संपादकीय : जर्मनीत पुन्हा एकदा आक्रमण !

जर्मनीतील म्युनिक शहरात एका अफगाणी निर्वासिताने चारचाकी गाडीने २८ हून अधिक जणांना उडवले. यामध्ये ते गंभीर घायाळ झाले आहेत. घायाळांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. १३ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या या आक्रमणाच्या वेळी रस्त्यावर गर्दीही होती आणि एका संघटनेची निदर्शने चालू होती. येथील बावेरीया प्रांताचे गव्हर्नर मार्कस सॉडर यांनी या घटनेला ‘आक्रमण’ असे संबोधले आहे. म्युनिक शहरात आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषद चालू होणार आहे. संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. मागील वर्षी ख्रिसमसच्या वेळी येथील मागडेबर्ग येथील बाजारपेठेत आक्रमण करण्यात आले होते, त्या वेळी ६ जणांनी त्यांचे प्राण गमावले, तर २०० जण घायाळ झाले होते. संबंधित आक्रमणकर्ता हा सौदी अरेबियातील डॉक्टर असल्याचे लक्षात आले होते. या वर्षाच्या जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या न्यू ऑरलेन्स या भागातही एका जिहाद्याने गर्दीत ट्रक घुसवून आक्रमण केले होते. त्या वेळीही १५ लोक ठार झाले, तर ५७ लोक घायाळ झाले होते. ११ सप्टेंबर २००१ या दिवशी अल-कायदाच्या आतंकवाद्यांनी अमेरिकेवर केलेले आक्रमण सर्वज्ञात आहे. ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या महाकाय इमारतींना अमेरिकेचीच विमाने धडकवून केलेल्या आक्रमणात सहस्रो लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यांतील घायाळ झालेले अद्यापही यातना भोगत आहेत.

युरोप आणि अमेरिका खंडांतील देश हे ख्रिस्तीबहुल आहेत, तर आखाती देश, भारताच्या शेजारील अफगाणिस्तान, पाकिस्तान हे देश मुसलमानबहुल आहेत. ख्रिस्ती देशांकडे तंत्रज्ञान, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने अशी विपुल संरक्षणसामग्री उपलब्ध आहे, तर अनेक मुसलमान देशांमध्ये क्रूर आतंकवादी संघटना कार्यरत आहेत. काही देशांतील काही भागांवर आतंकवादी संघटनांचे नियंत्रण आहे. ख्रिस्तीबहुल देशांवर थेट आक्रमण करण्याएवढे संरक्षण सामर्थ्य इस्लामी देशांतील आतंकवादी संघटनांकडे नाही. जी काही तुरळक आक्रमणे करता येतात, त्याद्वारे काही प्रमाणात हानी होत असली, तरी नंतर ख्रिस्तीबहुल देशांकडून होणार्‍या हवाई आक्रमणांद्वारे इस्लामी देशांचीच हानी होते, तसेच ती युद्धे इस्लामी देशाच्या भूमीवर होतात. त्यामुळे स्वत:ची न्यूनतम हानी करून ख्रिस्तीबहुल देशांमध्ये भीती किंवा स्वत:चा वचक निर्माण करणे, हे साध्य करण्यासाठी जिहाद्यांनी नवीन युद्धनीती अवलंबली आहे. ती युद्धनीती म्हणजेच ख्रिस्ती देशांमध्ये आश्रय घ्यायचा आणि संधी मिळताच चारचाकी किंवा ट्रक धडकवून आक्रमण करायचे. यामध्ये जिहादी चालकाची न्यूनतम हानी होते. तो पकडला जातो आणि खटला दीर्घकाळ चालू रहातो. याउलट लोकांचे प्राण जातात, लोकांमध्ये भय उत्पन्न होते, देशातील सरकारवर संरक्षण विभागाच्या अनास्थेविषयी लोकांमध्ये अप्रसन्नता निर्माण होते, असुरक्षितता निर्माण होते. अशा अनेक प्रकारे आतंकवादी स्वत:चे उद्दिष्ट साध्य करतात. आतंकवाद्यांच्या या नवीन खेळीवर कशी उपाययोजना करावी ? हे सुरक्षा यंत्रणांच्या समोरील मोठे आव्हानच आहे.

उदारमतवादामुळे युरोपची हानी

युरोपमधील देश उदारमतवादी धोरणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच त्यांनी सीरिया, इराक, पॅलेस्टाईन येथील लाखो मुसलमान निर्वासितांना त्यांच्या देशात आश्रय दिला आहे. त्यांमध्ये जर्मनीही आहे. जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या उदारमतवादी धोरणांमुळे लाखो निर्वासित मुसलमानांनी जर्मनीत आश्रय घेतला. या निर्वासित धर्मांधांनी जर्मनीत प्रवेश करताच त्यांचा रंग दाखवण्यास प्रारंभ केला. अनेक जर्मन मुली, महिला यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आले. दुकाने, घरे यांची लुटालूट, जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे स्थानिक जनतेने या निर्वासितांच्या प्रश्नावरून सरकारच्या विरोधात निदर्शने, आंदोलने केली. सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला; मात्र जर्मनी जागा झाला नाही. आता जागा होऊनही काय उपयोग ? घुसखोरांनी त्यांचे बस्तान मांडले आहे. फ्रान्समध्येही ही स्थिती आहे. हमासच्या आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ इंग्लड आणि युरोप येथील काही देशांमध्ये निदर्शने करणार्‍या जिहाद्यांची संख्या पाहून, त्यांची तीव्र निदर्शने पाहून सर्वांच्याच हृदयात धडकी भरली. यातून जाणकारांनी उद्या जिहाद्यांना युरोप आणि ख्रिस्तीबहुल देश पादाक्रांत करण्यास अधिक वेळ लागणार नाही, ते सहजतेने देश नियंत्रणात घेऊ शकतात, याचे अनुमान बांधले आहे. इंग्लडमध्ये ‘ग्रुमिंग गँग’द्वारे अल्पवयीन ब्रिटीश मुलींना हेरून त्यांच्यावर अत्याचार करणे, ब्रिटिशांची पुढची पिढी इस्लामी करण्याचे षड्यंत्र शांतपणे चालूच आहे. भारतातही बांगलादेशी आणि रोहिंग्या हे भारतातील अनेक गुन्ह्यांमध्ये अन् विशेषत: दंगलींमध्ये सहभागी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. भारतातील झारखंड, बंगाल, बिहार यांसारख्या राज्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरी करून तेथील स्थानिक महिला, मुली यांच्याशी विवाह करून त्यांची घरे, भूमी कह्यात घेत आहेत. महिलांना सरपंचपदी विराजमान करून स्वत: गावाचा कारभारच नियंत्रणात घेत आहेत.

यातून शिकली ती म्हणजे अमेरिका आणि त्यातही अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प ! ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच घुसखोरांविरुद्ध मोर्चाच उघडला आहे. अमेरिकेत घुसणारे कुणीही असो, त्यांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी करून संबंधित देशांमध्ये पुन्हा पाठवण्यात येत आहे. यामुळे अमेरिकेत नेमके किती घुसखोर आहेत ? हेसुद्धा लक्षात येत आहे, कोणत्या देशातून घुसखोर जाण्याचे प्रमाण अधिक आहे, हेसुद्धा लक्षात येत आहे. अमेरिकेसारखा महाकाय देश घुसखोरी रोखणे, पूर्ण सीमा बंद करण्यासाठी प्रयत्न करणे या उपाययोजना करू शकतो, तर शत्रूदेशांनी वेढलेल्या भारताने पुष्कळच प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारतात जिहाद्यांनी वाहनाद्वारे लोकांना धडक देण्याच्या घटना घडलेल्या नसल्या, तरी रेल्वेरूळ उखडून, रेल्वेच्या रुळावर सिलिंडर, दगड, लोखंडी तुकडे ठेवून सहस्रोंचे प्राण घेण्याचे कट शिजत आहेत. अनेक कट धुळीस मिळालेही आहेत; मात्र कट थांबत नाहीत. ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ गाडीवर अनेक राज्यांमध्ये आणि त्यातही मुसलमानबहुल भागांतून ती जात असतांना दगडफेक करून तिची हानी करण्यात आली आहे. हा जिहादचाच प्रकार आहे. भारताने खरेतर घुसखोरांविरुद्ध तुरळक आणि सामान्य उपाययोजना करण्याऐवजी परिणामकारक उपाययोजना केल्या पाहिजेत. एका बांगलादेशीला पकडल्यावर त्याची सीमापार रवानगी करण्याची किचकट प्रक्रिया सोपी केली पाहिजे. घुसखोरांची सर्व संपत्ती जप्त करण्यासह त्यांची तात्काळ पाठवणी झाली पाहिजे, अन्यथा युरोपप्रमाणे येथेही एकट्या-दुकट्याने जिहाद्यांची आक्रमणे होण्यास वेळ लागणार नाही.

जिहादी घुसखोरांविरुद्ध कठोर उपाययोजना न केल्यास युरोपप्रमाणे भारतातही आक्रमणे होत रहातील !