‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध’, याविषयी आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भाषा अन् तिची लिपी यांमध्ये सात्त्विकता निर्माण होण्यासाठी आवश्यक घटक, संस्कृत भाषा पृथ्वीवर कशी अवतरित झाली ? आणि त्या अनुषंगाने आध्यात्मिक विश्लेषण’, वाचले. आज याचा पुढचा भाग येथे दिला आहे.
(भाग ३)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/886916.html
६. ‘संस्कृत भाषा पृथ्वीवर कशी अवतरित झाली ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण
६ आ. संस्कृत भाषेच्या निर्मितीशी संबंधित असलेल्या भगवान शिवाच्या ६ गणांची नावे आणि त्यांचे कार्य
६ आ १. सर्ग : ‘स’ हा शब्द संस्कृत भाषेशी संबंधित आहे आणि ‘र्ग’ हा शब्द संस्कृत भाषेच्या नियमांशी संबंधित आहे. संस्कृत भाषेतील व्याकरणाचे प्रधान नियम ‘सर्ग’ हा गण ठरवतो.

६ आ २. विसर्ग : ‘वि’ म्हणजे ‘तोड’ किंवा ‘तोडणे’ आणि ‘सर्ग’ म्हणजे नियम. भाषेत शब्दांना आवश्यक तेथे जोडणे आणि तोडणे यांच्याशी संबंधित नियमांची निर्मिती करतो, तो ‘विसर्ग’ हा गण होय. ‘विसर्ग’ हा गण भाषेतील शब्दांना बंध घालतो. त्यामुळे त्याला ‘बंधगण’ किंवा ‘बंधदेव’, असेही म्हटले आहे.
६ आ २ अ. ‘विसर्ग’ हा गण कार्य कसे करतो ? : भाषेत विषयानुरूप विविध शब्द एकत्र केले जातात. त्यामुळे विषयाला अर्थ प्राप्त होतो. ही प्रक्रिया ‘विसर्ग’ हा गण करत असतो. या निर्मितीच्या प्रक्रियेला शब्दाची ‘मूलसंज्ञा’, असे म्हटले आहे.
६ आ २ आ. ‘मूलसंज्ञा’ म्हणजे काय ? : ‘मूल’ म्हणजे ‘एखाद्या विषयाची मूळ संकल्पना’ आणि ‘संज्ञा’ म्हणजे तिचे शब्द रूपातील प्रागट्य. त्याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
६ आ २ इ. संस्कृत भाषेतील ‘जल’ हा शब्द आणि त्याचे समानार्थी शब्द यांच्या निर्मितीतील टप्पे
१. जेव्हा ‘विसर्ग’ हा गण प्रथम दैवी प्रेरणेने ‘ज’ आणि ‘ल’ ही दोन अक्षरे एकत्र करतो अन् त्यांतून ‘जल’ हा शब्द सिद्ध करतो, तेव्हा तो ‘जल म्हणजे काय ? जलाची निर्मिती कशी झाली ?’, याचा विचार करतो.
२. तेव्हा ‘विसर्ग’ या गणाला ‘जलाची उत्पत्ती आपतत्त्वातून झाली आहे’, याचे ज्ञान होते.
३. त्यानंतर ‘विसर्ग’ हा गण ‘या आपतत्त्वाचे शब्दरूपात आणखी प्रागट्य कसे करायचे ?’, याचा विचार करतो.
४. त्यानंतर तो आपतत्त्वाला अनुरूप असलेल्या स्पंदनांची अनुभूती घेतो.
५. त्या अनुभवातून तो ‘जल’ या शब्दाला समानार्थी असलेल्या ‘नीर’ आणि ‘तोय’ या समानार्थी शब्दांची निर्मिती करतो. हे शब्द आपतत्त्वाशी निगडित असतात.
