मडगाव ते बेळगावमार्गे कोल्हापूर प्रवासात ‘कदंबा’कडून प्रवाशांची लूट !

थेट तिकीट न देता मडगाव-बेळगाव आणि बेळगाव-कोल्हापूर अशी २ तिकिटे देऊन प्रवाशांची लूट !

२ तिकिटे देऊन प्रवाशांची लूट

कोल्हापूर – मडगाव (गोवा) ते बेळगावमार्गे कोल्हापूर या मार्गावर गोवा राज्याच्या ‘कदंबा’ (कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लि., गोवा) च्या गाड्या धावतात. या मार्गावरील एका गाडीतून १६ फेब्रुवारीला प्रवास करणार्‍या प्रवाशांना तिकीट देणार्‍या प्रणालीत बिघाड आहे, तसेच अन्य कारणे सांगून गाडीतील वाहकाने प्रवाशांना मडगाव ते कोल्हापूर असे थेट तिकीट न देता ‘गोवा-बेळगाव’ आणि ‘बेळगाव-कोल्हापूर’ अशी दोन वेगवेगळी तिकिटे दिली. यामुळे प्रवाशांना २८ रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. ५ फेब्रुवारीपासून हा प्रकार चालू असून या व्यवस्थेत अद्याप सुधारणा झालेली नाही.

प्रवाशांची वेगवेगळी काढण्यात आलेली तिकिटे

एकीकडे पंतप्रधान ‘डिजिटल इंडिया’साठी प्रयत्न करत असतांना दुसरीकडे प्रवाशांची वाहतूक व्यवस्था करणार्‍या एका राज्याच्या सरकारी आस्थापनास साधी त्रुटी जर दुरुस्त करता येत नसेल, तर आपण अजून जुन्याच मानसिकतेत अडकून पडलो आहे, असेच म्हणावे लागेल. ‘कदंबा’च्या त्रुटीचा फटका मात्र प्रवाशांना बसत असून त्यांना प्रत्येक वेळेस आर्थिक भुर्दंडास सामोरे जावे लागत आहे. तरी ही त्रुटी लवकरात लवकर दूर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

प्रवाशांना असा बसत आहे आर्थिक फटका !

मडगावहून बेळगावमार्गे कोल्हापूरला जातांना एका प्रवाशाचे भाडे २८९ रुपये आहे; परंतु कथित तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन मडगाव ते बेळगाव १६५ रुपये आकारले जात आहेत, तर बेळगाव ते कोल्हापूर १५२ रुपये आकारले जात आहेत. याचा अर्थ २८९ रुपयांऐवजी ३१७ रुपये, म्हणजेच २८ रुपये अतिरिक्त भाडे भरण्याची एकप्रकारे बळजोरीच प्रवाशांना केली जात आहे.