मुंबई – राज्यघटनेच्या कलम १६४ (४) नुसार उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर कायम रहाण्यासाठी पदाची शपथ घेतल्यापासून ६ मासांच्या आत विधानसभा आणि विधान परिषद यांचे सदस्य होणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ या दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २८ मे या दिवशी ६ मासांचा कालावधी पूर्ण होत आहे. तोपर्यंत निवडणुकीचा दिनांक घोषित झाला नाही, तर मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळाला त्यागपत्र देऊन पुन्हा शपथ घ्यावी लागेल, असे राज्याचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे सध्या विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. २४ एप्रिल या दिवशी विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत; मात्र राज्यावर कोरोनाचे सावट असल्यामुळे निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीचा दिनांक घोषित केलेला नाही.