भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी संबंध असतो का ? याविषयी श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानातील काही सूत्रे आपण १६.२.२०२५ या दिवशी पाहिली. त्यापुढील सूत्रे येथे दिली आहेत.
(भाग २)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/885003.html
६. ‘संस्कृत भाषा सर्वप्रथम पृथ्वीवर कशी अवतरित झाली ?’, यासंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
‘श्री सरस्वतीदेवीचे ६ गण आणि भगवान शिवाचे ६ गण, अशा एकूण १२ गणांद्वारे संस्कृत भाषेतील एकेका अक्षराची निर्मिती झाली आहे. त्याचे विश्लेषण पुढे दिले आहे.
६ अ. श्री सरस्वतीदेवीच्या ६ गणांचे संस्कृत भाषेच्या निर्मितीसंबंधीचे कार्य : ‘वत्स’, ‘पुलू’, ‘नित’, ‘संवत्स’, ‘केतु’ आणि ‘भार्गव’ हे श्री सरस्वतीदेवीचे ६ गण आहेत. या गणांना पृथ्वीवरील मनुष्य, प्राणी, पक्षी आणि निसर्ग, तसेच व्यक्तीची शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक स्थिती यांच्याविषयी संपूर्ण ज्ञान असते.
हे गण देवलोकातील मूळ संस्कृत भाषेत काही पालट करून ‘व्यक्तीची व्यावहारिक आणि आध्यात्मिक स्थिती उत्तम राहील अन् पृथ्वीवरील जिवांना सर्वांगांनी उपयोग होईल’, अशा संस्कृत भाषेची निर्मिती करतात.
देवलोकातील संस्कृत भाषेला ‘अनादि संस्कृत’ आणि पृथ्वीवरील संस्कृत भाषेला ‘आदि संस्कृत’, असे म्हटले आहे. श्री सरस्वतीदेवीचे ६ गण पृथ्वीवरील संस्कृत भाषेतील प्रत्येक शब्दाची निर्मिती करतात. त्याचे विश्लेषण पुढे दिले आहे.
६ अ १. वत्स : हा शब्द ‘अर्भका’शी संबंधित आहे. ज्याप्रमाणे स्त्रीच्या पोटात अर्भकाची वाढ होते, त्याप्रमाणे ‘वत्स’ हा गण संस्कृत भाषेतील नवीन शब्दांना जन्म देतो. त्यामुळे ‘वत्स’ हा गण अर्भकाशी संबंधित आहे’, असे म्हटले आहे.
प्रत्येक अक्षराची विशिष्ट बीजशक्ती असते. त्या बीजशक्तीमध्ये सत्त्व, रज आणि तम या गुणांचे विशिष्ट मिश्रण असते. त्यातून एका अक्षराची निर्मिती होते. प्रत्येक अक्षराच्या बीजशक्तीतील त्रिगुणांचे प्रमाण भिन्न असते. ‘वत्स’ हा गण प्रथम विशिष्ट बीजशक्ती निर्माण करतो. त्यातून पुढे एका अक्षराची निर्मिती होते. त्यानंतर ‘वत्स’ दुसर्या विशिष्ट बीजशक्तीची निर्मिती करतो. त्यातून पुढे दुसर्या अक्षराची निर्मिती होते.
६ अ २. पुलू : हा शब्द ‘जोडणे’, या अर्थाने आहे. ‘पुलू’ या गणाला व्यक्तीच्या ‘शरीरयांत्रिकी विद्ये’चे ज्ञान असते.

६ अ २ अ. ‘शरीरयांत्रिकी विद्या’ म्हणजे काय ? : ‘व्यक्तीचे शरीर ३ घटकांनी बनले आहे. त्यांपैकी पहिल्या घटकात व्यक्तीचे विविध अवयव, हाडे, मांस आणि रक्त यांचा समावेश असतो. दुसर्या घटकात व्यक्तीचे पंचप्राण अंतर्भूत आहेत आणि तिसर्या घटकात तिचा श्वास आहे.
या तिन्ही घटकांमध्ये व्यक्तीच्या श्वासाला सर्वांत सूक्ष्म मानले आहे; कारण तो शरिरातील पहिल्या घटकातील विविध अवयव, हाडे, मांस आणि रक्त अन् दुसर्या घटकातील पंचप्राण यांना नियंत्रित करतो. त्यामुळे व्यक्तीच्या श्वासाला ‘श्वासचेतना’, अशी उपमा दिली आहे.
व्यक्तीचा श्वास हीच चेतना मानली आहे. त्यामुळे व्यक्तीचा श्वास थांबला की, तिची चेतनाही थांबते. व्यक्तीच्या शरिरातील वरील तिन्ही घटकांमुळे तिचे शरीर एखाद्या यंत्राप्रमाणे दीर्घकाळ कार्य करते. त्यामुळे व्यक्तीच्या शरिराला यंत्राची उपमा दिली आहे. या शरीररूपी यंत्राचे ज्ञान ज्या विद्येत आहे, तिला ‘शरीरयांत्रिकी विद्या’, असे म्हटले आहे.
६ अ २ आ. ‘पुलू’ या गणाचे कार्य : ‘पुलू’ या गणाला व्यक्तीच्या शरिराचे संपूर्ण विज्ञान ठाऊक असते. त्यामुळे व्यक्तीचे शरीर, मन, बुद्धी आणि तिची आध्यात्मिक स्थिती यांना पूरक असलेल्या शब्दांच्या निर्मितीचे कार्य ‘पुलू’ हा गण करतो.
‘पुलू’ हा गण एकेका अक्षराशी संबंधित बीजशक्तीला आकार देण्याचे कार्य करतो. त्यामुळे प्रत्येक शब्दाचा विशिष्ट आकार सिद्ध होतो. व्यक्तीच्या शरिराची रचना आणि तिला पूरक असलेले अक्षर यांना जोडण्याचे कार्य करतो, तो ‘पुलू’ हा गण होय.
६ अ ३. नित : ‘नित’ म्हणजे नेहमी. ‘लोकांना एकमेकांशी संवाद साधतांना नेहमी लागणारे शब्द कोणते ?’, याचे ज्ञान ‘नित’ या गणाला असते. त्यामुळे संस्कृत भाषेत व्यक्तीला नेहमी लागणार्या शब्दांच्या निर्मितीचे कार्य ‘नित’ हा गण करतो.
६ अ ४. संवत्स : यातील ‘सं’, म्हणजे काळ आणि ‘वत्स’ या शब्दाचा अर्थ ‘युगांचे चक्र’, असा आहे. काळातूनच सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग यांची निर्मिती होते. ज्या गणाला अनंत काळ आणि त्यातील युगांची चक्रे यांचे सखोल ज्ञान आहे, त्या गणाला ‘संवत्स’, असे म्हटले आहे.
‘संवत्स’ या गणाला सूक्ष्म लोक आणि पृथ्वी येथील काळाचे संपूर्ण ज्ञान असते. संस्कृत भाषा सूक्ष्म लोक आणि पृथ्वीवरील युगे यांनुसार पालटत जाते. हे कार्य ‘संवत्स’ या गणाचे असते.
६ अ ५. केतु : ‘के’ हा शब्द व्यक्तीचे शब्द उच्चारण्याचे तंत्र आणि ‘तु’ हा शब्द पृथ्वीवरील वातावरण यांच्याशी संबंधित आहे. ‘केतु’ या गणाला व्यक्तीची शब्दांचा उच्चार करण्याची क्षमता आणि उच्चाराचा वातावरणावरील परिणाम यांविषयीचे ज्ञान असते. त्यानुरूप तो संस्कृत भाषेतील शब्दांची निर्मिती करण्यास साहाय्य करतो.
६ अ ६. भार्गव : ‘भा’ हा शब्द पृथ्वीशी संबंधित आहे आणि ‘र्गव’ हा शब्द ‘पृथ्वीवरील विविध विषयांतील भाव’ यांच्याशी संबंधित आहे. ‘भार्गव’ या गणाला ‘व्यक्तींतील विविध विषयांतील भाव शब्दांतून प्रगट कसे करायचे ?’, याविषयीचे ज्ञान असते. ‘भार्गव’ हा गण संस्कृत भाषेत विविध विषयांतील भाव शब्दांद्वारे प्रगट होण्यासाठी आवश्यक असलेल्या शब्दांच्या निर्मितीचे कार्य करतो.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२३)
श्री सरस्वतीदेवीच्या ६ गणांची वैशिष्ट्ये
१. ‘हे गण भाषेशी संबंधित आहेत.
२. ते अनादि आहेत.
३. त्या गणांना ‘गणअग्री’ किंवा ‘गणाधिपती’ असे म्हणतात. ‘गणअग्री’ या शब्दातील ‘अग्र’ या शब्दाचा अर्थ ‘पुढे’, असा होतो. सरस्वतीदेवीच्या सर्व गणांपैकी भाषेसंबंधीचे हे ६ गण प्रधान गण असल्याने त्यांना ‘गणाग्री (गणअग्री)’, असे म्हणतात, तसेच ‘गणाधिपती’ या शब्दातील ‘अधिपती’, याचा अर्थ ‘प्रमुख’ किंवा ‘प्रधान’ या अर्थांनी असल्याने त्या ६ गणांना ‘गणाधिपती’, असेही म्हटले आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२३)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/889027.html
|