बेतुल – सायंकाळचा अस्ताला गेलेला सूर्य, अंगाला झोंबणारा वारा, आकाशात लुकलुकणार्या चांदण्या, मातीचा येणारा सुगंध, हुडहुडी भरवणारी थंडी, अशा प्रसन्न वातावरणात ३४१ वर्षांचा इतिहास असलेल्या ‘किल्ले बेतुल’ला जागे करत गोव्यातील बेतुल येथील किल्ल्यावर १५ नोव्हेंबरला जवळपास ३४१ दिवे प्रज्वलित करून भव्य शिवदीपोत्सव साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बेतुल येथे किल्ला बांधला. आजघडीला हा किल्ला पूर्णपणे इतिहासात गडप झाला होता. एकीकडे संपूर्ण देशात दिवाळी साजरी होत असतांना आपले हे गडकिल्ले अंधारात रहातात हे मनाला पटत नव्हते. गडकिल्लेही दिव्यांच्या प्रकाशात उजळावे, या हेतूने देशातील विविध भागांतून गोव्यात एकत्र येत स्थापन झालेला गोवा शिवजयंती उत्सव समिती गट आणि ‘शिवप्रेमी संघटना बेतुल’ यांनी किल्ले बेतुल येथे भव्य दीपोत्सव साजरा केला.
या वेळी सज्जन जुवेकर, सचिन काळे, विनोद साळुंखे, अमोल कोटे, सूजन खराडे, भूषण जुवेकर, सुधाकर जोशी, प्रदीप केरकर, जयेश केरकर, सरोज मोठे, अमित खवनेकर, दिलीप जुवाटकर, मयूर जाधव, राजेन्द्र दिघे, पांडुरंग वारे, रोहित घाटगे, अमित सावंत आदी शिवप्रेमी उपस्थित होते.