महर्षींच्‍या आज्ञेनुसार कर्नाटकमधील ‘संडूर’ येथे कार्तिकेयाच्‍या दर्शनासाठी गेल्‍यावर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘३०.१.२०२१ या दिवशी शनिवार होता. आम्‍ही (मी आणि माझ्या समवेत दौर्‍यावर असलेले ४ साधक) अंजनेयाद्रि डोंगरावर असलेल्या हनुमंताच्या जन्मस्‍थानी त्याचे दर्शन घ्यायला निघालो. आम्ही अंजनेयाद्रियाच्या पायथ्याशी पोचलो, तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. एवढी गर्दी पाहून आम्ही तिथूनच परत फिरलो आणि ‘दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर जायचे’, असे ठरवले. अंजनेयाद्रिवर जाण्यासाठी ६०० पायर्‍या असून ती चढण अवघड आहे; म्हणून आम्ही माझ्‍यासाठी डोली (टीप) करायची ठरवले. 

(टीप – साधारणतः डोंगरावर चढता न येणार्‍या किंवा वयस्‍कर लोकांना डोंगरावर नेण्यासाठी वापरण्यात येणारी साधी पालखी. या पालखीत बसवून त्यांना डोंगरावर नेले जाते. ही पालखी माणसे वाहून नेतात.’  संकलक)

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. अकस्‍मात् झालेला त्रास !

१ अ. अकस्‍मात्‌पणे रात्री जेवतांना तोंड उघडता न येणे, ते थोडे विचित्र वाटणे, त्‍यासाठी नामजपादी उपाय केल्‍यावर बरे वाटणे : त्‍या रात्री मला पुष्‍कळ त्रास झाला. रात्री जेवतांना अकस्‍मात् मला ‘आ’ करता येईना. मला वाटले, ‘माझ्‍या तोंडात गाठ झाली आहे की काय ?’; कारण कालपासूनच तोंड उघडतांना मला उजव्या गालाच्या आतल्या बाजूला त्रास होत होता. मी माझ्या बेंगळुरूच्या द़ंतवैद्यांना भ्रमणभाष केला. त्या मला म्हणाल्‍या, ‘‘कधी कधी असे जबड्याचे स्नायू घट्ट होतात. त्यामुळे ते दुखतात. तो भाग गरम पाण्याने शेका आणि गरम मीठ-पाण्याच्या गुळण्या करा. तीन दिवसांनी बरे वाटेल.’’ खरेतर जबड्याचे स्नायू असे एकाएकी घट्ट होण्याचे काहीच कारण नव्हते. मला हे थोडे विचित्रच वाटले; म्हणून मी त्यासाठी नामजपादी उपाय केले. त्यानंतर मला बरे वाटू लागले. ‘अनिष्ट शक्‍ती किती प्रकारांनी आपल्या कार्यात अडथळे आणतात ?’, ते माझ्‍या लक्षात आले आणि ‘गुरुदेव प्रत्येक वेळी आपल्याला त्यातून कसे बाहेर काढतात ?’, याची प्रचीतीही आली.

२. कार्तिकेयाचे स्‍वप्‍नात झालेले दर्शन !

२ अ. महर्षींनी ‘संडूर’ या गावी जाऊन कार्तिकेयाचे दर्शन घेण्‍यास सांगितले असणे; पण त्‍याआधी ‘इलकल’ येथे जायचे ठरवणे : अंजनेयाद्रि येथे जाणे झाले नाही; म्‍हणून त्‍या दिवशी सायंकाळी आम्‍ही हंपीच्‍या जवळ असलेल्‍या ‘इलकल’ (‘इरकल’) या गावी जायचे ठरवले. खरेतर महर्षींनी आम्हाला हंपीपासून २ घंट्यावर असलेल्या ‘संडूर’ या गावी कार्तिकेयाच्या दर्शनाला जाण्याची आज्ञा दिली होती; पण तो भाग थोडा जंगलात आहे; म्हणून आम्ही ‘दुपारी ‘इलकल’ येथे आणि उद्या सकाळी ‘संडूर’ येथे जाऊया’, असे ठरवले.

२ आ. ‘इलकल’ येथे जाण्‍यापूर्वी विश्रांती घेतांना झोपेत कार्तिकेयाचे दर्शन होणेे : दुपारी ‘इलकल’ येथे जाण्‍यापूर्वी मी १० मिनिटे झोपले होते. तेव्‍हा मला स्‍वप्‍नात कार्तिकेयाचे दर्शन झाले. त्‍याच्‍या उजव्‍या हातात त्‍याचे ‘वेल’ हे भाल्‍यासारखे शस्‍त्र होते. मला त्‍यातून अग्‍नीज्‍वाळा बाहेर पडतांना दिसल्‍या. ते पाहून मला वाटले, ‘आता स्‍वयं देवांचा सेनापती कार्तिकेय सनातन संस्‍थेवर आलेल्या संकटासाठी धावून आला आहे.’

३. ‘इलकल’ या गावी दिलेली भेट !

३ अ. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयासाठी सात्त्विक साड्यांची माहिती घेण्‍यासाठी आणि त्‍याचे ध्‍वनीचित्रीकरण करण्‍यासाठी ‘इलकल’ या गावी जाणे : ‘इलकल’ या गावातील पारंपरिक हातमागावरील साड्या प्रसिद्ध आहेत. ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयासाठी सात्त्विक साड्यांची माहिती मिळावी आणि त्याचे ध्वनीचित्रीकरण करता यावेे’, यासाठी आम्ही ‘इलकल’ या गावी गेलो.

३ आ. ‘इलकल’ येथे हातमाग आणि हातमाग विणकरी यांची संख्या नगण्य झाली आहे’, असे लक्षात येऊन ‘या कलेचे जतन करणे आवश्यक आहे’, असे जाणवणे : आम्‍ही ‘इलकल’ येथे गेल्‍यावर आमच्या लक्षात आले, ‘येथे हातमाग जवळजवळ नामशेष झाले असून हातमागावर कापड विणणारे विणकरीही न्यून झाले आहेत. आता येथे सर्वत्र ‘पॉवरलूम’ (विजेवर चालणारे माग) झाले आहेत.’ एका ठिकाणी आम्ही नमुना आणि संशोधन यांसाठी हातामागावरील काही ‘इलकली’ साड्या विकत घेतल्या. ‘आता पुढे आपल्याला पारंपरिक वस्त्र मिळणार नाही’, हे ऐकून पुष्कळ वाईट वाटले. ‘आताच आपल्याला हे सर्व जतन केले पाहिजे, नाहीतर आपण भारतातील पुष्कळ मोठ्या सात्‍त्विक ठेव्याला मुकू’, हे आमच्या लक्षात आले.

गेरू माती आणि कार्तिकेयाचे पांढरे भस्‍म यांच्‍या डोंगरावर डावीकडून श्री. स्नेहल राऊत, श्री. सत्‍यकाम कणगलेकर, श्रीचितशक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, श्री. विनायक शानभाग आणि वाटाड्या

४. ‘संडूर’ येथील कार्तिकेय आणि माता पार्वती यांचे घेतलेले दर्शन !

४ अ. ‘संडूर’ येथील गेरू माती आणि कार्तिकेयाचे पांढरे भस्‍म याचा डोंगर ! : ‘इलकल’ येथील सेवा लवकर झाल्‍यामुळे आम्‍ही तिथूनच ‘संडूर’ या गावी जाण्‍याचे ठरवले. रात्र होण्‍याच्‍या आधी आम्हाला तिथे पोेचायचे होते. ‘संडूर’ येेथील कार्तिकेयाचा डोंगर फार सात्त्विक आहे. येथे गेरू नावाच्या मातीचा डोंगर आहे.  या डोंगरात खोदल्यावर आतमध्ये कार्तिकेयाचे पांढरे भस्म मिळते. हे भस्म हाताला अत्यंत मऊ लागते.

४ आ. कार्तिकेयाचे पांढरे भस्‍म, म्‍हणजे आदिमाया पार्वतीचे दूध असल्यामुळे त्याचा स्पर्श अतिशय मऊ लागणे : या भस्‍माविषयी येथे एक कहाणी सांगतात, ‘एकदा पार्वतीमाता कार्तिकेयाला म्‍हणाली, ‘‘तू विवाह कर. मी तुझ्‍यासाठी मुलगी पहाते.’’ कार्तिकेयाला विवाह करायचा नव्‍हता; म्‍हणून तो पार्वतीमातेला म्‍हणाला, ‘‘मला विवाहबंधनात अडकायचे नाही.’’ तरी पार्वती त्‍याच्‍या मागे लागली; म्‍हणून कार्तिकेयाचा क्रोध अनावर झाला आणि तो रुसून ‘संडूर’ गावातील या डोंगरावर आला. त्याच्या पाठोपाठ पार्वतीही या डोंगरावर आली. आपला मुलगा आपले ऐकत नाही; म्हणून पार्वती रागाने त्याला म्‍हणाली, ‘‘मी तुला लहानपणापासून सांभाळून एवढा मोठा केला. आता तू माझे ऐकत नाहीस. मी तुला पाजलेले माझे दूध मला परत दे.’’ हे ऐकून रागाने कार्तिकेयानेही तिचे सर्व दूध ओकून बाहेर टाकले. या दुधाचाच डोंगर झाला असून त्या डोंगराला कार्तिकेयाच्या भस्माचा डोंगर म्‍हणतात. हे भस्म, म्हणजे साक्षात् आदिमाया आदिशक्ती पार्वतीचे दूध आहे.

४ इ. ‘इलकल’ येथे जाण्‍यापूर्वी स्‍वप्‍नात दिसलेली कार्तिकेयाची मूर्ती ‘संडूर’ येथील कार्तिकेयाच्‍या मंदिरातील असणे : आम्‍ही येथे असलेल्‍या कार्तिकेयाच्‍या देवळात दर्शनाला गेलो. ‘इलकल’ येथे जाण्‍यापूर्वी दुपारी मला स्‍वप्‍नात कार्तिकेयाची हीच मूर्ती दिसली होती. तेव्‍हा मला वाटले, ‘देवाला मला सुचवायचे होते, ‘तू आज दुसरीकडे जायचे नियोजन केले असलेस, तरी आजच तू माझ्या दर्शनाला येथे येणार आहेस आणि म्हणूनच मी तुला स्वप्नद़ृष्‍टांत दिला आहे.’ आपल्याला ‘द़ेवाच्या मनात काय आहे ?’ ते खरच कळत नाही.

४ ई. कार्तिकेय आणि माता पार्वती यांचे घेतलेले दर्शन : कार्तिकेयाच्‍या मंदिराच्‍या जवळच पार्वतीचेही मंदिर आहे. ही दोन्‍ही मंदिरे ८ व्‍या शतकात चोल राजाने बांधली आहेत. दोन्ही मंदिरे अत्यंत सुंदर आहेत. आम्ही द़ोन्ही मंदिरांत जाऊन देवतांचे दर्शन घेऊन आणि तेथील पवित्र भस्माचा प्रसाद घेऊन मंदिरातून बाहेर पडलो.

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, नंद्याळ, आंध्रप्रदेश

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक