अण्णासाहेब मगर महाविद्यालय (पुणे) येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निषेधार्थ आंदोलन !

पुणे, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – भारतीय संस्कृतीचे जतन संवर्धन करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’सारखे पाश्चिमात्यांचे उदात्तीकरण छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पुण्यात सहन केले जाणार नाहीत, असे परखड प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. ऋषिकेश कामथे यांनी केले. १४ फेब्रुवारी या दिवशी अण्णासाहेब मगर महाविद्यालय येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निषेधार्थ घोषणा देऊन भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी कटीबद्ध राहूया, असे आवाहन तरुणांना करण्यात आले. या वेळी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’चे प्रतिकात्मक चिन्ह पायदळी तुडवून निषेध व्यक्त केला.
‘निर्भय नारी हिंदु शक्ती अभियानां’तर्गत श्रिया परदेशी यांनी या वेळी मनोगत व्यक्त करून गोमातेचे पूजन केले. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुलदीप यादव, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अभिजित बोराटे, ‘रयत क्रांती संघटने’चे सूर्यकांत काळभोर, ‘गोरक्षा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्या’चे गोरक्षकांनी तरुणाईला मार्गदर्शन केले.
मान्यवरांचे मार्गदर्शन
- पाश्चिमात्य संस्कृतीचे उदात्तीकरण करणारे कोणतेही सण महाराष्ट्रात साजरे होऊ देणार नाही ! – अभिजित बोराटे, शिवसेना प्रवक्ते
- मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतर करण्यासाठी असे पाश्चिमात्य सण भविष्यात भारतीय संस्कृती नष्ट ठरण्याचे कारण ठरू शकते. – श्रिया परदेशी, निर्भय नारी हिंदु शक्ती अभियान