गोव्यात आजपासून १० वी आणि १२ वीच्या वर्गांना प्रारंभ

पणजी, २० नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यातील १० आणि १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्गांना २१ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. बहुतेक विद्यालयांनी विद्यार्थ्यांना गटागटांमध्ये विद्यालयात येण्याची सूचना केली आहे, तसेच बहुतेक विद्यालयांनी प्रतिदिन केवळ ५० विद्यार्थ्यांना विद्यालयात बोलावले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर ५ मासांच्या खंडानंतर शाळांच्या नियमित वर्गांना प्रारंभ होत आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गोवा शासनाने काही दिवसांपूर्वी १० वी आणि १२ वी इयत्तेतील वर्गांना प्रारंभ करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एका वर्गात केवळ १२ विद्यार्थींच बसू शकणार आहेत, तसेच परिसर आणि वापरातील वस्तू यांचे निर्जंतुकीकरण करणे, सामाजिक अंतर पाळणे, रांगेत उभे रहाण्यासाठी खुणा करणे आदींचा या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता असतांना शाळा प्रारंभ करणे कितपत योग्य ? – विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड

देशात विविध ठिकाणी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता असून त्यासाठीची सिद्धता केली जात आहे; मात्र गोव्यात सर्वकाही चांगले चालले आहे आणि जिल्हा पंचायत निवडणूक घेण्यासाठी चांगले वातावरण आहे, हे दर्शवण्यासाठी शाळांना प्रारंभ केला आहे. सर्वत्र कोरोना महामारी अजूनही आहे. गोवा पालक-शिक्षक संघाने शाळा चालू करण्यास विरोध दर्शवला आहे, तरी शासन शाळा चालू करण्याच्या भूमिकेवर का अडून रहात आहे ? असा प्रश्‍न ‘गोवा फॉरवर्ड’चे विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.