सात्त्विकतेची आवड असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा बेंगळुरू येथील कु. राघव सुदीप भट (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. राघव सुदीप भट हा या पिढीतील एक आहे !

फाल्गुन कृष्ण सप्तमी (२१.३.२०२५) या दिवशी कु. राघव सुदीप भट याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. राघव सुदीप भट याला आठव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभशीर्वाद !

कु. राघव भट

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी

१ अ. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाण्याची संधी मिळणे आणि एका संतांचा यांचा सत्संग लाभणे : ‘मी ८ मासांची गर्भवती असतांना मला संतांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. गुरुकृपेने मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ३ दिवस रहायला मिळाले आणि एका संतांचा सत्संगही लाभला. त्यांच्या सत्संगाच्या वेळी मला गर्भातील बाळाची हालचाल जाणवली. तेव्हा ‘गर्भातील बाळाने संतांच्या सत्संगाला प्रतिसाद दिला’, असे मला वाटले आणि माझी भावजागृती झाली.

२. जन्म ते दीड वर्ष

२ अ. सात्त्विकतेची आवड

१. राघवच्या समोर अनेक वस्तू ठेवल्यावर तो आध्यात्मिक स्तरावरील उपाय होण्यासाठी ठेवलेली खोकी, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’, गोमूत्र, देवतांची चित्रे इत्यादी सात्त्विक वस्तू निवडून घेत असे. तो आठव्या मासात ‘दत्त’ हा शब्द उच्चारू लागला. त्याने देवतांची चित्रे, देवघर, सनातन प्रभात, परम पूज्यांचे छायाचित्र, साधक, मंदिराचे चित्र, ग्रंथ इत्यादी सात्त्विक वस्तू पाहिल्यावर तो ‘दत्त’, ‘दत्त’ म्हणत असे अन् नमस्कार करत असे.

२. मी बाळाला दूध पाजत असतांना मला कुणाविषयी प्रतिक्रिया येत असेल किंवा माझे स्वभावदोष उफाळून येत असतील, तर बाळ दूध पिण्याचे थांबवत असे. मी नामजप करत असतांना किंवा माझी मानसिक स्थिती चांगली असतांना बाळ दूध पित असे.

२ आ. शांत स्वभाव : मी चि. राघवला सत्संग आणि भावसत्संग यांच्या ठिकाणी नेल्यावर किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण पहाण्यासाठी घेऊन गेल्यावर तो शांतपणे झोपत असे.

२ इ. भजनांची आवड : राघवला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने पुष्कळ आवडत असत.

२ ई. श्लोक ऐकणे आणि म्हणण्याचा प्रयत्न करणे : त्याला देवघरात बसायला आवडत असे. माझ्या बहिणीचा मुलगा आदित्य देवघरात बसून श्लोक म्हणत असे. तेव्हा राघव श्लोक एकाग्रतेने ऐकत असे. तो त्याच्याप्रमाणे श्लोक म्हणायचा प्रयत्न करत असे.

२ उ. व्यवस्थितपणा : तो प्रत्येक वेळी खेळायला घेतलेली खेळणी व्यवस्थित जागेवर ठेवत असे.

३. वय २ ते ४ वर्षे

३ अ. शिकण्याची वृत्ती आणि वाचनाची आवड : राघव ३ वर्षांचा असतांना मुळाक्षरे (अ, आ, इ…..) काढायला शिकला. त्याला सनातनचे ग्रंथ पुष्कळ आवडतात. तो अन्य मुलांच्या तुलनेत लवकर ग्रंथ वाचायला शिकला.

४. वय ५ ते ८ वर्षे

४ अ. स्वयंसूचना घेऊन स्वभावदोष दूर करणे

१. राघवला पोहायला शिकायला पाठवले होते. तेव्हा त्याला पुष्कळ भीती वाटत असे. आम्ही त्याला ‘भीती वाटणे’ या स्वभावदोषावर स्वयंसूचना घ्यायला सांगितली. त्याने स्वयंसूचना घेतल्यावर त्याची भीती उणावली आणि तो केवळ ५ दिवसांत पोहायला शिकला.

२. त्याला एखादे कापड हातात घेऊन फिरवायची सवय लागली होती. त्यावर त्याला स्वयंसूचना घ्यायला सांगितले. त्याने स्वयंसूचना घेतल्यावर त्याची कापड फिरवायची सवय गेली. स्वयंसूचनेच्या साहाय्याने स्वतःमधील स्वभावदोष न्यून झाल्याबद्दल तो पुष्कळ कृतज्ञता व्यक्त करतो.

४ आ. गुरूंप्रती भाव : आमच्या नातेवाइकांनी त्याला दिलेले पैसे त्याने साठवले होते. आम्ही त्याला गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. तेव्हा त्याने ते सर्व पैसे गुरुपौर्णिमेसाठी अर्पण केले.

– सौ. अर्पणा भट (कु. राघवची आई), बेंगळुरू, कर्नाटक. (१८.५.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.