खासगी डॉक्टरांनी चिकित्सालये बंद ठेवून रुग्णांची असुविधा करू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – कोरोनाबाधित रुग्णांच्या व्यतिरिक्त अन्यही रुग्ण डॉक्टरांकडे येत असतात. त्यामध्ये वयोवृद्ध, महिला, मुले असतात. त्यांची असुविधा होऊ नये, यासाठी खासगी डॉक्टरांनी स्वत:ची चिकित्सालये बंद करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. २६ मार्च या दिवशी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे संवाद साधला. या वेळी त्यांनी वरील सूचना केली.

ठाकरे पुढे म्हणाले की,

१. आपल्या जिल्ह्यात परदेशांतून कुणी प्रवास करून आले असेल, तर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांची माहिती घ्यावी. अशा व्यक्तींची कोरोना चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

२. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित राहील, नागरिकांना औषधे मिळतील, याची काळजी घ्यावी. शेतकरी आणि विशेषत: शेतीच्या कामासाठी ये-जा करणारे यांना अडथळा होणार नाही, हे पहावे.

३. राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येऊन थांबलेल्या नागरिकांची आम्ही इथेच काळजी घेऊ. ‘लॉकडाऊन’ पूर्ण होईपर्यंत त्यांना त्यांच्या राज्यात पाठवणे शक्य होणार नाही. महाराष्ट्रातील लोक जर अन्य राज्यांत अडकले असतील, तर त्या राज्यांनीही त्यांची काळजी घ्यावी.

४. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी गाडी वाहतूक पोलीस अडवणार नाहीत; पण कोणत्याही परिस्थितीत अशा वाहनांमधून त्या कामाशी संबंधित नसलेले लोक प्रवास करतांना आढळले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

५. कोरोना विरुद्धच्या या लढाईत आपण अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने जात आहोत. जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्येक कामाची योग्य विभागणी करावी. अधिकार्‍यांना दायित्व वाटून द्यावे. पोलिसांवर मोठे दायित्व आहे. त्यांनी डोके शांत ठेवावे.