पुणे येथे दूरचित्रवाणी दुरुस्ती करण्याच्या निमित्त महिलेची १४ लाख रुपयांची फसवणूक !

वानवडी (पुणे) – येथील तक्रारदार महिलेच्या दूरचित्रवाणी (टीव्ही) संचात बिघाड झाल्यामुळे त्यांनी दूरचित्रवाणी निर्मिती करणार्‍या आस्थापनाच्या ग्राहक सेवा केंद्रातील क्रमांकावर संपर्क केला. दूरचित्रवाणी संचात बिघाड झाल्याची तक्रार नोंदवली. चोरांनी या ग्राहक सेवा केंद्रातील संपर्क क्रमांकात फेरफार करून त्यांच्या संपर्क क्रमांकाची नोंद केली होती. यानंतर चोरांनी महिलेला एक लिंक पाठवून त्यांची वैयक्तिक आणि अधिकोषाची माहिती पाठवण्यास सांगितले. या माहितीचा दुरूपयोग करून त्यांनी महिलेच्या अधिकोषातून ऑनलाईन १४ लाख रुपये स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.