५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. अक्षताली अक्षय सुपेकर (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अक्षताली अक्षय सुपेकर ही एक आहे !

पुणे येथील चि. अक्षताली सुपेकर हिचा तिथीनुसार २९.३.२०२० या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. अक्षताली सुपेकर

चि. अक्षताली सुपेकर हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात खालील प्रकारची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

१. जन्मापूर्वी

‘मी गरोदर आहे, हे मला समजल्यापासून ‘हे बाळ माझे नसून श्रीकृष्णाचेच आहे’, असे मला सारखे जाणवत असे.

१ अ. पहिला मास : पहिली ‘सोनोग्राफी’ केली, तेव्हा बाळाभोवती पांढरा प्रकाश दिसून मला शांत वाटले.

१ आ. तिसरा मास : या मासात सोनोग्राफी केली. तेव्हा बाळ सात्त्विक आणि आनंदी असल्याचे जाणवले.

१ इ. चौथा मास : या मासात मी बाळासाठी एक छोटासा विधी केला होता. तेव्हा ‘बाळ मी करत असलेला नामजप शांतपणे आणि एकाग्र होऊन ऐकत आहे’, असे मला जाणवून आनंद जाणवला.

१ ई. पाचवा मास : या मासात ‘सोनोग्राफी’मध्ये बाळाच्या एका बाजूचे परीक्षण झाले. बाळ पालथे असल्याने बाळाच्या पुढील बाजूचे परीक्षण करण्यास वेळ लागला. आधुनिक वैद्यांनी मला बाहेर फेर्‍या मारण्यास सांगितले. त्यानंतर परीक्षण केल्यावरही बाळाच्या स्थितीत पालट झालेला नव्हता; म्हणून पुन्हा जरावेळ मी बाहेर येऊन थांबले. तेव्हा देवाने मला रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र ऐकण्याचे सुचवले. ते ऐकल्यावर लगेचच मला बाळाची हालचाल जाणवू लागली. त्यानंतर परीक्षण केले असता बाळाच्या स्थितीत पालट झाला होता. त्यामुळे पुढील प्रक्रिया व्यवस्थित झाली. हे सर्व मी माझ्या कुटुंबियांना सांगितल्यावर सर्वांना आश्‍चर्य वाटले.

१ उ. सहावा मास : या मासात मला अचानक रुग्णालयात भरती करावे लागले. तेव्हा मला ‘किडनी स्टोन’ असल्याचे समजले. पुष्कळ वेदना होत असतांनाही ‘देव माझे आणि बाळाचे रक्षण करत आहे’, असाच माझा भाव होता. मला बाळही आतून चांगला प्रतिसाद देत होते.

१ ऊ. सातवा मास : सातव्या मासात ओटी भरण्याचा विधी केला. तेव्हा मला अधिक सात्त्विकता जाणवत होती.

१ ए. गरोदरपणात बाळाने सात्त्विक गोष्टींना दिलेला प्रतिसाद

१ ए १. रामरक्षा, मारुतीस्तोत्र आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकणे : मी प्रतिदिन रामरक्षा, मारुतिस्तोत्र आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकत होते. एखाद्या वेळी हे ऐकण्यास उशीर झाला, तर बाळ मला आतून ते ऐकण्याची आठवण करून द्यायचे. मी प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करत होते. दैनिकात आलेली दैवी बालकांची गुणवैशिष्ट्ये मी बाळाला वाचून दाखवत असे आणि बाळाला सांगत असे, ‘आपल्यालाही असे गुण आत्मसात करायचे आहेत.’ त्या वेळी बाळही आतून आनंदाने हे सर्व ऐकत असल्याची जाणीव मला सतत होत होती.

१ ए २. बाळ मला सतत सकारात्मक रहाण्याची आणि नामस्मरण करण्याची आठवणही करून देत असे.

१ ए ३. प्रसुतीसाठी शस्त्रकर्म विभागात नेतांना मोठ्याने श्रीकृष्णाचा नामजप करणे : मला प्रसुतीसाठी रुग्णालयात भरती केले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेतच आहेत’, असे मला सतत जाणवत होते. मला शस्त्रकर्म विभागात नेले, तेव्हा मी मोठ्याने श्रीकृष्णाचा नामजप करत होते.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते १ मास

१. बाळ जन्माला आले, तेव्हा वातावरणात शीतलता जाणवत होती. बाळाला माझ्या छातीवर ठेवले, तेव्हा मला पुष्कळ शांत वाटले. बाळाची स्वच्छता झाल्यावरही ते रडले नाही. बाळाने लगेच डोळे उघडले. रुग्णालयातील ५ दिवसांत मी बाळासह नामजप करायचे. बाळाला भाववृद्धीसाठी प्रयोग सांगतांना बाळ ते शांतपणे ऐकायचे. रुग्णालयात असतांना बाळ मधेच हात उंचावून रडायचे. तेव्हा ‘बाळ युद्ध करत आहे’, असे आम्हाला जाणवायचे.

२. माझे बाबा बाळासह नामजप करतांना बाळ त्यांना उत्तम प्रतिसाद देते. बाळाला घेऊन ते नामजप करतात, तेव्हा ‘त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय होत आहेत’, असे त्यांना वाटते.

२ आ. वय १ ते ४ मास

२ आ १. बाळाला भेटायला आलेले प्रत्येक जण ‘बाळ सात्त्विक आहे’, असे सांगत होते.

२ आ २. सात्त्विकतेची आवड

अ. बाळाला ‘इंजेक्शन’ दिल्यावर ते रडत असतांना त्याला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दाखवल्यानंतर बाळ लगेच शांत होऊन हसायचे आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रासह बोलायचे.

आ. बाळाला सात्त्विक खेळणी आवडतात. बाळाला मोरपीस पुष्कळ आवडते.

इ. आपण नामजप करतांना तेसुद्धा ओठ हलवून नामजप करते.

ई. दूरदर्शनवरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिका बाळाला आवडते आणि त्यात विज्ञापन लागले की, ते रडते.

उ. ते पुष्कळ क्रियाशील आहे. झोपेतून उठतांना ते नेहमी हसत उठते.

२ इ. वय ५ ते ७ मास

२ इ १. परिस्थितीशी जुळवून घेणे : आम्ही पुण्याला माझ्या सासरी आलो. तेव्हा मला वाटले, ‘जागा पालटल्याने अक्षताली रडेल; परंतु तिने काहीही त्रास न देता तेथील परिस्थितीशी जुळवून घेतले. ती सर्वांकडे जाते आणि सर्वांना हवीहवीशी वाटते.

२ इ २. झोपतांना हाताच्या विविध मुद्रा करणे : अक्षताली कोणाकडे असेल, तर विविध मुद्रा करून हात हलवते. तेव्हा ती आध्यात्मिक उपाय करत आहे’, असे मला जाणवते. ती झोपतांना हाताच्या विविध मुद्रा करून झोपते.

२ इ ३. बोललेले समजण्याची क्षमता असणे : माझ्या खोलीमधे मला नामपट्ट्यांचे वास्तूछत लावायचे होते; परंतु मला साहाय्याला कोणीही नव्हते आणि अक्षतालीसुद्धा रडत होती. तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘तू रडू नकोस. आपल्याला घरात सात्त्विकता हवी; म्हणून मी वास्तूछत लावते. तू शांत रहा.’’ त्यानंतर लगेच तिने मला हसून प्रतिसाद दिला.

२ इ ४. सात्त्विक गोष्टींची आवड 

अ. अक्षतालीला सात्त्विक अलंकार घालण्यास आवडतात. पैंजण, बांगड्या आणि गळ्यातील हार घालतांना ती न रडता व्यवस्थित आवरून देते.

आ. दैनिक ‘सनातन प्रभात’ तिच्या हातात दिल्यावर ती वाचत असल्यासारखे करते.

इ. ती भगव्या रंगाकडे लगेच आकर्षित होते.

२ इ ५. निरीक्षणक्षमता : अक्षताली सर्व कृती अधिक गतीने करते. मोठी माणसे करत असलेल्या प्रत्येक कृतीचे ती निरीक्षण करते. तिची निरीक्षणक्षमता पुष्कळ चांगली आहे.

३. बाळाचे स्वभावदोष

हट्टीपणा करणे

‘हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेने मला हे सर्व शिकायला मिळाले. देवा, तूच या तुझ्या बालरूपाची सेवा करण्याची संधी मला दिलीस’, याविषयी तुझ्या चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘गुरुमाऊली, तुम्हाला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न आमच्याकडून होऊ द्या. तुम्हीच आम्हाला घडवा’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना !’

– सौ. चैताली अक्षय सुपेकर (कु. अक्षतालीची आई) (पूर्वाश्रमीची कु. चैताली बाळासाहेब पोटे), पुणे (१.३.२०२०)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. 

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक