‘व्यक्तीच्या मनावरील अयोग्य कृती आणि अयोग्य विचार करण्याचा संस्कार दूर होऊन तिच्या मनावर योग्य कृती अन् योग्य विचार करण्याचा संस्कार मनावर बिंबण्यासाठी स्वयंसूचना दिल्या जातात. मी स्वयंसूचना नियमित दिल्याने गुरुकृपेने मला झालेले लाभ येथे दिले आहेत.

१. स्वयंसूचना दिल्याचा अनुभवलेला दीर्घकालीन परिणाम
मी अनुमाने वर्षभरापूर्वी माझ्या मनातील अयोग्य विचार नष्ट होण्यासाठी स्वयंसूचना दिल्या होत्या. नंतर एकदा माझ्या मनात पुन्हा पूर्वीप्रमाणेच अयोग्य विचार आले. त्याच क्षणी मला पूर्वी मी याविषयी दिलेल्या स्वयंसूचनांचे अकस्मात् स्मरण झाले आणि मनात अयोग्य विचार येण्याचे थांबले. नंतर माझ्या मनात योग्य विचार आले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘व्यक्तीने स्वयंसूचना दिल्यास तिला तात्कालिक लाभ न होता स्वयंसूचनांचा परिणाम दीर्घ काळ टिकतो.’
२. स्वयंसूचना दिल्याने मनात अयोग्य विचार न येणे
त्या वेळी मला इस्रायल या देशाकडे असलेली ‘आयर्न डोम’ या संरक्षण प्रणालीची आठवण झाली. शत्रू देशाने इस्रायलवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले, तर इस्रायलमधील ‘आयर्न डोम’ ही सुरक्षाविषयक तंत्रप्रणाली कार्यान्वित होते आणि ती लगेच शत्रूचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करते. त्यामुळे इस्रायलचे रक्षण होते.

त्याचप्रमाणे साधकाने स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी स्वयंसूचना दिल्यावर स्वयंसूचनांचे केंद्र साधकाच्या अंतर्मनावर निर्माण होते. साधकाच्या बाह्यमनात अयोग्य विचार आल्यास पूर्वी स्वयंसूचनांद्वारे बिंबलेले त्याच्या चित्तातील योग्य विचार बाह्यमनात येतात. त्यामुळे साधकाच्या बाह्यमनातील अयोग्य विचार आपोआप नष्ट होतात. त्यासाठी साधकाला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. साधकाने स्वयंसूचना दिल्यामुळे साधकाच्या अंतरात ‘अयोग्य विचार आणि त्यावरील योग्य विचार’, ही लढाई आपोआप होते आणि त्याच्या चित्तात अयोग्य विचार येत नाहीत.
३. कृतज्ञता
व्यक्तीची आध्यात्मिक उन्नत्ती होण्यासाठी ‘तिची चित्तशुद्धी होणे’ सर्वाधिक महत्त्वाची मानली आहे. व्यक्तीच्या चित्तावर सहस्रो जन्मांचे संस्कार असतात. ते दूर करणे साधकाला अतिशय कठीण असते. त्यासाठी खडतर तपच करावे लागते; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना स्वयंसूचना देण्याच्या पद्धती शिकवून हा विषय सुलभ केला आहे. त्यांनी आम्हा साधकांवर ही अपार कृपाच केली आहे. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |