‘कुठल्याही लिखाणातून सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. तो व्यक्तीचे मन आणि बुद्धी येथपर्यंत कसा पोचतो ? लिखाण करतांना शब्दांमध्ये अंतर ठेवल्याने कोणते लाभ होतात ? व्यक्तीच्या मेंदूचे कार्य करण्याचे स्वरूप कसे आहे ? इंग्रजीतील ‘कर्सिव (अक्षरे जोडून वळणदार पद्धतीने सलग लिहिणे)’ लिखाणाच्या पद्धतीमुळे व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांवर कोणता परिणाम होतो ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.
(भाग १)

१. संकेतस्थळावरील प्रचलित माहिती
‘कर्सिव’ लेखनामध्ये व्यक्तीला लेखणी किंवा पेन्सिल परत उचलावी लागत नाही. त्यामुळे कर्सिव लिखाण अन्य लिखाणाच्या तुलनेत अधिक गतीने लिहिले जाऊ शकते. ही अक्षरे सुंदर दिसतात. लहान मुलांना कर्सिव पद्धतीने लिखाण शिकवल्यास त्यांच्या बुद्धीची क्षमता वाढते आणि त्यांना नवीन गोष्टी शिकणे सुलभ जाते. यात एक शब्द दुसर्या शब्दाला जोडलेला असल्याने मुलांना स्पेलिंग लक्षात ठेवणेही सुलभ जाते.’ (साभार : संकेतस्थळ https://shorturl.at/DCkZ8)

२. वरील विषयाच्या संदर्भात सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
२ अ. लिखाणातून निर्माण होणार्या सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांपर्यंत पोचण्याची प्रक्रिया : ‘कुठलेही लिखाण वाचतांना त्यातील प्रत्येक शब्दातून उत्पन्न होणारा सूक्ष्म प्रवाह प्रथम व्यक्तीचे मन आणि त्यानंतर बुद्धी यांपर्यंत पोचतो. व्यक्तीचे मन डोळ्यांद्वारे शब्द वाचते. त्यानंतर मनाकडून त्या विषयाशी संबंधित सूक्ष्म संवेदना बुद्धीपर्यंत पोचतात. तेव्हा बुद्धी त्या लिखाणाचा अर्थ समजून घेते. त्यानंतर बुद्धीला त्या विषयाचे आकलन होते.
२ आ. विविध विषयांचे आकलन होण्यासाठी व्यक्तीचे मन ‘ग्राहक’ आणि तिची बुद्धी ‘संग्राहक’ या नात्याने कार्य करत असणे : लिखाणातील एकेक शब्द वाचतांना त्याचा अर्थ व्यक्तीच्या मनापर्यंत पोचतो. तेव्हा ते शब्द मनाचे खाद्य बनते. मनाला शब्दांचा ‘ग्रहणकर्ता’ मानले आहे. त्यामुळे ती व्यक्ती शब्दांचा ‘ग्राहक’ आहे. बुद्धीला ‘संग्राहक’, ‘संग्रेषु’ आणि ‘संग्राग्र’, असे म्हणतात. मनाने ग्रहण केलेले लिखाणातील ज्ञान बुद्धीने समजून घेण्याविषयीची सूक्ष्म प्रक्रिया पुढे दिली आहे.
२ आ १. संग्राहक : लिखाणातील ज्ञान प्रथम व्यक्तीच्या मनाला होते. त्यानंतर हे ज्ञान बुद्धी एकत्रित करते. त्यामुळे बुद्धीला ‘संग्राहक’, असे म्हटले आहे.
२ आ २. संग्रेषु : ‘संग्र’ याचा अर्थ ‘एकत्रित करणे’ आणि ‘षु’ म्हणजे विषय. विविध विषयांचे एकत्रीकरण करणारी बुद्धी, म्हणजेच ‘संग्रेषु’ होय.
२ आ ३. संग्राग्र : ‘संग्र’ म्हणजे ‘साठवणे’ आणि ‘अग्र’ म्हणजे पुढे. विविध विषयांची माहिती साठवण्यात बुद्धी अग्रेसर असते. त्यामुळे तिला ‘संग्राग्र’, असे म्हणतात.
२ इ. मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांमध्ये शब्द जोडून न लिहिण्यामागील आध्यात्मिक कारण : मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांमध्ये शब्द जोडून लिहित नाहीत; कारण शब्दांमधील अंतरामध्ये ‘दमयंती’ नावाच्या दैवी शक्तीचा वास असतो. दोन शब्दांमध्ये योग्य अंतर ठेवल्याने ‘दमयंती’ नावाची दैवी शक्ती कार्य करू लागते आणि तिचा आध्यात्मिक लाभ लिखाण करणार्याला होतो.
२ इ १. दमयंती : ‘दम’ हा शब्द दोन शब्दांतील ‘अंतर’ या अर्थाने आहे आणि ‘यंती’ याचा अर्थ ‘कार्य करणे’, असा आहे. दोन शब्दांतील विशिष्ट अंतरामध्ये कार्य करते, ती ‘दमयंती’ होय. ही शक्ती श्वेत रंगाची असून ती भगवान शिवाची दासी आहे. ती व्यक्तीच्या मनाशी संबंधित देवी असून तिला ‘विष्णुप्रिया’, असेही म्हणतात.
२ इ १ अ. दमयंतीदेवी शिवाची दासी असून तिला ‘विष्णुप्रिया’, असे संबोधन असण्यामागील कारण : व्यक्तीच्या मनात भगवान शिवाकडील चंद्राची ‘चंद्रशक्ती’ आहे. व्यक्तीचे मन चंचल असते. मनातील ‘चंद्रशक्ती’मुळे व्यक्ती समाजात वावरतांना बहुतांश वेळा संयमी रहाते. त्यामुळे समाजजीवन सुरळीत चालू रहाण्यास साहाय्य होते. मनाशी संबंधित ‘दमयंतीदेवी’कडे ‘चंद्रशक्ती’ असते. समाजातील बहुतेक लोक एकमेकांची हानी न करता दीर्घकाळ एकत्र राहू शकतात. त्यामागे भगवान शिवाची मनाशी संबंधित ‘चंद्रशक्ती’ असते.
व्यक्तीच्या मनामध्ये असलेल्या ‘दमयंती’ नावाच्या शक्तीत अल्प-अधिक प्रमाणात व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवन जगण्याचे ज्ञान असते. तिला हे ज्ञान विष्णूकडून प्राप्त होते. ‘दमयंती’ नावाच्या दैवी शक्तीकडे भगवान शिवाच्या समवेत विष्णूची शक्ती असते. त्यामुळे तिला ‘विष्णुप्रिया’, असेही म्हणतात. व्यक्तीचा ‘संयम’ आणि ‘ज्ञान’ यांचा संगम, म्हणजे ‘दमयंती’ होय.
लिखाणातील विषय आणि त्यातील शब्द यांतील सूक्ष्म प्रवाहांनुसार व्यक्तीचे मन उद्दिपित होते अन् त्यानंतर ते शांत होते. जेव्हा व्यक्तीचे मन उद्दिपित होते, तेव्हा मन विषयातील ज्ञान ग्रहण करते आणि जेव्हा ते शांत होते, तेव्हा त्याला विषयाचे आकलन झालेले असते. ही व्यक्तीच्या मनाची ‘क्रीडा’ मानली आहे.
२ इ १ आ. ‘दमयंती’ या शक्तीची ‘सुरूपा’ आणि ‘कुरूपा’, ही दोन रूपे असणे : जेव्हा व्यक्तीचे मन गुरु किंवा देव यांच्या स्मरणात असते, तेव्हा ‘दमयंती’ या शक्तीला ‘सुरूपा’, असे संबोधन आहे. जेव्हा व्यक्तीचे मन विकारांनी ग्रस्त असते, तेव्हा ‘दमयंती’ या शक्तीला ‘कुरूपा’, असे म्हणतात.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०२४)
या लेखाचा या पुढील भाग वाचण्याकारीता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/905076.html
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |