Trump Slams $21M U.S. Funding : भारताकडे पुष्कळ पैसा असल्याने आपण त्यांना आर्थिक साहाय्य का करावे ? – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे विधान !

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतातील मतदारांची संख्या सुधारण्यासाठी संमत करण्यात आलेला १८२ कोटी रुपयांचा निधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी रहित केला आहे. इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाने (‘डीओजीई’ने) हा निधी रहित करण्याची घोषणा केली होती. त्यावर आता ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली.

ट्रम्प या आदेशावर स्वाक्षरी करतांना म्हणाले की, आपण भारताला २ कोटी १० लाख अमेरिकी डॉलर्स (१८२ कोटी रुपये) का देत आहोत ? त्यांच्याकडे खूप अधिक पैसे आहेत. ते आपल्या तुलनेत जगातील सर्वांत अधिक कर आकारणार्‍या देशांपैकी एक आहेत; त्यांचे कर खूप अधिक असल्याने आपण तिथे पोचू शकत नाही. मला भारत आणि त्यांचे पंतप्रधान यांच्याबद्दल पुष्कळ आदर आहे; परंतु आपण मतदारवाढीसाठी त्यांना पैसे का देत आहोत ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. (ट्रम्प यांनी आता ‘हा पैसा का आणि नेमका कशासाठी खर्च केला जात होता ?’, याची चौकशी करून जनतेला सांगावे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अमेरिका भारताला नाही, तर भारत अस्थिर करण्यासाठी पैसा देत होती, आता अमेरिकाच जर ते बंद करत असेल, तर भारताला आनंदच आहे ! त्याच वेळी अमेरिका भारतात कुणाला पैसे देत होती आणि ते त्या पैशांचा कसा वापर करत होते, हेही समोर यायला हवे !