महाकुंभमेळ्याचे एक आकर्षण – सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थांची प्रदर्शने !

पाकिस्तान येथून आलेल्या हिंदूंना साधनेविषयीची माहिती देतांना  श्री. चेतन राजहंस

कुंभमेळ्यातील ‘सेक्टर ९’ आणि ‘सेक्टर १९’ येथील सनातन संस्थेचे प्रदर्शन

सनातन संस्थेच्या प्रदर्शन कक्षात संस्थेचे कार्य, आचारधर्म, साधना, भारतातील मोक्षदायक अशा सप्तपुरींचे महात्म्य, भारतात कुंभमेळा भरणार्‍या प्रयाग, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या स्थानांचे महात्म्य इत्यादी विषय ‘फ्लेक्स’ फलकांद्वारे मांडले होते. फ्लेक्स फलकांची मांडणी नीटनेटकी होती. फलकांची रंगसंगती सात्त्विक होती. त्यावरील लिखाण सहज समजेल अशा सोप्या भाषेत होते, ‘फ्लेक्स’ फलकांव्यतिरिक्त संस्थेने तिचे अध्यात्मावरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचेही प्रदर्शन मांडले होते. एकूणच हे प्रदर्शन पहातांना पुष्कळ चैतन्य आणि हलकेपणा जाणवत होता.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रदर्शन

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ ही संस्था अध्यात्मशास्त्र विज्ञानाद्वारे, म्हणजे प्रयोगांद्वारे समजावून सांगणारी संस्था आहे. ही संस्था अध्यात्मशास्त्र समजावून सांगण्यासाठी वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करते आणि त्या प्रयोगांचे निष्कर्ष मांडते. त्यावरून समाजाला सात्त्विक-असात्त्विक गोष्टी, सकारात्मक-नकारात्मक स्पंदने, आचारधर्माच्या योग्य-अयोग्य पद्धती इत्यादी घटक समजतात. संस्थेने केलेल्या अध्यात्मशास्त्रावरील प्रयोगांचे निष्कर्ष फ्लेक्स फलकांद्वारे सोप्या भाषेत आणि चित्रांच्या माध्यमांतून मांडल्याने लोकांना ते सहज समजतात. त्यामुळे ‘सेक्टर ७’मधील हे प्रदर्शन लोकांना इतके आवडते की, ते आपल्या सहकार्‍यांनाही हे प्रदर्शन पहायला घेऊन येतात.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

एकूणच या तिन्ही संस्थांचे ध्येय ‘समाज सात्त्विक व्हावा आणि सनातन अशा हिंदु संस्कृतीचे महत्त्व लोकांना समजून त्याप्रमाणे त्यांनी आचरण करावे’, हे आहे. हे झाले की, हिंदु राष्ट्र, म्हणजे सात्त्विक अशा लोकांचे रामराज्य (ईश्वरी राज्य) येणारच आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी आलेले लोक, साधूसंत इत्यादींना या तिन्ही संस्थांची प्रदर्शने आकर्षून घेत आहेत. या तिन्ही संस्थांचे तंबू भव्य आणि सजावटीने आकर्षक नसूनही ते लोकांना आकर्षित करतात, याचे कारण त्यांच्यामध्ये असलेले माणसाच्या वृत्तीत पालट करून ती सात्त्विक करणारे चैतन्य आणि साधे-सोपे ज्ञान !– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

कुंभमेळ्यातील ‘सेक्टर ६’ मधील हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन

हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन पहातांना युवावर्ग

‘हिंदु जनजागृती समिती’ ही संस्था हिंदु धर्माच्या उत्थानासाठी कार्यरत आहे. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना, म्हणजेच रामराज्याची स्थापना’, हे तिचे ध्येय आहे. ‘सध्या हिंदु धर्माची (म्हणजेच हिंदूंची) स्थिती काय आहे ?’, ‘याचे परिणाम काय होत आहेत ?’, ‘या स्थितीवरील उपाय काय ?’, ‘सध्या हिंदु धर्माशी निगडित असलेली समस्या, म्हणजे विस्थापित असलेले काश्मिरी हिंदू’, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना का आवश्यक आहे ?’ इत्यादी विषयांवरील प्रबोधनात्मक लिखाण हिंदु जनजागृती समितीने ‘सेक्टर ६’ येथील कक्षात फ्लेक्स फलकांद्वारे मांडले होते. या विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शनही तिने मांडले होते.