‘१५.२.२०२५ या दिवशी माझी बहीण श्रीमती जनाबाई नारायणकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८९ वर्षे) यांचे निधन झाले. १७.३.२०२५ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. लहानपणापासून अतिशय कष्ट करूनही प्रकृती चांगली असणे : ‘माझी बहीण तिच्या लहानपणापासून दिवसभर घरात आणि शेतात कष्टाची कामे करत असे. तिला कधी थकवा येत नसे किंवा ती कधी आजारी पडली नाही. तिचे शरीर काटक आणि निरोगी होते.
२. साधनेची आवड : तिला लहानपणापासून देवपूजा करणे, मंदिरात जाणे, आईच्या समवेत पोथी ऐकायला जाणे इत्यादींची आवड होती. ती पंढरपूरची पायी वारी करणे, यात्रेला जाणे, कुलदेवतेला जाणे, उपवास करणे, कलावती आईंच्या भजनाला जाणे, गणेशोत्सवात घरी गणपतीची मूर्ती आणणे इत्यादी मन लावून आणि भावपूर्ण करत असे. मी सांगितल्यानुसार ती सनातनच्या मार्गदर्शनानुसार कुलदेवता आणि गुरुदेव दत्त यांचे नामस्मरण करत असे. ती नेहमी ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करत असे आणि भगवान शिवाच्या सतत अनुसंधानात रहात असे.
३. कौटुंबिक दायित्व निभावणे : वर्ष १९७४ मध्ये बहिणीच्या यजमानांचे निधन झाले. नंतर तिने एकटीने तिची २ मुले आणि ५ मुली यांना चांगले शिक्षण देऊन लहानाचे मोठे केले. तिने अनेक त्रास सहन केले, मात्र तिची देवावरील श्रद्धा ढळली नाही. तिच्या भोळ्या भावामुळे तिला चांगल्या लोकांचे साहाय्य मिळत गेले आणि तिच्यावर गुरुकृपाही झाली.
४. तिला सर्वांबद्दल पुष्कळ आपुलकी आणि प्रेम वाटत असे.

५. तिच्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अल्प होते. ती नेहमी समाधानी आणि आनंदी रहात असे.
६. बहिणीची सेवाभावी वृत्ती आणि भोळाभाव यांमुळे प्रगती होणे : वर्ष १९९२ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव मुंबई येथे आयोजित केला होता. तेव्हा बहिणीने माझ्या रुग्णाईत आईला स्वतःच्या घरी ठेवून घेतले आणि आईच्या अंतिम क्षणापर्यंत आईची सेवा केली. त्यामुळे मी साधना आणि गुरुपौर्णिमेची सेवा करू शकलो. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘तुमची बहीण साधनेत तुमच्या पुढे आहे.’’ बहिणीच्या निधनापर्यंत मी या गुरुवाक्याची अनुभूती घेत होतो.
७. सात्त्विकतेची आवड : मी बहिणीकडे राखी पौर्णिमा आणि भाऊबीज या सणांनिमित जातांना आरंभी बहिणीसाठी साडी, मिठाई आणि एखादी भेटवस्तू घेऊन जात असे. मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यावर बहिणीसाठी काही वर्षे सनातन निर्मित देवतांची चित्रे, सात्त्विक उत्पादने, लघुग्रंथ भेट देत असे किंवा साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची वार्षिक वर्गणी भरत असे. हे तिला अन्य भेटवस्तूंपेक्षा अधिक आवडत असे आणि तिच्याकडे घरी ज्या व्यक्ती येतील, त्यांना ती सनातनच्या चैतन्यमय साहित्यांविषयी सांगत असे. तिला लिहिता-वाचता येत नसल्याने ती सनातनचे ग्रंथ आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ तिच्या घरी येणार्या व्यक्तींना वाचायला देत असे.
८. आश्रमजीवनाशी समरस होणे : वर्ष २०१५ मध्ये माझी बहीण आणि भाची (श्रीमती मंगल शेरखाने) २० दिवस देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात राहिल्या होत्या. तेव्हा बहीण साधकांनी सांगितलेली कोणतीही सेवा करण्यास नेहमीच सिद्ध असे. बहिणीला तिच्याकडून होणार्या काही चुका सांगितल्यावर तिला खंत वाटे आणि ती त्वरित प.पू. भक्तराज महाराज यांची क्षमा मागत असे. ती ध्यानमंदिरात नामजप करत असतांना तिला प.पू. भक्तराज महाराज, बाळकृष्ण इत्यादींचे दर्शन होत असे. तिने आश्रमातील वास्तव्याच्या थोड्याशा कालावधीत सर्वांना आपलेसे केले होते.
९. प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव
अ. वर्ष १९९४ मध्ये एकदा दुपारी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) मुंबई येथील परात्पर गुरु डॉक्टरांच्या घरी महाप्रसाद ग्रहण करून झाल्यावर बसले होते. सर्व भक्त प.पू. बाबांचे दर्शन घेऊन घरी जात होते. माझी बहीण त्यांचे दर्शन घेण्यासाठी उशिरा आली. त्या वेळी बहिणीने प.पू. बाबांना तिने आणलेले पिठले-भाकरी खाण्याची प्रार्थना केली. तेव्हा बहिणीमधील भाव पाहून प.पू. बाबांनी तिच्या हातून थोडेसे पिठले-भाकरी खाल्ली.
आ. ३.५.२०१५ या दिवशी माझ्या बहिणीची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के झाल्याचे घोषित केले. तेव्हा तिने ‘प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे झाले’, असे सांगितले.
इ. मी राखी पौर्णिमेला बहिणीच्या घरी जात असे. तेव्हा ती माझ्याकडे परात्पर गुरु डॉक्टरांसाठी राखी आणि खाऊ देत असे. वर्ष २०१५ मध्ये ‘मी गोवा येथे जात आहे’, असे तिला समजल्यावर तिने परात्पर गुरु डॉक्टरांसाठी ज्वारीच्या लाह्या बनवून दिल्या होत्या. त्या त्यांना पुष्कळ आवडल्या.
ई. वर्ष २०१८ मध्ये मी बहिणीला भाऊबिजेनिमित्त ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन (भाग १)’ हा ग्रंथ भेट दिला होता. तेव्हा तिने तो ग्रंथ हृदयाशी कवटाळला आणि नंतर मस्तकाला लावून नमस्कार केला. ती त्या ग्रंथावरील परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राची पूजा करत असे.
उ. ती माझ्याकडे प.पू. डॉक्टरांची सतत विचारपूस करत असे. आमच्या बोलण्यात प.पू. डॉक्टरांचा संदर्भ आल्यास तिची भावजागृती होत असे. प.पू. डॉक्टरांना नमस्कार करण्यासाठी तिचे हात आपोआप वर जात असत. ‘माझ्या भावाच्या पाठीशी गुरुदेव आहेत’, असे ती सर्वांना सांगायची आणि निश्चिंत असायची.
१०. बहीण रुग्णाईत असतांना तिच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
अ. बहिणीला शेवटच्या आजारपणात तीव्र वेदना होत होत्या, तरीही तिच्या चेहर्यावर वेदनांचा लवलेशही दिसत नव्हता. ती त्या स्थितीतही सर्वांची प्रेमाने विचारपूस करत असे.
आ. ती नातेवाईक आणि गुरुदेव यांच्याप्रती सतत कृतज्ञता व्यक्त करत असे.
इ. ती ३ मासांपूर्वी घरात घसरून पडल्यामुळे तिच्या मांडीचे हाड मोडले आणि ती नंतर अंथरूणावर खिळून राहिली. तिच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी केलेल्या चाचण्यांमध्ये तिचा रक्तदाब, रक्तातील साखर आणि रक्तातील अन्य घटक सामान्य होते.
११. बहिणीच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे
अ. बहिणीचा चेहरा अत्यंत तेजस्वी दिसत होता.
