साधकांनो, साधनेत अडथळे आणणारे विचार मनात येत असतील, तर त्यावर स्वयंसूचना घ्या आणि साधनेचे प्रयत्न न झाल्यास ‘मनाला जाणीव होईल’, असे प्रायश्‍चित्त घ्या !

श्रीचित्शक्ती सौ. अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्रीचित्शक्ती सौ. अंजली गाडगीळ

‘काही साधकांच्या मनात विचार येतोे, ‘मी इतके प्रयत्न करूनही माझी साधनेत प्रगती होत नाही, याचे कारण काय आहे, ते आपण समजून घ्यायला हवे.’ तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना ‘आपली प्रगती होत नाही’, असे वाटत असते. संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय करणे, हीच त्यांची साधना असते. उपाय केल्याने त्यांची साधना होतच असते; परंतु त्यांचा जन्मोजन्मीचा त्रास अल्प होण्यासाठी त्यांनी केलेली साधना खर्च होत असते.

साधनेत अडथळे आणणारे विचार मनात येत असतील, तर त्यावर आपण स्वयंसूचना घ्यायला हव्यात. आपण स्वयंसूचना घेतली नाही, तर त्या विचारांचा आपल्यावर होणारा परिणाम नष्ट होण्यासाठी दिवसभर केलेली साधना खर्ची पडते. स्वयंसूचना घेतल्या, तर मनाला ‘टॉनिक’ मिळते आणि आपण चांगल्या प्रकारे साधना करू शकतो. यासाठी आपणच आपल्या मनाचा आढावा घेतला पाहिजे आणि स्वतःकडून साधनेचे प्रयत्न न झाल्यास स्वतःहून प्रायश्‍चित्त घ्यायला पाहिजे, उदा. स्वयंसूचना सत्रांची नियोजित संख्या रात्रीपर्यंत पूर्ण झाली नाही, तर प्रसंगी देहाला त्रास होईल असे योग्य ते प्रायश्‍चित्त घ्यावे. देहाला त्रास झाला, तर मन आपोआप स्वयंसूचना सत्रे पूर्ण करण्याकडे लक्ष देईल.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (१५.४.२०२०)