आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची १३ पथके !

स्वारगेट (पुणे) बलात्कार प्रकरण

‘ड्रोन’चा वापर, माहिती देणार्‍यास १ लाख रुपयांचे पारितोषिक

पुणे – स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही गाडीमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली. त्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या शोधासाठी १३ पथकांकडून शोध चालू आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याला पकडून देणार्‍या व्यक्तीला १ लाख रुपयांचे बक्षीसही सरकारकडून घोषित करण्यात आले आहे. पोलिसांकडून ठिकठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण पहाण्याचे काम चालू आहे. त्याचा शोध घेण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर करण्यात येत आहे. गाडेच्या मित्र, मैत्रिण, कुटुंबातील आणि नातेवाईक यांकडे चौकशी करण्यात येत आहे.

शहरात आणखी एक घटना !

एका टॅक्सीचालकाने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. संगणक अभियंता असलेल्या तरुणीने ‘कॅब’ची (प्रवासी गाडी) नोंदणी केली. मुलगी गाडीमध्ये बसल्यानंतर चालकाने गाडीतील आरशाकडे पहात हस्तमैथून करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे संबंधित तरुणीने रस्त्यातच गाडी थांबवून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

आरोपीचा राजकीय संबंध !

आरोपी हा शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा कार्यकर्ता असल्याचे समोर येत आहे. त्याच्या ‘व्हॉट्सॲप’ डीपीवर आमदारांचे छायाचित्र आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याने आमदारांचा प्रचार केला होता. आमदार कटके म्हणाले की, माझा आरोपीशी कसलाच संबंध नाही. त्याने माझे छायाचित्र व्हॉट्सॲपवर लावले; म्हणून तो माझा कार्यकर्ता होत नाही.

या प्रकरणाचे अन्वेषण गंभीरतेने करा. आरोपीला त्वरित अटक करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिला.

दोन वेळा लैंगिक अत्याचार !

पीडित तरुणीची वैद्यकीय पडताळणी करण्यात आली. त्याचा अहवाल समोर आला आहे. आरोपीने एकदा नव्हे, तर २ वेळा लैंगिक अत्याचार केला आहे.

तृप्ती देसाई यांना अटक !

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या संघटनेकडून स्वारगेट बसस्थानकामध्ये आंदोलन करण्यात येत होते.