Trump Authorizes Pause On Tariffs : ट्रम्प यांनी ९० दिवसांसाठी स्थगित केली आयात शुल्क वाढ

चीनवरील आयात शुल्क पुन्हा वाढवून केले १२५ टक्के !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – जगभरातील देशांवर आयात शुल्क लागू करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनीच आता ७५ देशांवरील आयात शुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिली आहे; मात्र त्याच वेळी यातून चीनला वगळले आहे. तसेच त्याच्यावरील आयात शुल्क काल घोषित केलेल्या १०४ टक्क्यांवरून वाढवत १२५ टक्के केले आहे. यातून चीन आणि अमेरिका यांच्यात थेट संघर्ष चालू झाल्याचे दिसून येत आहे. ९० दिवसांची स्थगिती दिलेल्या ७५ देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

चीनला लवकर समजेल की, इतर देशांना लुटण्याचे दिवस संपले ! – ट्रम्प

ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांत पोस्ट करत म्हटले की, चीनने जागतिक बाजारपेठेचा आदर दाखवलेला नाही; म्हणूनच मी आयात शुल्क १२५ टक्क्यांपर्यंत वाढवत आहे. आशा आहे की, चीनला लवकरच समजेल की, अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस संपले आहेत. ज्या देशांनी व्यवहार केला, त्यांच्यासाठी शुल्क १० टक्के असेल. ७५ हून अधिक देशांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले आहे आणि माझ्या सूचनेवर या देशांनी अमेरिकेला कोणत्याही प्रकारे प्रत्युत्तर दिलेले नाही; म्हणून मी त्यांना ९० दिवसांची सूट दिली आहे. या विरामामुळे नवीन व्यापार करारांवर वाटाघाटी करण्यासाठी वेळ मिळेल.

अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट म्हणाले की, अमेरिकेशी वाटाघाटी करण्यास इच्छुक देशांसाठी आयात शुल्क १० टक्क्यांपर्यंत अल्प केले जाईल. कॅनडा आणि मेक्सिको या देशांतील काही वस्तूंवर २५ टक्के कर आकारला जातो. आता त्यांचाही १० टक्क्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

आयात शुल्क  का स्थगित करण्यात आले ?

१. डॉनल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आयात शुल्काच्या वाढीच्या विरोधात होते.

२. शुल्क वाढीमुळे अमेरिकेत मंदी येण्यासह महागाईत वाढ होण्याची स्थिती निर्माण झाली.

३. शेअर बाजरात मोठी घसरण झाली. यामुळे ट्रम्प यांच्या सल्लागारांनी आणि स्वतः उद्योगपती आणि सहभागी इलॉन मस्क यांनी आयात शुल्क थांबवण्याचा सल्ला दिला होता.

४. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेतेही या शुल्काच्या विरोधात होते.

५. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. अमेरिकेची परिस्थिती कोरोना काळातील परिस्थितीसारखी होत चालली होती.

६. अमेरिकेच्या बँकांनी ‘आयात शुल्कामुळे अमेरिकेत महागाई, वाढती बेरोजगारी आणि मंदी येईल’, अशी चेतावणी दिली होती.

चीनच्या उत्पादनांना पर्याय शोधावा लागणार !

अमेरिका चीनकडून ४४० अब्ज डॉलर्सच्या मालाची आयात करते. ट्रम्प यांनी चीनवर १२५ टक्के आयात शुल्क लादल्यामुळे अमेरिकेवर मोठा परिणाम होणार आहे; कारण चिनी उत्पादनांवरील करांमुळे त्यांच्या किमतीत प्रचंड वाढ होईल आणि त्यामुळे जनतेला अन् आस्थापनांनाही ती घेता येणार नाहीत. त्यामुळे अन्य देशांकडून ही उत्पादने घेण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. येत्या ९० दिवसांत अमेरिकाला हे साध्य करावे लागणार आहे.