५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चिंचवड, पुणे येथील कु. शौर्या विशाल पुजार (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. शौर्या विशाल पुजार ही एक आहे !

चि. शौर्या विशाल पुजार हिचा वैशाख कृष्ण पक्ष चतुर्थी (११.५.२०२०) या दिवशी तिथीनुसार तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

कु. शौर्या पुजार

सनातन परिवाराच्या वतीने चि. शौर्या पुजार हिला वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात खालील प्रकारची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. गर्भधारणेपूर्वी

१ अ. वारंवार गर्भपात होणे : ‘माझ्या विवाहानंतर मला मूल होण्यासाठी ७ वर्षे वाट पहावी लागली. वैद्यकीय पडताळणीमध्ये कोणतेही विशेष दोष निदर्शनास येत नव्हते; मात्र प्रत्येक वेळी गर्भधारणा झाली की, पहिल्या ८ आठवड्यांच्या आतच माझा गर्भपात होत होता.

१ आ. अनुभूती – एकदा रुग्णालयात गर्भपातानंतर डोळे मिटून नामजप करतांना पोटावर नाचणारा बाळकृष्ण दिसणे आणि त्याची बालक्रीडा पहातांना पोटात होत असलेल्या वेदना नाहीशा होणे, तसेच पूर्वी गर्भपात झालेले जीव पिवळ्या गोळ्यांच्या रूपात वरवर जातांना दिसणे : चि. शौर्याच्या वेळी दिवस रहाण्याच्या आधी माझा एकदा गर्भपात झाला होता. त्या गर्भपाताच्या वेळी रुग्णालयात असतांना मला एक अनुभूती आली. गर्भपातानंतर आधुनिक वैद्यांनी मला त्या वेळी दिलेली भूल उतरत आली होती. मी आईकडे पाणी मागितले. तिने मला ‘पाणी पिण्यासाठी अजून थोडा वेळ थांबायला हवे’, असे सांगितले. मी तशीच डोळे मिटून पडून राहिले. माझ्या पोटात प्रचंड वेदना होत होत्या; पण देवाच्या कृपेने माझा नामजप चालू होता. मी डोळे मिटून नामजप करत असतांना मला माझ्या पोटावर नाचणारा बाळकृष्ण दिसू लागला. मी त्याच्या बालक्रीडा पहाण्यात दंग झाले आणि मला माझ्या वेदना नाहीशा झाल्याचे लक्षात आले. त्याच वेळी मला काही पिवळे गोळे वर वर जातांना दिसले. तेव्हा ‘या आधी माझे जे गर्भपात झाले, तेच हे जीव होते’, असे मला जाणवले. ‘ही अनुभूती अनुभवतांना त्यात किती घंटे गेले, ते मला कळलेच नाही.’ शेवटी आईने मला पाणी पिण्यासाठी उठवले. मी ही अनुभूती आईला सांगितली. तेव्हा ती ऐकून तिचीही भावजागृती झाली.

१ इ. देवद आश्रमात असतांना भावजागृतीचे प्रयत्न होऊ लागल्यावर त्यातून आनंद अनुभवता येणे : नोकरी करणार्‍या स्रियांना गर्भपातानंतर ४५ दिवसांची सुट्टी मिळते. मी ही सुट्टी या वेळी झालेल्या गर्भापातानंतर घेतली होती. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मला आश्रमात जाऊन रहाण्याची तीव्र इच्छा झाली. माझ्या इच्छेला यजमानांनी सहमती दर्शवली आणि १५ दिवसांसाठी मी सनातनच्या पनवेल येथील देवद आश्रमात रहायला गेले. तिथे मी दैनिक कार्यालयात सेवा करत होते. तेव्हा सौ. रूपाली वर्तक यांच्याकडून मला वास्तवदर्शी मार्गदर्शन मिळाले. देवद आश्रमातून घरी परत येतांना मी ही शिदोरी समवेत घेऊनच आले होते. देवद आश्रमातील माझ्या वास्तव्यानंतर माझ्याकडून भावजागृतीच्या प्रयत्नांना आरंभ झाला. ‘भावजागृतीच्या प्रयत्नात इतका आनंद असतो’, हे मी इथे प्रथमच अनुभवत होते.

१ ई. वार्ताहर शिबिरासाठी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे जाण्याची संधी मिळून तेथे संतांचे मार्गदर्शन मिळणे आणि घरी जातांना ‘लवकरच गर्भधारणा होणार असून ती यशस्वी होणार’, असा विचार तीव्रतेने मनात येणे : त्यानंतर काही कालावधीनंतर मला वार्ताहर शिबिरासाठी सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. शिबिरार्थींसाठी संतांचे मार्गदर्शन होते. संतांच्या केवळ दर्शनानेच माझ्या सर्वांगावर शहारे आले. मी त्यांना मला बाळ होण्याविषयी काहीही बोलले नव्हते, तरीही शिबिर संपल्यानंतर घरी परतल्यावर ‘आता लवकरच आपल्याला दिवस रहाणार असून या वेळी ही गर्भधारणा यशस्वी होणार’, असे मला मनोमन वाटत होते आणि तसेच झाले. जवळपास एका मासानंतर मला मी गर्भवती असल्याचे समजले.

२. गर्भधारणेनंतर

२ अ. ‘जन्म, विवाह आणि मृत्यू हे प्रारब्धाने होतात’, या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाक्याची प्रचीती येणे : मी गर्भवती असल्याची निश्‍चिती करण्यासाठी आधुनिक वैद्यांकडे गेले होते. तेव्हा माझी आई आणि माझ्या सासूबाई माझ्यासाठी रामरक्षा म्हणत होत्या. आधुनिक वैद्यांनी गर्भधारणा झाल्याचे आणि गर्भ सुस्थितीत असल्याचे सांगितले. तेव्हा मला प.पू. गुरुमाऊलींविषयी फार कृतज्ञता वाटली. गुरुमाऊलींचे ‘जन्म, विवाह आणि मृत्यू हे प्रारब्धाने होतात’, हे वाक्य माझ्या कानांत घुमू लागले.

२ आ. गर्भधारणा झाल्याचे समजल्यापासून प्रार्थना आणि नामजप पुष्कळ आर्ततेने होणे अन् संतांचे सत्संग आणि त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करण्याचा प्रयत्न करणे : चि. शौर्याच्या वेळी गर्भधारणा झाल्यावर देवाने माझ्याकडून दत्ताचा आणि कुलदेवीचा नामजप पुष्कळ भावपूर्ण अन् आर्ततेने करवून घेतला. मला विविध संतांचे मार्गदर्शन आणि सत्संग मिळाला. मी सनातनच्या ‘दत्त’ या ग्रंथामध्ये आम्हा उभयतांचे छायाचित्र ठेवले होते, तसेच आम्ही संतांनी सांगितलेल्या काही विशिष्ट उपाययोजनाही चालू केल्या होत्या. या सर्व गोष्टी करण्यासाठी माझ्या सासू-सासर्‍यांनी मला पोषक वातावरण निर्माण करून दिले आणि वेळोवेळी ‘तुझे प्रयत्न फलद्रूप होतील’, असा आश्‍वासक आशीर्वादही दिला. ध्यासपूर्वक केलेली प्रार्थना, टोकाचा बाळगलेला संयम आणि धीर, तसेच परम दयाळू परात्पर गुरुमाऊली यांच्या कृपाप्रसाद यांचा प्रकट आविष्कार म्हणजे माझ्या पोटी जन्माला आलेले बाळ ‘शौर्या’ !

२ इ. गर्भारपणात होणारा इतर शारीरिक त्रास, तसेच पोटावर घेण्यात येणार्‍या इंजेक्शन्सचा त्रास परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेने न जाणवणे : माझ्या यापूर्वी झालेल्या गर्भपातांच्या अनुभवांमुळे आधुनिक वैद्य माझ्याविषयी अधिक सजग होते. मला गर्भारपणात प्रतिदिन काही संप्रेरकांचे ‘इंजेक्शन’ पोटावर घ्यावे लागले. आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘हे ‘इंजेक्शन’ घेतांना मुली पुष्कळ आरडाओरडा करतात; पण तू शांतपणे घेतेस. तुला त्रास होत नाही का ?’’ ‘गुरुमाऊली, ‘एक सुई टोचली जाणे’ या व्यतिरिक्त आपल्या कृपेमुळे मला काहीच त्रास होत नव्हता. मला गर्भारपणात उलट्या होणे किंवा मळमळणे असा कोणताही त्रास झाला नाही. गुरुमाऊली, आपण या जिवावर केलेली ही केवढी मोठी कृपा आहे !’

२ ई. गर्भधारणेच्या चौथ्या मासात एका चाचणीच्या अहवालानुसार आधुनिक वैद्यांनी बाळामध्ये काही समस्या असण्याची शक्यता वर्तवणे : गर्भधारणा झाल्यावर चौथ्या मासात झालेल्या एका चाचणीच्या अहवालानुसार बाळामध्ये काही समस्या असण्याची शक्यता आधुनिक वैद्यांनी वर्तवली. त्यांनी मला अप्रत्यक्षरित्या गर्भपाताचाही सल्ला दिला; पण त्या वेळी माझ्या मनात एकच विचार होता, ‘हे बाळ प.पू. गुरुमाऊलींचा प्रसाद आहे. त्यांना अपेक्षित असेच सारे होणार आहे.’ या विचाराने माझ्या मनाला उभारी मिळाली. त्याच वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला काही नामजपादी उपाय करण्यास सांगितले होते. देवाने ते उपाय माझ्याकडून करवून घेतले. याच कालावधीत एक संत माझ्या यजमानांच्या आयुष्यात आले. त्यांना आम्ही आमची समस्या सांगितली. तेव्हा त्यांनीही आम्हाला पुष्कळ आश्‍वस्त केले. ‘या संतांच्या रूपात आम्हाला गुरुमाऊलींचे प्रेमळ रूप पहायला मिळाले’, असे मला जाणवले. या काळात मला साधक आणि संत यांच्या माध्यमातून जो दिलासादायक प्रतिसाद मिळत होता, त्यासाठी माझ्याकडे कृतज्ञतेविना शब्दच नाहीत. गुरुमाऊली, आपल्या कृपेने या चाचणीचा अहवालच चुकीचा असल्याचे नंतर आम्हाला कळले.

२ उ. आईच्या धीरोदात्त आणि सकारात्मक वागण्यामुळे मनाची स्थिती चांगली रहाणे : माझ्या आईने या काळात माझे सर्वकाही तर केलेच; पण त्याचसमवेत अनेक आध्यात्मिक गोष्टी सांगून माझ्या मनाची स्थिती जराही ढळू दिली नाही. ‘तिने हे सगळे इतक्या सराईतपणे केले की, तिच्या मनात ‘काही विपरीत घडेल’, असा पुसटसाही विचार आला नसावा’, असे वाटते. देवाने ‘मला इतकी धीरोदात्त आई दिली’, यासाठीही मला देवाचरणी अपरिमित कृतज्ञता वाटते.

३. जन्माच्या वेळी

३ अ. सातव्या मासातच बाळंतपणाच्या कळा येण्यास आरंभ होणे आणि सातव्या मासात बाळ जन्माला येणे : सातव्या मासात एक दिवस मला कार्यालयात असतांना चालतांना जड वाटू लागले. मी त्वरित घरी जाऊन आधुनिक वैद्यांकडे पडताळणीसाठी गेले. दुसर्‍या दिवशी रात्री मला बाळंतपणाच्या कळा चालू झाल्या. माझे लक्ष घरात असलेल्या श्रीरामाच्या चित्राकडे वारंवार जात होते. ‘माझे प्रत्येक मिनिटाला ध्यान लागतेय कि काय ?’, असेच मला वाटत होते. तेव्हा भगवंताची ही लीलाच मला अनुभवता आली. प्रारब्ध जसे असेल, तसे ते सोसावे लागतेच; पण ‘ते प्रारब्ध भगवंतच सुसह्यही करून देतो’, याची ती प्रचीती होती. दुसर्‍या दिवशी सकाळी मी रुग्णालयात भरती झाले आणि काही घंट्यांमध्येच बाळ जन्माला आले. बाळ जन्माला आल्या आल्या रडले आणि गुरुकृपेची आम्हाला पुनःश्‍च प्रचीती आली !

