित ‘लूडो’ चित्रपटातूनही हिंदु देवी-देवतांचे विडंबन !

  •  हिंदूंच्या धार्मिक भावना प्रतिदिन तुडवल्या जात असतांना ‘आमच्या सहिष्णुतेचा नि सहनशीलतेचा अंत पाहू नये’, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ?
  • हिंदूंच्या श्रद्धा, प्रथा-परंपरा यांचा ऊठसूठ अनादर करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा कायदा लवकरात लवकर करून हिंदूंना न्याय द्यावा, अशी केंद्र सरकारकडून अपेक्षा !
(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

नवी देहली – विविध आस्थापनांचे अधिकारी, तसेच चित्रपट आणि वेब सीरिज यांचे निर्माते-दिग्दर्शक यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा जणू काही चंगच बांधलेला दिसत आहे. ‘अ सूटेबल बॉय’ या वेब सीरिजमध्ये एक मुसलमान मुलगा मंदिराच्या परिसरात हिंदु मुलीचे चुंबन घेत असल्याचा प्रसंग रंगवण्यात आला आहे, तर नेटफ्लिक्सवर दिवाळीत प्रदर्शित झालेल्या ‘लूडो’ या चित्रपटातही हिंदु देवी-देवतांना बहुरूप्यांच्या रूपात दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे.

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आमिर खान यांच्या ‘पीके’ चित्रपटात ज्या प्रकारे हिंदु देवी-देवतांचा अश्‍लाघ्य रूपामध्ये अनादर करण्यात आला होता, तसाच काहीसा प्रकार अनुराग बसू दिग्दर्शित ‘लूडो’ या चित्रपटातही करण्यात आला आहे.

१. चित्रपटातील एका प्रसंगात तीन जणांची विचित्र वेशभूषा करण्यात आली असून ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांच्या रूपात त्यांना रस्त्यावर नाचतांना अन् उड्या मारतांना दाखवण्यात आले आहे. त्या तिघांकडे चित्रपटाचे अभिनेते आदित्य रॉय कपूर तुच्छतेच्या भावाने पहात असल्याचे दाखवले आहे.

२. अन्य एका प्रसंगात भगवान शंकर आणि देवी महाकाली यांच्या रूपातील दोघे जण गाडीला धक्का देत असल्याचेही दिसत आहेत.

३. एका प्रसंगात अभिनेते आणि अभिनेत्री हे अंथरुणात असतांना अभिनेत्रीच्या आईचा तिला भ्रमणभाष येतो. तेव्हा ती कुठे असल्याचे आईने विचारल्यावर ती मंदिरात असल्याचे सांगते.

४. चित्रपटात रामलीला आणि गाय यांना उद्देशूनही विनोद करण्यात आले आहेत.

५. अन्य एका प्रसंगात दिग्दर्शक अनुराग बासू आणि अभिनेते राहुल बग्गा हे लूडो खेळत आहेत. त्यामध्ये अनुराग बासू हे राहुल बग्गा यांना उद्देशून म्हणतात, ‘‘एवढे लोक कोरोनाने मृत्यू पावले, तर तुला काय वाटते की, ते सर्व पापी होते ?’’ पाप आणि पुण्य यांविषयी बग्गा यांना समजावतांना बासू म्हणतात, ‘‘महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडव जेव्हा स्वर्गात जातात, तेव्हा त्यांना दुर्योधन आधीपासून तेथे बसला असल्याचे दिसते.’’ ‘दुर्योधन जगाच्या दृष्टीने पापी होता’, असेही बासू या वेळी म्हणतात. या माध्यमातून कौरवांना नायक, तर पांडवांना खलनायक यांच्या रूपात दाखवण्यात आले आहे. यासाठी अनुराग बासू हे मनानुसार एक कपोलकल्पित कथा रचून सांगत असल्याचेही दाखवले आहे.