पुणे – सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागांतर्गत समाजकल्याण आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या खडकवासला येथील ‘सार्थक कॉम्प्लेक्स’मध्ये शासकीय मुलींचे वसतीगृह आहे. या वसतीगृहात १०० विद्यार्थिनी रहातात. दूषित पाण्यामुळे १० ते १२ विद्यार्थिनींना पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब आणि पुरळ आल्याच्या तक्रारी जानेवारी महिन्यात करण्यात आल्या होत्या. विद्यार्थिनींनी वसतीगृह प्रशासनाकडे दूषित पाण्याविषयी तक्रार केली होती. प्रशासनाने याविषयी काय काळजी घेतली ? तसेच दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कोणती कारवाई केली ? याविषयीची माहिती विधान परिषदेत आमदार योगेश टिळेकर यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या वेळी विचारली.
या प्रश्नाला उत्तर देतांना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दूषित पिण्याच्या पाण्याची तक्रार आली होती, त्रास झालेल्या विद्यार्थिनींना जवळच्या रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. वसतीगृहातील जलशुद्धीकरण यंत्राची पडताळणी केली असता त्यात कोणताही बिघाड झाल्याचे आढळले नाही. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न येत नसल्याचे त्यांनी सांगितले. (वसतीगृहातील पिण्याच्या पाण्यामुळे विद्यार्थिनी आजारी पडल्या, तरी जलशुद्धीकरण यंत्र व्यवस्थित असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे; मात्र विद्यार्थिनींना त्रास झाल्याचे वास्तव समोर असून याविषयी अजून सखोल चौकशीची आवश्यकता आहे, असे जनतेला वाटते. – संपादक)