मुख्य मार्ग बंद केल्याने ४ किलोमीटरहून अधिक अंतर चालून जातांना भाविकांचे हाल !

प्रयागराज, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभमेळ्यासाठी येणार्या आणि परतणार्या भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे. प्रयागराज जंक्शन रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी इतकी वाढली आहे की, ती नियंत्रित करण्यात पोलिसांची तारांबळ उडत आहे. दुर्घटना टाळण्यासाठी प्रयागराज जंक्शन रेल्वे स्थानकावर जाणारा नियमित मुख्य रस्ता आणि त्या मार्गावरील वाहतूक पोलिसांनी रोखली आहे. त्यामुळे तब्बल ४ तास प्रवास करून भाविकांना प्रयागराज जंक्शनला जावे लागत आहे.
भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी प्रयागराज जंक्शन रेल्वे स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर खासगी आणि प्रवासी वाहतूक रोखली आहे. त्यामुळे भाविकांना त्यांचे सर्व साहित्य घेऊन ४ किलोमीटरहून अधिक प्रवास करावा लागत आहे. प्रयागराज जंक्शन स्थानकाच्या पालटलेल्या मार्गात प्रवाशांकरता प्रसाधनगृहाची व्यवस्था, बसण्याची सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मार्गात ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र ४ किलोमीटरहून अधिक प्रवास करावा लागेल, याची कल्पना देण्यात येत नसल्यामुळे साहित्य घेऊन प्रवास करणार्या प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.
मार्ग पालटण्यात आल्याची पूर्वसूचना नसल्याने अनेक प्रवाशांच्या गाड्या सुटल्या !
प्रशासनाने दुर्घटना टाळण्यासाठी ही व्यवस्था केली असली, तरी त्याविषयी भाविकांना राज्यशासन किंवा रेल्वे प्रशासन यांच्याकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही किंवा मार्गात तसे फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी किमान ४-५ तास आधी जावे लागत आहे; मात्र याविषयी प्रवाशांना कल्पना नसल्याने अनेक प्रवाशांची गाडी सुटून जात आहे.