४. जन्मानंतर

४ अ. वय जन्म ते ३ मास

४ अ १. प.पू. पांडे महाराजांची अनुभवलेली प्रीती ! : बाळ अपुर्‍या दिवसांचे असल्याने बाळाला दीड मास अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले. या कालावधीत बाळाच्या प्रकृतीत अनेक चढउतार होत राहिले. या कालावधीत प.पू. पांडे महाराजांनी आम्हा उभयतांना अतिशय प्रेमाने मानसिक आणि आध्यात्मिक आधार दिला. त्यांनी नियमितपणे यजमानांकडे बाळाच्या प्रकृतीची पुष्कळ आस्थेने चौकशी केली आणि माझ्याकडूनही नियमित नामजपादी उपाय करवून घेऊन मला आनंदात ठेवले.

४ अ २. अनुभूती – बालहनुमान बाळाचे रक्षण करत असल्याचे अनुभवणे : मी बाळाला भेटण्यासाठी अतीदक्षता विभागात जात असे. तेव्हा मला गुरुदेवांच्या कृपेमुळे ‘बाळाला ठेवलेल्या काचेच्या पेटीभोवती बालहनुमान हातात गदा घेऊन उड्या मारत बाळाचे रक्षण करत आहे’, असे सूक्ष्मातून दिसायचे.

४ अ ३. आनंदी आणि समाधानी : अतीदक्षता विभागातील परिचारिकांनी बाळाचे डोळे पुष्कळ बोलके असल्याचा अभिप्राय अनेक वेळा दिला. एका परिचारिकेने ‘हे बाळ अत्यंत समाधानी आणि आनंदी आहे’, असे सांगितले.

४ अ ४. परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेमुळे बाळाला रुग्णालयातून लवकर घरी सोडणे आणि त्याने योग्य वेळी प्रगती करणे : बाळाचे वजन २ किलो होण्याआधीच बाळाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बाळाला रुग्णालयातून घरी घेऊन येतांना आम्ही अतीदक्षता विभागातील सर्व परिचारिका आणि आधुनिक वैद्य यांना सनातनचे ग्रंथ भेटस्वरूपात दिले. आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे अपुर्‍या दिवसांनी जन्मलेल्या बाळाची विशेष काळजी देवानेच आमच्याकडून करवून घेतली. बाळानेही कधी अनावश्यक किरकिर केली नाही. आधुनिक वैद्यांना अपेक्षित अशा प्रमाणात बाळाचे वजन वाढत गेले आणि बाळाने योग्य वेळी प्रगतीचे टप्पे गाठले. ही गुरुमाऊलींची आमच्यावर सढळहस्ते झालेली कृपाच होती. बाळ तिसर्‍या मासातच एकदा स्वतःहून पालथे पडले आणि त्याने ‘आई’ असा शब्द उच्चारला.

४ आ. वय ४ ते ८ मास

४ आ १. पू. मोहनबुवा रामदासी यांच्या माध्यमातून संतांचे आशीर्वाद मिळणे : चि. शौर्या ४ मासांची असतांना घरी समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी आले होते आणि त्यांनी तिला मांडीवर घेतले. त्या वेळी ते म्हणाले, ‘बाळ ऊर्ध्वमुखी (आध्यात्मिक उन्नती करणारे) आहे.’

४ आ २. कार्यालयात असणार्‍या पाळणाघरात शौर्या लवकर रूळणे आणि ‘बाप्पा’ असे म्हणणे : शौर्या ७ मासांची झाल्यावर मी परत कार्यालयात जाऊ लागले आणि तिथे पाळणाघराची सोय असल्याने तिलाही समवेत घेऊन जाऊ लागले. अन्य बाळांच्या तुलनेत ती पाळणाघरात लवकर रूळली. पाळणाघरात असतांना ती ‘बाप्पा’ असे म्हणत असे आणि नमस्काराची मुद्रा करत असे. यामुळे तेथील एका मावशींनी ‘तुम्ही गरोदर असतांना देवाची पुष्कळ साधना केली होती का ?’, असे विचारले.

४ आ ३.  देवाची ओढ

अ. ती सातव्या मासांपासून आम्ही झोपत असलेल्या पलंगाच्या भोवतीचे नामपट्टयांचे मंडल पाहून ‘बाप्पा, बाप्पा’ असे म्हणते. प्रत्येक नवीन कृती करतांना अथवा झाल्यावर ती ‘बाप्पा’ म्हणते. तेव्हा ‘ती जप करते’, असे आम्हाला वाटते.

आ. आमच्या घरात सनातन संस्थेने प्रकाशित केलेले कृष्णाचे आणि कृष्ण-अर्जुनाचे चित्र आहे. तिने प्रथम ही चित्रे पहिली. तेव्हा ‘लहान कृष्णबाप्पा आणि मोठा कृष्णबाप्पा कुठे आहे ?’, हे तिने अचूक सांगितले. ती आठ मासांची असतांना ‘बाळकृष्ण लोणी कसा खातो ? सुदर्शन चक्र कसे फिरवतो ?’, हे सांगत असे.

इ. मी माझ्या आईकडे कितीही दिवसांनी गेले, तरी शौर्याला ‘रामराया कुठे आहे ?’, असे विचारल्यावर ती तेथील रामाच्या चित्राकडे हात दाखवते. ‘रामाच्या चित्राला हात लावणे आणि त्याच्या चरणांवर डोके ठेवणे’, यात तिला पुष्कळ आनंद मिळतो.

ई. ती घरातील सगळ्यांना उदबत्तीची विभूती लावते. अगदी तिच्या खेळण्यातील प्राण्यांनाही ती विभूती लावते.’

– सौ. प्राजक्ता विशाल पुजार (चि. शौर्याची आई), चिंचवड, पुणे.

उ.  शौर्या लहान असल्यापासून भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम यांची चित्रे पाहून ‘बाप्पा’, असे म्हणायची. आता कोणत्याही देवतेचे चित्र दिसल्यावर ती ‘बाप्पा’, असे म्हणते. खेळतांना किंवा स्वतःशीच बोलत असतांना ती ‘राम, राम’ असे बर्‍याच वेळा म्हणते. त्या वेळी ‘तिचे रामासमवेत काहीतरी बोलणे चालू आहे’ किंवा ‘ती रामाचा जप करत आहे’, असे वाटायचे.

४ इ. वय ९ मास ते २ वर्षे

४ इ १. आनंदी : शौर्या सतत आनंदी असते. ती नेहमी झोपेतून हसत उठते. ती लहान लहान गोष्टींमुळेही आनंदी होते.’

– सौ. प्राजक्ता आणि श्री. विशाल पुजार (शौर्याचे वडील)

४ इ २.  स्वच्छतेची आवड : ‘शौर्या दूध पितांना एखादा थेंब जरी खाली पडला, तरी तिला लादी पुसायचे फडके आणून तो पुसायचा असतो. त्याविना ती राहिलेले दूध पीत नाही. घरात काही कचरा आढळल्यास ती उचलून आणून देते आणि केराच्या टोपलीत टाकायला लावते.’  – श्री. विशाल पुजार

४ इ ३. जिज्ञासा : ‘तिचे निरीक्षण उत्तम आहे आणि तिला प्रत्येक नवीन गोष्टीत जिज्ञासा असते. ‘खेळण्यांमध्ये ‘सेल’ कसा भरायचा ?’ ‘फुगा कसा फुगवायचा ?’, या सगळ्या गोष्टींमध्ये तिला जिज्ञासा असते.’- श्री. पुष्कर पाशुपत (शौर्याचा मामा), बेंगळुरू

४ इ ४. प्रेमळ

अ. ‘शौर्यला कुत्रे, मांजर, पक्षी आणि प्राणी पहायला फार आवडतात. ती त्यांना पहिल्यावर ‘ये, ये’, असे बोलवते.’

– सौ. प्राजक्ता आणि श्री. विशाल पुजार

आ. ‘शौर्या प्रेमळ आहे आणि ती सर्वांवर सारखेच प्रेम करते. एका आजीला पापी दिल्यावर ती लगेच दुसर्‍या आजीलाही स्वतःहून पापी देते.

इ. एकदा शौर्याचे बाबा जेवत असतांना पटलावरील ताटातून गरम आमटी त्यांच्या अंगावर सांडली. ती तेव्हा पटलावर बसली होती. ते बघून ती पुष्कळ हळहळली आणि बराच वेळ ‘बाबांना काय झाले ?’, असे विचारत होती.

४ इ ५. उत्तम आकलनक्षमता

अ. तिची अनेक बालगीते, ‘मोरया मोरया’, शुभंकरोति’ असे काही श्‍लोक पाठ आहेत. ती कृष्णबाप्पाची गोष्ट सांगते.’  – श्री. दत्तात्रय पुजार आणि सौ. अनुराधा पुजार (शौर्याच्या वडिलांचे आई-वडील) आणि श्रीमती स्नेहल पाशुपत (शौर्याच्या आईची आई), चिंचवड, पुणे

आ. ‘शौर्याला एखादी गोष्ट शिकवली की, तिला परत सांगावे लागत नाही. तिला ते लगेच समजते आणि ती ते आचरणात आणते.’

– सौ. प्राजक्ता आणि श्री. विशाल पुजार

४ इ ६. इतरांना साहाय्य करणे : ‘घरी आजोबा रात्री अंथरूण घालत असतांना ती त्यांना साहाय्य करते. ‘हे बाबांना नेऊन दे’, म्हटले, तर लगेच नेऊन देते.’ – श्री. विशाल पुजार

४ इ ७. आज्ञापालन : ‘शौर्या तिच्या आजीकडे बेंगळूरूला गेल्यावर आजीसमवेत नियमित पूजा करत असे. तिच्या आजीने तिला ‘बाप्पाची नैवेद्याची साखर आणि पाणी बाप्पाला विचारल्याविना घ्यायचे नाही’, असे सांगितले. तेव्हापासून ती प्रतिदिन पूजा झाल्यावर ‘बाप्पा, साखर आणि पाणी घेऊ का ?’, असे विचारून नैवेद्याची साखर आणि पाणी घेते.’ – श्रीमती स्नेहल पाशुपत, सौ. अनुराधा आणि श्री. दत्तात्रय पुजार

४ इ ८. त्यागी : ‘शौर्याला इतरांना काहीतरी देण्यात आनंद मिळतो. ती अन्य मुलांप्रमाणे दुसर्‍यांच्या हातातील खेळणी कधीही ओढून घेत नाही. तिला एखादी गोष्ट अन्य कोणाला द्यायला सांगितल्यावर ती लगेच देते. शौर्या अन्य मुलांप्रमाणे मारामारी करत नाही.’

– सौ. प्राजक्ता पुजार

४ इ ९. भाव 

अ. ‘पूजा करत असतांना देवतांना अष्टगंध आणि चंदन लावतांना शौर्या बाप्पाला ‘पाऊ (चंदन) लावते’, कुंकू लावतांना ‘तिटी लावते’ असे म्हणते.’ – श्रीमती स्नेहल पाशुपत, श्री. दत्तात्रय आणि सौ. अनुराधा पुजार.

आ. ‘ती पाळणाघरात असतांना सतत ‘बाप्पा’ असे म्हणत असल्याने तिच्यासाठी श्रीकृष्णाचे एक चित्र मी पाळणाघरात ठेवले आहे. ती ‘बाप्पा’ म्हणू लागल्यावर तेथील मावशी ते चित्र तिला देतात. एकदा ते तिच्या हातून पडले आणि तिच्या पायाखाली आले. तेव्हा त्या मावशी तिला रागावल्या आणि त्यांनी तिला कान पकडून देवाची क्षमा मागायला सांगितली. त्या वेळी तिने अनेक वेळा कान पकडून क्षमा मागितली.

इ. ती प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र ‘बाप्पा’ म्हणून छातीशी धरते. तिला झोपायला खोलीत नेल्यावर ती पलंगाशेजारील त्यांच्या छायाचित्राला नमस्कार करून मगच झोपते.

४ इ १०. अनुभूती : शौर्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी घरी समर्थ रामदासस्वामींच्या पादुकांचे पूजन झाले आणि तिला पुनःश्‍च संतांचे आशीर्वाद मिळाले.

स्वभावदोष : हट्टीपणा, एकटे खेळत नाही.’               (समाप्त)

– सौ. प्राजक्ता विशाल पुजार, चिंचवड, पुणे. (१९.५.२०१९)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक