रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या विरोधात भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन !

मुलुंड येथील अगरवाल रुग्णालयाच्या खासगीकरणाचे प्रकरण खासगीकरण थांबवून चांगली आरोग्य सुविधा देण्याची मागणी !

मुलुंड (पश्चिम) – येथील मुंबई महानगरपालिकेच्या एम्.टी. अगरवाल रुग्णालयाचे पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून ती इमारत लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे; मात्र रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या चर्चेमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. करदात्यांचा पैसा व्यय करून जर खासगी संस्थेलाच रुग्णालय चालवायला द्यायचे असेल, तर सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांचा विचार कोण करणार ? आयुक्तांनी खासगीकरण तातडीने थांबवावे आणि मुलुंडकर जनता, तसेच रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा निर्माण करून द्यावी, रुग्णालयातील उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करून लोकापर्ण करावे, आधुनिक वैद्य आणि वैद्यकीय कर्मचारी यांची भरती करावी, तसेच या सर्व घडामोडींविषयी लेखी उत्तर द्यावे, अशा मागण्या येथील नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे केल्या आहेत. (करदात्यांचा पैसा वापरून अद्ययावत् केलेले रुग्णालय खासगी संस्थेला चालवायला देणे कितपत योग्य आहे ? – संपादक) रुग्णालयाच्या पुनर्बांधणीसाठी भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी ७ वर्ष पाठपुरावा केला, तसेच रुग्णालयाच्या कामासाठी लाक्षणिक उपोषणही केले होते. रुग्णालयाच्या लोकार्पणाविषयी झालेल्या भेटीत आयुक्तांनी खासगीकरणाविषयी सांगितले होते.

निवेदनात म्हटले आहे की,…

१. महापालिकेने एवढा निधी व्यय करून रुग्णालयाची पुनर्बांधणी केली आणि ते चालू करण्याची वेळ आली असतांना खासगी संस्थेला चालवायला देणे अत्यंत अयोग्य आहे.

२. यापूर्वी पूर्वी अतीदक्षता विभाग एका खासगी संस्थेला चालवायला दिला होता, तेव्हा तेथे सावळागोंधळ झाला होता, हे महापालिका प्रशासनाने पाहिले. त्या वेळी आधुनिक वैद्य उपलब्ध नसल्याने अतीदक्षता विभागात काही रुग्णांचा मृत्यूही झाला होता.

३. रुग्णालयातील कर्मचारी नियमांचे उल्लंघन आणि मनमानी कारभार करतात.

४. गेल्या काही वर्षा पासून रुग्णालयात विविध समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागले होते. त्यातच रुग्णालयाचे खासगीकरण झाल्यास उपचारासाठी येणार्‍या गरीब रुग्णांना त्याचा पुष्कळ त्रास सहन करावा लागेल.