‘विसर्ग’ या गणाला दैवी प्रेरणेने प्रथम मूळ विषय किंवा त्या विषयाची संकल्पना प्राप्त होते. त्यानंतर तो दैवी प्रेरणेने भिन्न अक्षरांना एकत्र करून एका शब्दाची निर्मिती करतो. नंतर तो त्या शब्दाच्या निर्मितीमागील पंचतत्त्वे आणि शब्दाची स्पंदने यांचा शोध घेतो. त्यानंतर तो स्वतः त्या स्पंदनांचा अनुभव घेतो आणि त्यातून तो त्या शब्दाच्या समानार्थी शब्दांची निर्मिती करतो. या प्रक्रियेतून नूतन शब्दांची नििर्मती होते. हा भाषेशी संबंधित एक सिद्धांत आहे. त्यामुळे या प्रक्रियेला ‘सूत्रसिद्धांत’, असे म्हणतात.
६ आ २ इ १. ‘सूत्रसिद्धांत’ म्हणजे काय ? : ‘विसर्ग’ हा गण तीन घटकांना एकत्रित करून शब्दांची निर्मिती करतो. त्यांपैकी पहिला घटक शब्दांतील अध्यात्माशी संबंधित आहे. दुसरा घटक पृथ्वीवरील वातावरण आणि तिसरा घटक व्यक्तीची भाषेशी संबंधित मानसिक, बौद्धिक अन् आध्यात्मिक क्षमता यांच्याशी संबंधित आहे.
या तीन घटकांचा विचार करून ‘विसर्ग’ हा गण शब्दांचे नियम सिद्ध करतो. या प्रक्रियेला ‘सूत्रसिद्धांत’, ‘सूत्रसंहिता’ किंवा ‘सूत्रगणिती विज्ञान’, असे म्हणतात.
६ आ ३. मालिनी : ‘माला’, म्हणजे जोडणे. भाषेत एखादा विषय विविध ओळींद्वारे पूर्ण होतो. ज्याप्रमाणे फुलांची माळ एकेक फूल जोडून सिद्ध होते, त्याप्रमाणे भाषेतील एका विषयाची माळ विविध ओळींद्वारे सिद्ध होते. या ओळींची रचना ‘मालिनी’ या स्त्री गणामुळे सिद्ध होते. तिला ‘गणिनी’, असेही म्हणतात.
६ आ ४. बंधिनी : भाषेला शब्द, अर्थ, उच्चार आणि व्याकरण यांची बंधने आहेत, म्हणजे विशिष्ट नियम आहेत. या नियमांमुळे भाषेतील देवत्व टिकून रहाते आणि ते मनुष्याला अनुभवता येते. भाषेला विशिष्ट नियमांमध्ये बांधते, ती ‘बंधिनी.’ ही स्त्री गण आहे.
६ आ ५. स्वराणी : भाषेत प्रत्येक शब्दाचा विशिष्ट उच्चार असतो. याचे ज्ञान ‘स्वराणी’ या स्त्री गणाला असते. भाषेतील प्रत्येक शब्दाचा उच्चार ‘स्वराणी’ ही स्त्री गण निश्चित करते.
या स्त्री गणाचा वास व्यक्तीच्या कंठामध्ये असतो. त्यामुळे व्यक्तीला शब्दांचा उच्चार करता येतो. तेव्हा ‘स्वराणी’ या गणाला ‘कंठरसी’, ‘कंठगामी’, ‘कंठिणी’, ‘कंठनिवासिनी’, ही संबोधने प्राप्त होतात.
६ आ ६. श्रवसु : ‘श्रव’ म्हणजे ऐकणारा आणि ‘सु’ हा शब्द ‘उत्तम प्रकारे’ या अर्थाने आहे. शब्दांचे उच्चार उत्तम प्रकारे ऐकतो, तो ‘श्रवसु’ हा गण होय. ‘श्रवसु’ या गणाला ‘विहर्ग’, असेही म्हणतात. ‘वि’ म्हणजे शब्दांचा उच्चार आणि ‘हर्ग’ म्हणजे श्रवण करणे. शब्दांच्या उच्चारांचे श्रवण करणार्या गणाला ‘विहर्ग’, ‘श्रव’ किंवा ‘श्रवसु’, असे म्हणतात.
६ आ ६ अ. ‘श्रवसु’ या गणाचे कार्य : विविध गणांनी शब्दांची निर्मिती केल्यावर ‘त्यांचा उच्चार आणि त्यांचे पृथ्वीवरील वातावरणावरील परिणाम’ हे अभ्यासण्याचे कार्य ‘श्रवसु’ हा गण करतो.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२३)
याच्या पुढील लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/891129.html
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. |