
कोल्हापूर, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात ‘मराठी भाषा गौरवदिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनाचे जनक कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला सेवानिवृत्त लेखाधिकारी आणि लेखक-कवी श्री. सुरेश कुलकर्णी, ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. अजय केळकर यांच्यासह कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक श्री. शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी श्री. संतोष बोगरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्री. अनिल म्हेत्तर, स्थानकप्रमुख श्री. मल्लेश विभूते यांच्यासह चालक, वाहक, कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.
बसस्थानक परिसर स्वच्छ करून सर्व प्रवासी बांधव, कर्मचारी यांना ध्वनीक्षेपकावरून ‘मराठी भाषा गौरवदिना’च्या शुभेच्छा देण्यात आल्या. श्री. विजय निगडे यांनी ओघवत्या वाणीत सूत्रसंचालन केले. प्रमुख पाहुणे श्री. सुरेश कुलकर्णी यांनी मराठी भाषेची गुणवैशिष्ट्ये सांगून तिचे महत्त्व विशद केले. आगार व्यवस्थापक श्री. प्रमोद तेलवेकर यांनी आभार प्रदर्शन केले. साहाय्यक वाहतूक नियंत्रक श्री. दीपक घारगे यांच्यासह श्री. मल्लेश विभूते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
आपण नेहमी मराठी भाषेसाठी आग्रही असायला हवे ! – अजय केळकर, ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर
२७ फेब्रुवारी हा दिवस वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असून वर्ष २०१३ पासून शासनाने हा दिवस ‘मराठी भाषा गौरवदिन’ म्हणून साजरा करण्यास प्रारंभ केला. वि.वा. शिरवाडकर यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार, तसेच पद्मश्री मिळाला आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपणही नेहमी मराठी भाषेसाठी आग्रही असायला हवे.