बंगालमध्ये दिवाळीत फटाके वाजवण्यावरील बंदीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

सध्या जीवन वाचवण्यापेक्षा मोठे मूल्य कोणतेच असू शकत नाही !

नवी देहली – सण महत्त्वाचे आहेत, हे आम्ही समजू शकतो; पण सध्या आयुष्यच धोक्यात आहे. सध्या जीवन वाचवण्यापेक्षा मोठे मूल्य कोणतेच असू शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने बंगालमध्ये दिवाळी आणि अन्य सणांच्या वेळी फटाके वाजवण्यावरील बंदीच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली.

कोलकाता उच्च न्यायालयाने काली पूजा, दिवाळी आणि छट पूजेच्या वेळी बंगालमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर फटाके विक्रीवरही न्यायालयाने बंदी घातली. एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना उच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता.