आयकर विभागाच्या सेवानिवृत्त अधिकार्‍याची १३ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक !

सावंतवाडी – आयकर विभागाच्या एका सेवानिवृत्त अधिकार्‍याला अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) कारवाईची भीती दाखवून तब्बल १३ लाख रुपयांना फसवण्यात आले. या निवृत्त अधिकार्‍याने संशयिताच्या सांगण्यावरून ३ बँकांच्या खात्यात गेल्या ८ दिवसांत ही रक्कम भरली. त्यानंतर आणखी ४ लाख रुपये भरण्यापूर्वी स्वत:ची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ती रक्कम न भरता बांदा पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात तक्रार दिली. सेवानिवृत्त अधिकारी सध्या स्वत:च्या गावी मुक्कामी आहेत.

१० दिवसांपूर्वी त्यांना भ्रमणभाषवर संपर्क करून एका व्यक्तीने ‘ती ईडीची अधिकारी असून तुमच्या (सेवानिवृत्त अधिकार्‍याच्या) कार्यकाळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली आहे. त्यात तुम्ही दोषी असल्याचे समोर येत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी गैरव्यवहार झालेली रक्कम तात्काळ भरावी’, असे बजावले. या खोट्या संपर्कामुळे (कॉलमुळे) निवृत्त अधिकारी घाबरले आणि त्यांनी रक्कम भरण्याची सिद्धता दर्शवली. (अधिकार्‍यांनी सेवेत असतांना कोणताच घोटाळा केला नसेल, तर या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीला घाबरण्याची आवश्यकता काय ? – संपादक) एकूण १७ लाख रुपये भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. संबंधित व्यक्तीने त्यांना धनादेशाच्या (चेकच्या)
माध्यमातून पैसे भरण्यास सांगून विविध बँक खात्यांची माहिती पाठवली. त्यानुसार सेवानिवृत्त अधिकार्‍याने विविध बँक खात्यात तब्बल १३ लाख रुपये वर्ग केले. उर्वरित ४ लाख रुपये भरण्यासाठी त्यांना सतत तगादा लावण्यात आला. त्यामुळे ही रक्कम ते ३ मार्च या दिवशी बँकेच्या खात्यात भरणार होते; मात्र तत्पूर्वीच त्यांना शंका आल्याने २ मार्च या दिवशी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.