कुडाळ आणि सावंतवाडी येथील युवा धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान’
सिंधुदुर्ग – धर्म हा राष्ट्राचा पाया असून तोच सर्वश्रेष्ठ आहे. धर्मावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. देवतांचे होणारे विडंबन आणि देव-देश-धर्म यांची होणारी हानी रोखण्यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करायला पाहिजेत. धर्मावर आलेली ग्लानी दूर करण्यासाठी आपण स्वतः धर्माचरण करून सर्व समाजाला जागृत केले पाहिजे. आपल्यातील आत्मबळ वाढवण्यासाठी प्रतिदिन १ घंटा कुलदेवतेचा नामजप करायला हवा. हिंदु राष्ट्र स्थापनेची आत्मज्योत प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागृत होण्यासाठी प्रत्येक हिंदूला धर्माचरणाचे महत्त्व पटवून द्यायचे आहे. सध्या देशात अंतर्गत आणि बाह्य अशी दोन्ही युद्धे चालू आहेत. बाह्य युद्ध लढण्यासाठी सीमेवर भारतीय सैनिक सिद्ध आहेत. अंतर्गत युद्ध लढण्यासाठी जनतेने सक्षम व्हायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी केले. युवकांमधील शौर्य जागृत करणे, आपत्काळाच्या दृष्टीने साधनेचे आणि जीवनातील स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचे महत्त्व बिंबवणे यांसह युवा पिढीला राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी कृतीप्रवण करणे, या उद्देशाने कुडाळ आणि सावंतवाडी येथील युवा धर्मप्रेमींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नीना कोळसुलकर यांनी केले.
श्री. निरंजन चोडणकर पुढे म्हणाले की, राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचे केवळ बलीदानदिन साजरे करण्यापेक्षा त्यांचा आदर्श समोर ठेवूया. धर्माच्या रक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्या धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श आपल्यासमोर आहे. स्वतःमध्ये शौर्यजागृती करणे, साधनेचा संस्कार करणे, भक्ती आणि शक्ती निर्माण करणे, हे स्वरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून साध्य होऊ शकते. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सर्व युवकांनी स्वतःचे कर्तव्य, दायित्व आणि योगदान ओळखून प्रयत्नशील रहाणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकून स्वयंसिद्ध होऊया.