पणजी, ५ मार्च (वार्ता.) – भूमी बळकावल्याच्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार सुलैमान उपाख्य सिद्दिकी खान याच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयातील उपस्थितीने ५ मार्च या दिवशी पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. या वेळी आरोपी सिद्दिकी खान याने त्याला ठार मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर त्याला कारागृहात परत नेले जात असतांना त्याने पोलिसांच्या वाहनामधून माध्यमांशी बोलतांना हा आरोप केला. (न्यायालयात याविषयी सांगितले नाही आणि माध्यमांना सांगितले, यावरून सिद्दिकी याचा हेतू लक्षात येतो ! – संपादक)
विशेष म्हणजे आरोपी सिद्दिकी खान याला न्यायालयात नेले जात असतांना त्याने एका चिठ्ठीची छायांकित प्रत तेथे उपस्थित असलेल्या माध्यमाच्या एका प्रतिनिधीला दिली; मात्र आरोपी सिद्दिकी खान याच्या समवेत असलेल्या एका पोलीस अधिकार्याने ती छायांकित प्रत लगेचच
माध्यम प्रतिनिधीकडून हिसकावून घेतली. यामुळे जेव्हा आरोपी सिद्दिकी खान याला न्यायालयाबाहेर आणले गेले, तेव्हा पोलिसांनी दोरखंड लावून लोकांना अडवले होते. तसेच जेव्हा आरोपी सिद्दिकी खान याला न्यायालयात नेले, तेव्हा त्याचा चेहरा उघडा होता; मात्र परत बाहेर आणतांना त्याचा चेहरा मास्कने झाकण्यात आला होता. पोलिसांच्या गाडीत बसल्यावर जेव्हा माध्यम प्रतिनिधींनी आरोपी सिद्दिकी खान याला ‘काय प्रकरण आहे?’, असे विचारले असता त्याने, ‘‘ते मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत’’, असे सांगितले.
सिद्दिकी खान याच्या सुरक्षेसाठी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर अडथळे निर्माण केले ! – अक्षत कौशल, पोलीस अधीक्षक, उत्तर गोवा
या घटनेविषयी पोलिसांची बाजू मांडतांना उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल म्हणाले, ‘‘न्यायालयातून बाहेर आणल्यानंतर आरोपी सिद्दिकी खान याच्या सुरक्षेसाठीच प्रवेशद्वारासमोर अडथळे उभारण्यात आले होते. आरोपी सिद्दिकी खान याच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. त्याच्या विरोधात दीर्घकालीन खटला चालू रहाणार आहे आणि त्यामुळे त्याची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे.’’ पोलिसांनी सिद्दिकी खान याने दिलेल्या चिठ्ठीची छायांकित प्रत लगेच हिसकावून घेतल्याविषयी बोलतांना पोलीस अधीक्षक अक्षत कौशल म्हणाले, ‘‘आरोपीच्या
विरोधात कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जात आहे. आरोपीला जर कोणतेही कागदपत्र द्यायचे असेल, तर ते न्यायालयात सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा कायदेशीर व्यवस्थेचा उपयोग काय ?’’