दैनिक सनातन प्रभातच्या ‘वाचकवृद्धी’ मोहिमेअंतर्गत सेवा करतांना ‘देवच देवाचे कार्य करतो’, याची घेतलेली प्रचीती !

१. सद्गुरु-संत यांच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न केल्यावर वार्षिक वर्गणीदार वाढणे

श्री. विजय भोर

सनातनचे सद्गुरु आणि संत यांच्या संकल्पाने दैनिक सनातन प्रभातची ‘वाचकवृद्धी’ मोहीम राबवण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक वाचकांना ऑनलाईन दैनिक सनातन प्रभात वाचायची सवय लागल्याने त्यांनी दैनिक घेणे बंद केले होते. दैनिक पुन्हा चालू करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या स्तरावर प्रयत्न करत होता; मात्र त्याला म्हणावे तसे यश येत नव्हते. तुर्भे परिसरात पुष्कळ अल्प वर्गणीदार होते.

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी साधकांच्या घेतलेल्या सत्संगात ‘दैनिक वृद्धी हे ईश्वराचे पुढील नियोजन कसे आहे ?’, ‘धर्मप्रसार कसा वेगाने होणार आहे ?’, ‘या सर्व कृती साधना म्हणून कशा करायच्या ?’ याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर दैनिकवृद्धी करण्यासाठी देवाच्या कृपेने तसे प्रयत्न चालू केले. त्यातून वार्षिक वर्गणीदारांची संख्याही वाढली. ही सेवा करतांना सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. मन स्थिर आणि शांत होऊन निरपेक्षपणे सेवा होत होती. या वेळी भगवंत त्याचे कार्य कसे करत आहे, हे अनुभवायला मिळाले.

२. सद्गुरु आणि संत यांच्या संकल्पपूर्तीची अनुभूती घेणे

देवाला प्रार्थना करून संभाव्य वाचक कोण होऊ शकते, याची सूची काढली. प्रतिदिन सेवेला जाण्यापूर्वी भावाच्या स्तरावर प्रयत्न केले. संबंधितांना दैनिकाविषयी माहिती सांगितल्यावर सर्वांनी त्वरित वार्षिक वर्गणी भरण्याची सिद्धता दर्शवली. त्यामुळे उत्साह वाढला. पूर्वीच्या काही वाचकांनी दैनिक बंद केले होते. त्यांचीही नावे काढली होती. त्यांना भेटून पुन्हा दैनिक ‘सनातन प्रभात’वृद्धी मोहिमेची माहिती सांगितली. त्यांनी लगेच सकारात्मकता दर्शवली. यावरून सद्गुरु आणि संत यांचा संकल्प कसा कार्य करतो, याची अनुभूती घेता आली.

३. धर्मकार्यात वितरकही सहभागी होणे

साधकसंख्येअभावी दैनिक वितरणास मर्यादा येत होती; परंतु खासगी वितरकांच्या माध्यमातून ही अडचण सुटली. देवच देवाचे कार्य करून घेतो, याची प्रचीती आली. ‘तुम्ही धर्मकार्यासाठी प्रयत्न करत आहात, तर आम्हीही सहभागी होऊ. आम्हाला वितरण शुल्क नको’, असे सांगून वितरकांनी दैनिक वितरण करण्यास प्रारंभ केला.

४. हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ता ‘सनातन प्रभात’ची चातकाप्रमाणे वाट पहात असल्याचे लक्षात येणे

एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ता बरेच दिवस दैनिक ‘सनातन प्रभात’ मिळण्याविषयी त्यांच्या वृत्तपत्र विक्रेत्यांकडे विचारणा करत होते. विक्रेत्याला वाशी येथे एका वितरकाकडे सनातन प्रभात अन्य येत असल्याचे समजल्यावर त्याने त्यांचा संपर्क क्रमांक त्या कार्यकर्त्याला दिला. त्या माध्यमातून कार्यकर्त्याला भेटल्यावर जणूकाही ते सनातन प्रभातची चातकाप्रमाणेच वाट पहात होते, असे लक्षात आले. त्यांनी वार्षिक वर्गणी भरून सनातन प्रभात चालू केले.

– श्री. विजय भोर, सानपाडा, नवी मुंबई.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक