ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या वतीने समाजसेविका उज्ज्वला निकम यांचा नवदुर्गा गौरव पुरस्कार देऊन गौरव

सत्कार स्वीकारतांना डावीकडून समाजसेविका सौ. उज्ज्वला निकम

सातारा, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – कोरोना काळात रुग्णांना सकस आहार पुरवणार्‍या कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील अन्नपूर्णा सौ. उज्ज्वला लिनेश निकम यांना पुणे येथील ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या वतीने समाजसेविका उज्वला निकम यांचा नवदुर्गा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकभाऊ वानखेडे यांच्या हस्ते हा पुरस्कार समाजसेविका उज्ज्वला  निकम यांना पुणे येथे जाहीर कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

कोरेगाव तालुक्यातील शिवसेनेचे विद्यमान आमदार महेशजी शिंदे यांनी १०० खाटांचे श्री काडसिद्धेश्‍वर महाराज कोविड रुग्णालय उभे केले आहे. येथे प्रशिक्षण आणि प्रथितयश आधुनिक वैद्य रुग्णांना उपचार देत आहेत. याठिकाणी सौ. उज्ज्वला निकम या गत ५ मास श्री काडसिद्धेश्‍वर महाराज रुग्णालयाच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना सकाळच्या न्याहरीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत आहार सिद्ध करून पुरवण्याची अविरत सेवा करत आहेत. प्रतिदिन पहाटे ५ वाजता उठून वैयक्तिक आवरून त्या ठीक ६ वाजता ८ महिलांच्या सहकार्याने स्वयंपाकाला प्रारंभ करतात. कोरेगाव पंचक्रोशीतील विविध व्यक्ती आणि संस्था अन्नधान्य, भाज्या, फळे, दुध वगैरेंच्या माध्यमातून अन्नदान करत आहेत. अद्यापपर्यंत हे कार्य अविरतपणे चालूच आहे. भविष्यात कोरोना संपल्यानंतरही गरीब आणि गरजू रुग्णांना अशा प्रकारचा आहार पुरवण्याचा समाजसेविका सौ. उज्ज्वला निकम यांचा मानस आहे. हा पुरस्कार मिळाल्याविषयी कोरेगाव पंचक्रोशीतून समाजसेविका उज्वला निकम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.