आ. ‘तिच्या देहातून चैतन्य प्रक्षेपित होऊन ते दूरवर प्रक्षेपित होत आहे आणि वातावरणाची शुद्धी होत आहे’, असे मला जाणवले.
इ. तिच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करतांना ‘ती प.पू. गुरुदेवांच्या अनुसंधानात आहे आणि तिचा नामजप चालू आहे’, असे मला जाणवले.
ई. तिचे अंतिम दर्शन घेतांना मला वातावरणात हलकेपणा जाणवत होता.
उ. मला तिच्या संपूर्ण देहाभोवती पिवळ्या रंगाचे दैवी प्रकाशमान वलय दिसत होते.
ऊ. गुरुकृपेने ‘तिची कसलीच इच्छा राहिली नाही’, असे मला जाणवले. तिच्या अंत्यविधीच्या वेळी कोणतेही अडथळे आले नाहीत.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत), वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.२.२०२५) ॐ
पू. शिवाजी वटकर आणि त्यांची बहीण (कै.) श्रीमती जनाबाई नारायणकर यांचे आध्यात्मिक स्तरावरील नाते !
१. ‘माझ्या अन्य नातेवाईकांपैकी केवळ माझी बहीणच (श्रीमती जनाबाई) मला साधनेत साहाय्य करत होती. मी तिची साधना व्हावी; म्हणून शक्य होईल, ते साहाय्य तिला करत असे. माझी बहीणच माझी आत्मलग (आत्म्याच्या नात्यातील) होती, अन्य कुटुंबीय केवळ नातलग (मायेतील नात्यातील) होते. आम्हा दोघांना मायेतील गोष्टींविषयी फारशी आसक्ती नव्हती. आम्हाला केवळ गुरु, देव आणि धर्म यांची आवड होती. त्यामुळे जसे गुरु-शिष्य यांमध्ये काहीच मतभेद नसतात, तसे आम्हा दोघांचे संबंध होते.
२. काही कारणांमुळे माझी वयस्कर आई बहिणीच्या घरी रहात असे. बहीण आईची सर्व काळजी घेत असे. तेव्हा बहीण मला नेहमी सांगायची, ‘‘तुम्ही आम्हा दोघींची काहीच काळजी करू नका. मी सर्व पहाते. तुम्ही आम्हाला भेटायला येण्याऐवजी साधनाच करा. आम्ही इकडे आनंदात आहोत.’’ परिणामी मी बहिणीच्या साहाय्याने आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने अखंड साधना अन् सेवा करत राहिलो.
३. मुलगा आणि मुलगी यांची साधना आईची सेवा करून व्हावी, यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांच्या आईचे आयुष्य वाढवणे – परात्पर गुरु डॉ. आठवले : वर्ष १९९२ मध्ये माझी आई (श्रीमती राहीबाई गिरजाप्पा वटकर, वय ८२ वर्षे) गंभीर रुग्णाईत होती. तेव्हा ‘ती अधिकाधिक एक आठवडा जगू शकेल’, असे संत आणि आधुनिक वैद्य यांनी मला सांगितले होते. त्यानंतर अडीच मासांनी आईचे निधन झाले. याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारल्यावर ते मला म्हणाले, ‘‘प.पू. भक्तराज महाराज यांनी तुमच्या आईचे आयुष्य वाढवले. तुमच्याकडून आणि तुमच्या बहिणीकडून आईची सेवा होण्यासाठी अन् तुमचे प्रारब्ध पूर्ण करण्यासाठी त्यांनी असे केले.’’
४. आम्हा दोघांमधील (मी आणि माझी बहीण यांच्यामधील) संवाद अधिकाधिक आध्यात्मिक स्तरावरील असे. आम्ही नेहमी देव, साधना आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी बोलत होतो. आम्ही एकमेकांच्या कौटुंबिक अडचणी, कठीण प्रारब्ध इत्यादींकडे साक्षीभावाने पहात होतो. आम्ही एकमेकांना समजून घेत होतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत), वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.२.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |