कण्हेर धरण क्षेत्रातील वेण्णा नदीवर बुडीत बंधारे बांधावेत !

जावळी ग्रामस्थांची मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे मागणी

सातारा, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – कण्हेर धरणाच्या उभारणीमध्ये जावळी तालुक्यातील अनेक गावे विस्थापित झाली आहेत; मात्र कण्हेर धरणातील पाणी जावळीवासियांना अल्प आणि इतर जिल्ह्यांना अधिक मिळत आहे. मार्च ते जून या कालावधीमध्ये वेण्णा नदीपात्रातील रिटकवली गावाच्या वरील बाजूस नदीपात्र कोरडे ठणठणीत होते. त्यामुळे शेतीला तर सोडाच; परंतु ग्रामस्थांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नाही. यामुळे वेण्णा नदीपात्रात ४ ते ५ बुडीत बंधारे बांधावेत, अशी मागणी जावळी ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.