मंदिरांचे संरक्षण, संवर्धन आणि संघटन यांसाठी सातारा येथे मंदिर न्यास अधिवेशनाचे आयोजन !

हिंदु जनजागृती समिती अंतर्गत ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा उपक्रम !

डावीकडून श्री. हेमंत सोनवणे, सौ. भक्ती डाफळे, श्री. शिवाजीराव तुपे, अधिवक्ता जनार्दन करपे, श्री. अमोल गोसावी

सातारा, १८ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरांचे रक्षण अन् पुनरुज्जीवन केले. आज मात्र हिंदु मंदिरांचे सरकारी नियंत्रण, मंदिरांच्या भूमींवर अतिक्रमण, वक्फ बोर्डाद्वारे मंदिरांच्या भूमींचे अधिग्रहण होत आहे. यामुळे मंदिर संस्कृती आणि श्रद्धा यांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. मंदिर व्यवस्थापन सुधारण्यासाठी मंदिर विश्वस्त, पुजारी, भक्त आणि अभ्यासक यांचे संघटन आवश्यक आहे. याच उद्देशाने हिंदु जनजागृती समिती, श्री पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्ट, वेदभवन गुरुकुल आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे जिल्हास्तरीय ‘मंदिर न्यास अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. संगमनगर येथील वेदभवन मंगल कार्यालय येथे २० मार्च या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत हे अधिवेशन होणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे जिल्हा संयोजक श्री. शिवाजीराव तुपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

गोडोली येथील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी श्री बहुलेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. अमोल गोसावी, अधिवक्ता जनार्दन करपे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे आणि सौ. भक्ती डाफळे उपस्थित होत्या. अधिवेशनामध्ये संत आणि विविध मान्यवर यांचे मार्गदर्शन अन् चर्चासत्रे होणार आहेत. या वेळी सातारा जिल्ह्यातील समस्त मंदिर विश्वस्त, पुजारी, मठपती, पुरोहित, वेदमूर्ती, अधिवक्ते, मंदिर प्रतिनिधी आणि अभ्यासक यांनी अधिवेशनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या अधिवेशनामध्ये मंदिरे सनातन धर्म प्रचाराची केंद्रे बनवणे, मंदिरांचे पावित्र्य राखणे, मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे, मंदिरांच्या भूमींवरील अतिक्रमणे हटवणे, वक्फ कायद्याद्वारे मंदिरांच्या भूमी बळकवणार्‍यांवर प्रतिबंध करणे, मंदिरांच्या भूमींचे संरक्षण करणे, तसेच दुर्लक्षित मंदिरांचा जिर्णोद्धार यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. या वेळी सातारा धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रक्रियांचे अभ्यासक सातारा येथील अधिवक्ता जनार्दन करपे, निवृत्त सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, कणूर (ता. वाई) मठाचे मठपती पू. ब्रह्मानंद स्वामी, धारेश्वर मठाचे मठपती पू. धारेश्वर महाराज, सनातनच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट मार्गदर्शन करणार आहेत.