‘कार्डियाक अरेस्‍ट’ झालेल्‍या रुग्‍णांसाठी ‘कोल्‍स – कॉम्‍प्रेशन ओन्‍ली लाइफ सपोर्ट’ ही ‘कार्डियाक रिसस्‌सिटेशन’ची (‘हृदय-पुनरुज्‍जीवन तंत्रा’ची) प्रक्रिया म्‍हणजे एक संजीवनी !

‘विदेशातील सामान्‍य नागरिकांना ‘कार्डियाक रिसस्‌सिटेशन’ची माहिती असते. त्‍यामुळे त्‍यांना रुग्‍णांना तातडीने प्रथमोपचार देऊन रुग्‍णालयामध्‍ये पोचेपर्यंत जिवंत ठेवता येते. भारतात काही भागांत हे उपचार शिकवण्‍याची प्रक्रिया चालू झाली आहे; परंतु अजून ती सर्वत्र चालू झालेली नाही. ‘सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीही रुग्‍ण नागरिकांना साहाय्‍य करू शकते’, हे सर्वांना कळावे, याविषयी प्रबोधन करणे, ही काळाची आवश्‍यकता आहे.

अलीकडे ‘कोविड’च्‍या महामारीनंतर ‘कार्डियाक अरेस्‍ट’ होण्‍याचे (हृदय अकस्‍मात् बंद पडण्‍याचे) प्रमाण तरुण पिढीमध्‍येही वाढलेले आहे. जर ३ – ४ मिनिटांनंतर रुग्‍णाचे हृदय चालू झाले नाही, तर मेंदूचा रक्‍तपुरवठा थांबल्‍याने त्‍याच्‍या मेंदूची कार्यक्षमता संपते. त्‍यामुळे मेंदू निकामी (ब्रेन डॅमेज) होतोे. अशा परिस्‍थितीत प्रत्‍येक नागरिकाला ‘कार्डियाक रिसस्‌सिटेशन’ म्‍हणजे ‘हृदय-पुनरुज्‍जीवन तंत्र’ ठाऊक असणे आवश्‍यक आहे. याविषयीची माहिती पुढे दिली आहे.

रुग्‍णाचे छातीदाबन

१. रुग्‍णांवर उपचार करतांना कोणती काळजी घ्‍यावी ?

डॉ. (सौ.) लिंदा बोरकर

१ अ. स्‍वतःची आणि रुग्‍णाची सुरक्षितता पहावी ! : ‘स्‍वतःसाठी आणि रुग्‍णासाठी जागा सुरक्षित आहे ना ?’, हे आधी पहावे. रुग्‍णाला अपघाताच्‍या जागेवरून बाजूला घ्‍यावे, उदाहरणार्थ संबंधित ठिकाण हे महामार्गावरील असेल, तर अशा वेळी ‘आपणही सुरक्षित असायला पाहिजे’, हे लक्षात घ्‍यायला हवे.

१ आ. ‘रुग्‍ण जागृतावस्‍थेत आहे का ?’, हे पहावे ! : ‘रुग्‍ण बेशुद्ध आहे का ?’, हे पहाण्‍यासाठी त्‍याच्‍या खांद्यावर थाप देऊन त्‍याचे नाव विचारावे आणि त्‍याचा प्रतिसाद मिळवण्‍याचा प्रयत्न करावा. ‘रुग्‍णाचा श्‍वास चालू आहे कि नाही ?’, हे पहावे.

१ इ. तातडीने साहाय्‍य घेणे : छातीदाबन चालू करण्‍यापूर्वी लगेच स्‍वतः अन्‍य लोकांना स्‍थानिक आपत्‍कालीन साहाय्‍य केंद्राच्‍या तातडीच्‍या क्रमांकावर (क्रमांक १०८ वर) संपर्क करून ‘रुग्‍ण नेमक्‍या कोणत्‍या ठिकाणी आहे ?’, तेही कळवावे, म्‍हणजे रुग्‍णवाहिका (अ‍ॅम्‍ब्‍युलन्‍स) येण्‍याची प्रक्रिया चालू होईल !

२. ‘कोल्‍स – कॉम्‍प्रेशन ओन्‍ली लाइफ सपोर्ट’ ही उपचारपद्धत म्‍हणजे काय ?

केवळ छातीदाबन करून रुग्‍णाचा जीव वाचवता येणे शक्‍य असते. ‘कोल्‍स – कॉम्‍प्रेशन ओन्‍ली लाइफ सपोर्ट’ (COLS : Compression Only Life Support) ही एक उपचारपद्धत असून ती ‘कार्डियाक अरेस्‍ट’ (हृदय अकस्‍मात् बंद पडणे) झाल्‍याचे लवकर ओळखणे आणि हृदयक्रिया चालू करणे, तसेच रुग्णाच्या छातीवर लवकर दाब देणे अन् वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी रुग्णाला रुग्णालयात लवकर हस्तांतरण करणे’, यांवर भर देते.

३. रुग्‍णाचे छातीदाबन (Chest Compressions) कसे करावे ?

३ अ. रुग्‍णाला टणक पृष्‍ठभागावर उताणे झोपवावे ! : गंभीर स्‍थितीतील रुग्‍णाला भूमीवर अथवा कोणत्‍या तरी टणक पृष्‍ठभागावर (उदा. उचित आकाराच्‍या फळीवर) उताणे झोपवावे. टणक पृष्‍ठभाग उपलब्‍ध नसेल, तर उताणा असलेल्‍या रुग्‍णावर तो असेल त्‍या स्थितीत प्रथमोपचार चालू करावा.

३ आ. प्रथमोपचारकाने रुग्‍णाशेजारी गुडघ्‍यांवर बसावे !

१. प्रथमोपचारकाने रुग्‍णाचा खांदा आणि छाती यांच्‍या एका बाजूला त्‍याच्‍याजवळ गुडघ्‍यांवर बसावे.

२. रुग्‍णाच्‍या अंगात वस्‍त्र असल्‍यास त्‍याच्‍या छातीवरील भाग उघडा करावा. ते वस्‍त्र पूर्ण काढण्‍यात वेळ दवडू नये.

३ इ. एका हाताचा तळवा रुग्‍णाच्‍या छातीवर, म्‍हणजे खंजीरहाडाच्‍या (छातीच्‍या मधल्‍या भागातील हाडाच्‍या (‘स्‍टर्नम’च्‍या)) खालच्‍या भागावर ठेवावा !

१. एका हाताची तर्जनी (अंगठ्याजवळचे बोट) आणि मध्‍यमा (मधले बोट) यांच्‍या साहाय्‍याने रुग्‍णाच्‍या छातीची स्‍वतःच्‍या बाजूकडील सर्वांत खालची बरगडी चाचपून निश्‍चित करावी.

२. तर्जनी आणि मध्‍यमा ही दोन्‍ही बोटे बरगड्यांच्‍या खालच्‍या बाजूच्‍या आधाराने छाती अन् पोट यांच्या सीमेवर एक खोबण (लहान खड्डा) असते, तेथे न्यावी. (तेथे बरगडी खंजीर हाडाला, ‘स्टर्नम’ला जोडलेली असते.)

३. खंजीरहाडाच्‍या (‘स्‍टर्नम’च्‍या) खालच्‍या टोकापासून २ – ३ सें.मी. वरच्‍या दिशेला दुसर्‍या हाताच्‍या तळव्‍याचा मनगटाकडील मांसल भाग ठेवावा.

४. रुग्‍णाच्‍या छातीवर ठेवलेल्‍या पहिल्‍या हातावर दुसर्‍या हाताचा तळवा ठेवतांना दुसर्‍या हाताची बोटे पहिल्‍या हाताच्‍या बोटांमध्‍ये गुंफली जातील (‘इंटरलॉक’ होतील), असे करावे. पहिल्‍या हाताच्‍या बोटांचा पुढील भाग शक्‍यतो रुग्‍णाच्‍या छातीवर  टेकवू नये. (छायाचित्र १)

३ ई. रुग्‍ण व्‍यक्‍तीवर छातीदाबन कसे करावे ?

१. प्रथमोपचारकाने गुडघ्‍यांवर उभे रहावे.

२. दोन्‍ही हातांचा मनगटांपासून खांद्यांपर्यंतचा भाग त्‍या त्‍या हाताच्‍या तळव्‍याशी काटकोनात ठेवावा.

३. दोन्‍ही हातांचे कोपरे ताठ ठेवावेत.

४. शरिराच्‍या वरच्‍या भागाचे वजन पूर्ण वापरून, म्‍हणजेच खांद्यातून जोर देऊन हातांचे तळवे रुग्‍णाच्‍या खंजीर हाडावर दाबावे. (छायाचित्र २)

५. दाब देत असलेला खंजीर हाडाचा (‘स्‍टर्नम’चा) भाग न्‍यूनतम ५ सें.मी. इतका आत दाबला जाईल, इतके दाबनाचे बल ठेवावे.

६. दाबनाची गती न्‍यूनतम ‘प्रति १८ सेकंदांना ३० वेळा दाबन’ इतकी ठेवावी. १, २, ३… असे ३० अंक मोजून होईपर्यंत छातीदाबन करावे. ३० अंकांपर्यंत दाब देऊन झाल्‍यानंतर परत १ ते ३० हे अंक मोजत दाब द्यावा. (पुन्‍हा छातीदाबन करावे.) असे ५ वेळा करावे.

७. छाती एकदा दाबून झाल्‍यानंतर ती परत दाबण्‍याच्‍या मधील काळात हातांचे तळवे खंजीर हाडावरून (‘स्‍टर्नम’वरून) काढू नयेत; मात्र या काळात ‘छाती दाबलेली रहाणार नाही’, याची दक्षता घ्‍यावी.

८. जोपर्यंत रुग्‍णाचा श्‍वास आणि हालचाल चालू होत नाही, तोपर्यंत, तसेच पुढील वैद्यकीय सुविधा मिळण्‍यासाठी रुग्‍णालयात हस्‍तांतरण करीपर्यंत छातीदाबन चालू ठेवणे आवश्‍यक आहे.

९. ५ वेळा छातीदाबन केल्‍यानंतर दुसर्‍या प्रथमोपचारकाचे साहाय्‍य मिळाले, तर त्‍याने लगेच छातीदाबन चालू करावे. पहिला प्रथमोपचारक पुष्‍कळ थकून गेला, तर दाब देणे बंद करावे लागते. अशा वेळी इतरांचे साहाय्‍य घेणे अपेक्षित आहे.

– संदर्भ : सनातनचे प्रकाशन – प्रथमोपचार प्रशिक्षण (भाग १) आणि डॉ. (सौ.) लिंदा बोरकर, फोंडा, गोवा. (२०.३.२०२४)

४. छातीदाबनाचा प्रथमोपचार केल्‍यावर रुग्‍णांचे प्राण वाचल्‍याच्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती !

४ अ. प्रथमोपचारवर्गात येणार्‍या जिज्ञासू महिलेने तिच्‍या सासूबाईंवर छातीदाबनाचे उपचार केल्‍यावर त्‍या शुद्धीवर येऊन त्‍यांना बरे वाटणे : ‘एका रात्री चोपडा (जिल्‍हा जळगाव) येथील जिज्ञासू सौ. निर्मला अलकरी यांच्‍या सासूबाई बेशुद्ध होऊन त्‍यांचा श्‍वास थांबला. तेव्‍हा सौ. निर्मलाकाकूंनी प्रथमोपचारवर्गात शिकवल्‍याप्रमाणे सासूबाईंवर ‘छातीदाबन’ उपचार केले. त्‍यामुळे काही कालावधीनंतर त्‍यांचा श्‍वासोच्‍छ्‍वास परत चालू झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी त्‍यांना रुग्‍णालयात नेऊन त्‍यांची वैद्यकीय तपासणी करण्‍यात आली. तेव्‍हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘आजींना ‘कार्डियाक अरेस्ट (हृदय अकस्मात् बंद पडणे)’ झाला असतांना तर तुम्ही रात्री एवढा वेळ काय केले ? तेव्हा निर्मलाकाकू म्हणाल्या, ‘‘प्रथमोपचारवर्गात शिकवल्याप्रमाणे मी सासूबाईंवर ‘छातीदाबन’ उपचार केल्यानंतर त्यांना बरे वाटले.’’ त्या वेळी आधुनिक वैद्यांनी त्यांचे कौतुक केले.’

– सौ. सुनीता कैलास व्‍यास, जळगाव (वर्ष २०१९)

४ आ. अकस्‍मात् छातीत दुखून बेशुद्ध पडलेल्‍या चालकावर तत्‍परतेने छातीदाबनाचे प्रथमोपचार केल्‍याने चालकाचे प्राण वाचणे : ‘श्री. बंडू चेचरे हे रत्नागिरी येथे कामावर गेले होते. त्‍यांच्‍या समवेत असलेल्‍या एका चालकाच्‍या छातीत अकस्‍मात् दुखू लागले. त्‍याच्‍या हाता-पायांची बोटे काळी-निळी पडली आणि तो बेशुद्ध पडला. त्‍या वेळी तो कोणत्‍याही गोष्‍टीला प्रतिसाद देत नव्‍हता आणि त्याचा श्वासोच्छ्वासही चालू नव्हता. चेचरेकाकांनी त्याच्यावर छातीदाबनाचे उपचार केले. तेव्हा तो चालक शुद्धीवर आला. श्री. चेचरेकाका यांचे शिक्षण अल्प झाले आहे; पण प्रथमोपचार वर्गात शिकवल्याप्रमाणे उपचार केल्याने त्यांना त्या चालकाचे प्राण वाचवण्यास साहाय्य करता आले.’

– सौ. समृद्धी सचिन सनगरे, रत्नागिरी (२८.१.२०२२)’

(संदर्भ : सनातनचे प्रकाशन – प्रथमोपचार प्रशिक्षण (भाग १)

‘छातीदाबन’ ठाऊक असणे का आवश्‍यक आहे ?

‘वर्ष २०२२ मध्‍ये अमेरिकेतील टेक्‍सासमध्‍ये एक बॉक्‍सर ‘कार्डियाक अरेस्‍ट’ झाल्‍यामुळे खाली पडला. त्‍याच्‍या समवेत असलेले बॉक्‍सर, ज्‍यांना ‘कार्डियाक रिसस्‌सिटेशन’ (‘हृदय-पुनरुज्‍जीवन तंत्र’) ठाऊक होते, त्‍यांनी त्‍याच्‍यावर उपचार केले आणि त्‍याचे प्राण वाचवले. ऑगस्‍ट २०२३ मध्‍ये भारतात ५२ वर्षांचे एक बॅडमिंटन खेळाडू खाली पडले आणि त्‍यांचे निधन झाले; कारण त्‍यांच्‍या जवळ असलेल्‍या खेळाडूंना ‘अशा वेळी काय करायला हवे ?’, हेच ठाऊक नव्‍हते. यावरून ‘कार्डियाक रिसस्‌सिटेशन’ ठाऊक असण्‍याचे महत्त्व लक्षात येते.

कोल्‍स – कॉम्‍प्रेशन ओन्‍ली लाइफ सपोर्ट’ (COLS : Compression Only Life Support)’ ही ‘कार्डियाक रिसस्‌सिटेशन’ची प्रक्रिया शिकून घेण्‍यासाठी स्‍थानिक आरोग्‍य केंद्र किंवा सरकारी रुग्‍णालय यांना संपर्क करून अधिक माहिती घ्‍यावी. ही प्रक्रिया बनावट पुतळ्‍यावर (‘डमी मॅनेक्विन’वर) शिकवली जाते आणि त्याचा सरावही करून घेतला जातो. हा विषय तज्ञ व्यक्तींकडून शिकून आपण लोकांचा जीव वाचवू शकतो !’

– डॉ. (सौ.) लिंदा बोरकर, फोंडा, गोवा. (२०.३.२०२४)