Tamilnadu Collector Controversial Remarks : मुलीनेच काहीतरी केले असेल, म्हणून अत्याचार झाल्याचे जिल्हाधिकार्‍यांचे संतापजनक विधान

तमिळनाडूत ३ वर्षांच्या मुलीवर नातेवाईक असणार्‍या मुलाकडून लैंगिक अत्याचार

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू राज्यातील मायिलादुथुराई जिल्ह्यात एका ३ वर्षांच्या मुलीवर तिच्याच १६ वर्षाच्या नातेवाइकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ५ दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या अत्याचारानंतर या मुलाने नंतर मुलीला अमानुष मारहाणही केली. तिच्यावर रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत.

या घटनेविषयी जिल्हाधिकार्‍यांनी संतापजनक विधान केले आहे. जिल्हाधिकारी ए.पी. महाभारती म्हणाले की, या मुलीनेच काहीतरी केले असावे, तिच्या वागण्यामुळेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असावा. मला मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी सकाळी ती मुलगी मुलाच्या तोंडावर थुंकली होती. कदाचित् ते कारण असू शकते. आपण दोन्ही कडचे म्हणणे समजून घ्यायला हवे.

संपादकीय भूमिका

‘३ वर्षांच्या मुलीने काहीतरी केले, म्हणून तिच्यावर अशा प्रकारे अत्याचार झाले’, असे बोलून जिल्हाधिकारी मुलाचे समर्थन करत आहेत. अशा जिल्हाधिकार्‍यांवरही गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे.