पालकांचे दुर्लक्ष !

काही वर्षांपूर्वीपर्यंत पालक त्‍यांच्‍या मुलांना भरपूर वेळ देऊ शकत होते. आई-वडील मुलांना गोष्‍टी सांगत, मुलांवर सुयोग्‍य संस्‍कार करत असत. त्‍यांच्‍यासमवेत खेळत असत. त्‍यामुळे मुलांचे बालपण निरोगी आणि आनंदी असे. आजच्‍या तंत्रज्ञानाच्‍या युगात मात्र परिस्‍थिती पूर्णपणे पालटलेली दिसून येते. विशेषतः स्‍मार्टफोनच्‍या अतीवापरामुळे आई-वडील मुलांकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्‍याच्‍या महिलाच भ्रमणभाषच्‍या आहारी गेलेल्‍या आहेत. त्‍यामुळे त्‍या मुलांना वेळ देण्‍यामध्‍ये, मुलांवर संस्‍कार करण्‍यामध्‍ये अल्‍प पडत आहेत आणि त्‍यांचे बघून मुलांमध्‍येही भ्रमणभाषचे आकर्षण वाढत चालले आहे. त्‍याचे गंभीर परिणाम मुलांच्‍या मानसिक आणि शारीरिक विकासावर होत आहेत. सततच्‍या भ्रमणभाष वापरामुळे त्‍यांच्‍या डोळ्‍यांवर, मेंदूवर परिणाम होत आहे, ते मैदानी खेळापासून दूर जात आहेत.

पूर्वी ज्‍या प्रेमाने आणि आपुलकीने मुलांना शिकवले जात होते, त्‍या गोष्‍टी आता मागे पडू लागल्‍या आहेत. मुलांना आई-वडिलांकडून मिळणारे प्रेम, मार्गदर्शन आणि शिस्‍त यांचा अभाव जाणवू लागला आहे. कुटुंबातील संवाद न्‍यून झाल्‍यामुळे मुलांना भावनिकदृष्‍ट्या अस्‍थिरता येते. सध्‍याच्‍या पालकांना मुलांचे विचार ऐकून घ्‍यायलाही वेळ नसतो. मुलांना आई-बाबा आणि त्‍यांचे प्रेम हवे असते. मुले आई-वडिलांना सतत भ्रमणभाष वापरतांना पहातात आणि त्‍यांनाही तसाच मोह होतो. त्‍यामुळे मैदानी खेळांची आवड न्‍यून होऊन त्‍यांची शारीरिक क्षमता घटत आहे. मुलांमध्‍ये हट्टीपणा, आक्रमकता वाढत आहे. आपल्याला जर ‘आपली मुले आदर्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’, या संतवचनाप्रमाणे पालकांनाही आदर्शवादाचे धडे गिरवायला हवेत. मुलांनाही त्यांच्या आई-वडिलांचे अनुकरण करायला आवडत असते; म्हणूनच सर्व पालकांनी स्वतः धर्माचरण करून आदर्श बनण्याचा प्रयत्न करायला हवा. भ्रमणभाषचा वापर मर्यादित करून मुलांना पुस्तके, खेळणी आणि मैदानी खेळ यांकडे वळवावे. त्यांच्यासमवेत गोष्टी, बौद्धिक खेळ आणि छंद जोपासण्यासाठी वेळ द्यावा. पालकांनी योग्य वेळी योग्य संस्कार दिल्यासच पुढच्या पिढीचे भवितव्य अधिक उज्ज्‍वल होईल.

जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच हिंदवी स्‍वराज्‍य आणि हिंदु धर्म यांचे संस्‍कार केले. त्‍यामुळे श्री भवानीदेवीच्‍या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्‍वराज्‍याची स्‍थापना केली. त्‍याचप्रमाणे पालकांनी त्‍यांच्‍या मुलांना लहान वयातच भ्रमणभाषचे आभासी जग न दाखवता त्‍यांच्‍यामधे अध्‍यात्‍मासह धर्मशिक्षण, राष्‍ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे बीज पेरायला हवे.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे