औष्णिक विद्युत् केंद्रातील राखेसाठी नवीन समान धोरण अमलात आणू ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, १८ मार्च (वार्ता.) – औष्णिक विद्युत् केंद्रातून बाहेर पडणार्‍या राखेवर नवीन नियमावली सिद्ध करून त्यावर नियंत्रण ठेवले जाईल. त्याची विक्री करण्याचे समान धोरण आखले जाईल. ते योग्य पद्धतीने राखेची विल्हेवाट लावेल आणि भ्रष्टाचारमुक्त असे असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देत होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की,

१. पूर्वी २० टक्के राख स्थानिक उद्योगांना, ८० टक्के राखेची विक्री ही लिलावाद्वारे होत होती; परंतु केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार १०० टक्के राख ही लिलावाद्वारे करण्याचे बंधन आहे.

२. ज्या ठिकाणाच्या राखेच्या विक्रीसंबंधी ठेका देणे, या कामांमध्ये अनियमितता निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

३. औष्णिक विद्युत् केंद्रातून बाहेर पडणारी राख ही ‘ड्राय’ (कोरडी करून) करून विक्री केली जाते. ती वाहतूक करतांना कुणीही नियमांचे उल्लंघन करू नये.

४. समान धोरण मांडून स्थानिक उद्योगांना राख देण्याचा प्रयत्न करावा, तसेच त्या राखेचा वापर करणार्‍या उद्योगांना प्रोत्साहन देऊ.