संस्कृत व्याकरणाची सोप्या भाषेत ओळख करून देणारा ग्रंथ ‘भाषाङ्कुरः’ !

संस्कृत भाषा म्हणजे प्राचीन, अभिजात (समृद्ध) आणि पवित्र भाषा, अशी अनेक रूपाने या भाषेची ओळख आहे. जगातील आदिम साहित्य, आदिकाव्य या भाषेमध्ये आहे. ही भाषा ललित साहित्य, महाकवींचे काव्य आणि अभिजात रचना यांची जशी भाषा आहे, तशीच ती शिक्षणाची माध्यम भाषासुद्धा होती. भारतीय तत्त्वज्ञान, दर्शने, विविध शास्त्रे, कला यांचीही संस्कृत भाषा हीच अभिव्यक्ती आणि विवरण यांची भाषा होती. ‘भारतीय ज्ञान पद्धत’ (इंडियन नॉलेज सिस्टम) आणि समृद्ध परंपरा याच भाषेमध्ये आजवर जतन केली गेली अन् ते पूर्णांशाने जाणून घेण्यासाठी संस्कृतचा चांगला परिचय असणे महत्त्वाचे  आहे. ज्ञानाचा अथांग महासागर समजून घेण्यासाठी तर या देववाणीचे ज्ञान असणे अत्यावश्यकच आहे.

१. संस्कृत भाषा समजण्यासाठी व्याकरण शिकणे महत्त्वाचे !

कोणतीही भाषा शिकतांना तिचे सर्वसाधारण व्याकरण माहिती व्हावे लागते, त्याखेरीज ती भाषा बोलणे वा समजणे शक्य होत नाही. बोली भाषा किंवा व्यवहारातील भाषा आपोआप समजून समजून आत्मसात् होते. त्यासाठी मुद्दाम व्याकरण शिकावे लागत नाही; पण संस्कृत भाषेची समृद्ध संपत्ती समजण्यासाठी तिचे व्याकरण शिकावे लागते.

अभिजात भाषेचे व्याकरण सुसूत्र आणि सुव्यवस्थितपणे प्रथम सांगितले ते पाणिनीमुनींनी त्यांच्या ‘अष्टाध्यायी’मध्ये. अल्पावधीत संस्कृत पूर्णपणे जाणण्याचा एकमेव उपाय, म्हणजे अष्टाध्यायीचे अध्ययन करणे, अशी या ग्रंथाची कीर्ती आहे; पण नव्याने व्याकरणशास्त्राच्या अध्ययनाला ते शिकायला प्रारंभ करणार्‍यांसाठी हा ग्रंथ जरा ‘प्रौढ’च आणि अवघड आहे, पोहणे शिकायला थेट समुद्रात उडी मारण्यासारखे आहे.

श्री. रोहन कुलकर्णी

२. श्री. रोहन कुलकर्णी यांचा अल्पसा परिचय आणि त्यांनी संस्कृत व्याकरण शिकवण्यासाठी केलेले अनेकविध प्रयत्न

या नवशिक्यांना व्याकरणाची ओळख होऊन गोडीही लागावी, यासाठी पुणे येथील श्री. रोहन अच्युत कुलकर्णी यांनी ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’च्या साहाय्याने ‘भाषाङ्कुरः’ हा ग्रंथ सिद्ध करून प्रकाशित केला आहे. श्री. रोहन कुलकर्णी यांनी स्वतः पारंपरिक पद्धतीने अध्ययन केले आहे, तेसुद्धा एका अशा व्युत्पन्न विद्वान अध्यापकांकडे जे प्राचीन शास्त्रे आणि दर्शने पूर्वापार चालत आलेल्या पठडीतून शिकवता शिकवता आधुनिक पद्धत, शिक्षण शास्त्रातील विचारधारा अन् नवनवीन मार्ग स्वीकारून स्व-शिक्षणाची रिती रुजवतात, तसेच नवी प्रणाली निर्माण करतात. चित्रे, तक्ते (मॅप्स), मातृका / सारणी (टेबल्स), वृक्षाच्या रूपातील आकृती (ट्री डायग्रॅम) यांद्वारा विषयाची उकल करून तो विद्यार्थी-प्रिय कसा होईल, यावर त्यांचा भर असतो.

याच पद्धतीचे अनुकरण श्री. रोहन यांनी केले आहे आणि त्यामध्ये ते पूर्ण यशस्वी झाले आहेत. या ग्रंथात संस्कृत व्याकरणाचे जवळजवळ सर्व विषय आहेत. वर्ण, संधी, विभक्तींचा विविध प्रकारे होणारा वापर, नाम आणि क्रियापद यांची (धातूंची) रूपे, समास इत्यादी विषय तर आहेतच, त्यासह अनुवृत्ति, अनुबन्ध, अयोगवाह इत्यादी व्याकरणातील शास्त्रीय परिभाषा आणि पारिभाषिक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. या सर्वांना उदाहरणे देऊन अधिकाधिक सोप्या पद्धतीने विषय उलगडला आहे आणि शिकवला आहे. श्री. रोहन कुलकर्णी स्वतः व्याकरण शिकवतात, व्याकरणाचा प्राथमिक अभ्यासक्रम – ‘प्रारम्भिक व्याकरण पाठ’ या नावाने त्यांनी एक उपक्रम चालू केला होता. त्याचे अधिक परिष्कृत स्वरूप म्हणजे ‘भाषाङ्कुरः’ ग्रंथ !

३. ‘भाषाङ्कुरः’ ग्रंथात असलेले वैविध्यपूर्ण लिखाण आणि लिखाणाचा हेतू

‘भाषाङ्कुरः’ हा ग्रंथ जागतिक स्तरावर पोचावा, त्यास प्रादेशिक स्तरावरही त्याचा प्रसार व्हावा म्हणून इंग्रजी आणि मराठी या २ भाषांमध्ये तो लिहिला आहे. यात एकूण ६४ पाठ आहेत. त्यांचा प्रारंभ वर्णमालेपासून होतो. संधी, कारक, उपपद विभक्ती, प्रातिपदिक आणि धातू इत्यादी विषय यात येतात. ‘सूत्रांचे प्रकार’ या विषयाने शेवट आहे. लिङ्गविचार, उद्देश्यविधेयभाव यांसारखे शास्त्रीय विषयही यात घेतले आहेत. पुस्तकाची मांडणी पुष्कळ आकर्षक पद्धतीने केली आहे.

अवग्रह, संधींचे वेगवेगळे नमुने, लौकिक विग्रह, १० गणांच्या धातूंची सूची ही या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये. परिशिष्टांमध्ये १२९ सुभाषिते दिली आहेत. विवरणासाठी तक्ते आणि क्रमदर्शक आलेख देऊन विषय थोडक्यात मांडला आहे. ६४ पाठसुद्धा सुटसुटीत आहेत, अधिक विस्तार किंवा फाफटपसारा त्यात नाही. पाठातील विविध प्रसंगांना अनुरूप अशी ५०० हून अधिक चित्रे त्यात दिली आहेत. शिकणार्‍यांना अनेक संकल्पना उलगडण्यास साहाय्य करण्याचा उद्देश आहे.

शिकणार्‍यांसाठी प्रत्येक पाठात व्याकरण ग्रंथातून आणि संस्कृत साहित्यामधून उदाहरणे अन् स्वाध्याय दिले आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व विषय आत्मसात् करावेत, हा यामागचा हेतू आहे. ग्रंथाचा वापर करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा शिकून पुढे अधिक प्रावीण्य मिळवण्यास साहाय्य होईल, हे नक्कीच !

व्याकरणासारखा रटाळ आणि कंटाळवाणा विषय नवीन मांडणीत अधिकाधिक आकर्षक करण्यात श्री. रोहन कुलकर्णी यशस्वी झाले आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांमध्ये ‘भाषाङ्कुरः’ ग्रंथ लोकप्रिय होईल आणि संस्कृत विद्येचा प्रसार होईल, तेव्हा या ग्रंथाचा हेतू यशस्वी होईल.

पुस्तकाचे नाव : ‘भाषाङ्कुरः’

लेखक : श्री. रोहन अच्युत कुलकर्णी

प्रकाशक : संस्कृत सेवा फाऊंडेशन, पुणे

किंमत : ९२० रुपये

पाने : ५४०

संकेतस्थळ : https://sanskritseva.org/initiatives/bhashankura/

‘भाषाङ्कुरः’ ग्रंथ प्रकाशित होऊन १ वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात या ग्रंथाच्या जवळपास ८५० प्रती भारतातील २० राज्ये, तसेच ३ केंद्रशासित प्रदेश यांमध्ये आणि न्यूझीलंड, जपान, संयुक्त अरब अमिराती, पोलंड, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका अन् कॅनडा या ८ देशांमध्ये पोचल्या आहेत.