रत्नागिरीत दुचाकी वाहनावरून फिरण्यास बंदी ! – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

रत्नागिरी – दळणवळण बंदीमुळे रत्नागिरीत पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशाही परिस्थितीत काही लोक विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत. याला आळा घलण्यासाठी रत्नागिरीत दुचाकी वाहनावरून फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

या निर्णयामुळे पोलीस आता दुचाकी चालकांवर लक्ष ठेवणार असून जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरासमवेत खेड तालुक्यातील भरणे नाका, भरणे, भडगाव, दस्तुरी, खेड शहर, भोस्ते या परिसरांत दुचाकी वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणार्‍या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. दुचाकी वाहन चालवतांना निदर्शनास आल्यास त्यांचे वाहन पुढील १४ दिवसांसाठी कह्यात घेऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.